विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. याऊलट ते मुख्यमंत्री असताना त्यांनी परदेशातल्या अंडरवर्ल्डसोबत संबंध ठेवून मुंबईला कसे वेठीस धरले होते, याचा पर्दाफाश उद्या बुधवारी सकाळी करणार असल्याची घोषणा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर फटाके फोडू. पण मला वाटते त्यांचे फटाके भिजले आणि वाया गेले. मी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र, देवेंद्रजी 1999मध्ये तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र, 62 वर्षांच्या कार्यकाळात किंवा 26 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करू शकले नाहीत, असे मलिक यांनी सांगितले.
मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना कुणी तरी चुकीची माहिती देत आहे. तुम्ही सांगितले असते तर, मीच तुम्हाला कागदपत्रे दिली असती. अंडरवर्ल्डचा खेळ जो तुम्ही सुरू केला, त्यावर आज मी बोलणार नाही. मात्र, उद्या सकाळी 10 वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला कसे ओलीस ठेवले होते त्याचा पर्दाफाश करणार आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावे, मी चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. कवडीमोल किमतीत कुठेही जमीन विकत घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुलगी उद्या नोटिस पाठवणार
काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला, असे म्हटले होते. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटिस पाठवणार आहे. या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, अशी अपेक्षा असल्याने ही लढाई आपण सुरू ठेवूच. ही फाईल एनआयए किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

