राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दलित आणि मागासवर्गीय यांना आपल्या जवळ करताना प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे ठरवले असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकरीता जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे आज दुपारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे तसेच प्रा. कवाडे याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्या पुढे प्रा. कवाडे भाजपाप्रणित महायुतीतही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बाळासाहेबांची शिवसेना, या पक्षाचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांच्या पक्षाची आणि भारतीय जनता पार्टीची युती सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत आहे. गेल्या सहा महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत तसेच सरपंचपदाच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांनी युती केली होती. ग्राउंड लेव्हलपासून थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2024पर्यंत ही युती सर्व निवडणुका एकत्रित लढवणार असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वारंवार जाहीर केले आहे. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष तसेच जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष असे काही लहान पक्ष भाजपासोबत गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या राजकारणात एकत्रित दिसतात. त्यातच तेव्हाच्या शिवसेनेची जागा आता बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतली आहे. जर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेतल्यास त्यांनाही या भाजपाप्रणित महायुतीमध्ये सहभागी करावे लागेल, असे बोलले जाते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी याबाबत भाजपाशी आधीच बोलणे केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या समावेशाने महायुतीला बळकटीच मिळेल आणि रामदास आठवले तसेच प्रा. कवाडे यांच्यामध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी चुरस निर्माण होईल. पर्यायाने महायुतीतले घटक भाजपा तसेच बाळासाहेबांची शिवसेना यांची डोकेदुखी आपोआपच कमी होईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.