Friday, September 20, 2024
Homeटॉप स्टोरीजगातली पहिली डीएनए-प्लाजमिड...

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड लस भारतात?

जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस भारतात विकसित होत असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत आहे, असे NTAGI म्हणजेच ‘लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट’ यातील कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर, बायोलॉजिकल-इ नावाची लसही लवकरच उपलब्ध होणार असून ती प्रथिनाच्या उपघटकांवर आधारित आहे, असेही त्यांनी सांगितले.

विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा ओटीटी मंच असणाऱ्या ‘इंडिया सायन्स चॅनेल’ या वाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. या लसींच्या प्रायोगिक चाचण्या अतिशय उत्साहवर्धक रीतीने पार पडल्या असून सप्टेंबरपर्यंत या लस उपलब्ध होऊ शकतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येणारी भारतीय बनावटीची एम-आरएनए लसही सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आणखी दोन लसी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोव्हाव्हॅक्स आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लसही लवकरचयेणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटची उत्पादनक्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळे देशातील लसपुरवठा वाढू शकेल. ऑगस्टपर्यंत एका महिन्यात ३०-३५ कोटी मात्रा खरेदी करता येण्याची अपेक्षा आहे. यामुळे एका दिवसात एक कोटी व्यक्तींना लस टोचता येईल, असा अंदाजही डॉ. अरोरा यांनी व्यक्त केला.

नव्या लसी कशा आणि किती प्रभावशाली?

आपण जेव्हा म्हणतो की एखादी लस ८०% परिणामकारक आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, त्या लसीमुळे कोविड-१९ होण्याची शक्यता ८०%नी कमी होते. संसर्ग आणि रोग यामध्ये फरक आहे. एखाद्या व्यक्तीला कोविडची लागण झाली असेल परंतु ती लक्षणविरहित असेल, तर त्या व्यक्तीला केवळ संसर्ग झालेला असतो. मात्र, एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्गामुळे लक्षणे दिसून येत असतील तर तिला कोविड रोग झाला आहे असे समजावे, असे ते म्हणाले.

जगातील सर्व लसी, कोविड रोगाला आळा घालण्याचे काम करतात. लसीकरणानंतर तीव्र रोग होण्याची शक्यता अगदी कमी असते, तर लसीकरणानंतर मृत्यू ओढवण्याची शक्यता अगदीच नगण्य म्हणावी इतकी कमी असते. जर एखाद्या लसीची परिणामकारकता ८०% असेल, तर लस घेतलेल्यांपैकी २०% लोकांना सौम्य प्रमाणात कोविड होण्याची शक्यता असते. भारतात उपलब्ध असलेल्या लसी कोरोना विषाणूच्या फ़ैलावाला पायबंद घालण्यासाठी समर्थ आहेत. जर ६० ते ७०% लोकांचे लसीकरण झाले, तर विषाणूच्या फ़ैलावाला आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

कोविड लसींबद्दल बरीच चुकीची माहिती

नुकताच मी हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जाऊन तेथील शहरी आणि ग्रामीण जनतेशी संवाद साधला. लस घेण्यातील टाळाटाळ, दडपण, शंका-कुशंका, दोलायमानता समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुखत्वे ग्रामीण भागातील अनेक लोक कोविडचा गांभीर्याने विचारच करीत नाहीत आणि त्याला साध्या तापाप्रमाणेच समजण्याची गफलत करतात. अनेकांच्या बाबतीत कोविड सौम्य असू शकतो, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. परंतु जेव्हा तो तीव्र, गंभीर रूप धारण करतो तेव्हा तो आर्थिकदृष्ट्याही जड पडतो आणि प्रसंगी त्यातून रुग्णाला प्राणही गमवावे  लागतात. भारतात उपलब्ध असलेल्या लसी सर्वथा सुरक्षित आहेत यावर आपण सर्वांनी भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. सर्वच लसींचे काही सौम्य साइड-इफेक्ट्स असतातच. यामध्ये एक ते दोन दिवस किंचित ताप, थकवा, सुई टोचलेल्या जागी दुखणे इत्यादींचा समावेश होतो. मात्र लसीमुळे कोणतेही गंभीर साइड-इफेक्ट्स होत नाहीत. जेव्हा बालकांना त्यांच्या नियमित/ नेहमीच्या लसी टोचल्या जातात तेव्हा त्यांच्यामध्येही काही साइड-इफेक्ट्स दिसून येतात. आता मोठ्या माणसांनी हे समजून घेण्याची गरज आहे, असे डॉ. अरोरा म्हणाले.

ताप आला नाही तर लस काम करत नाही?

बहुतांश लोकांमध्ये कोविड लसीकरणानंतर कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसून येत नाहीत. पण,  याचा अर्थ ‘लसी कार्यक्षम नाहीत’ असा नाही. केवळ २० ते ३०% लोकांनाच लसीननंतर ताप येईल. काही लोकांना पहिल्या मात्रेनंतर ताप येईल व दुसऱ्या मात्रेनंतर जराही ताप येणार नाही, तर काहींचे अगदी उलटे होईल. ही गोष्ट व्यक्तिपरत्वे बदलते आणि याबद्दल अनुमान लावणे अतिशय अवघड आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरीरात अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे किती काळ अस्तित्त्वात असतात?

लसीकरणाने विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीची खातरजमा, प्रतिपिंडे विकसित झाल्यावरून नक्कीच करता येते. प्रतिपिंडे दिसूही शकतात व मोजताही येऊ शकतात. याशिवाय, एक अदृश्य प्रतिकारशक्तीही विकसित होते. तिला ‘टी-पेशी’ असे म्हणतात. तिला स्मरणशक्ती असते. त्यामुळे, आता यांनतर जेव्हा जेव्हा तसा विषाणू शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा पूर्ण शरीर सावध होईल आणि त्याच्या विरोधात काम करण्यास सुरुवात करील. म्हणजेच, प्रतिपिंडांचे अस्तित्त्व ही काही आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीची एकमेव खूण नव्हे. म्हणून, लसीकरणानंतर अँटीबॉडीज टेस्ट करण्याची, त्याबद्दल काळजी करत राहण्याची नि स्वतःची झोप उडवून घेण्याची काही गरज नाही. अन्य साऱ्या लसींप्रमाणेच याची प्रतिकारशक्ती किमान सहा महिने ते एक वर्षापर्यंत टिकेल. ‘टी-पेशींसारखे’ काही घटक मोजमापाच्या पलीकडे असतात. सध्या तरी, लस घेतलेल्या सर्व व्यक्ती सहा महिने ते एक वर्षापर्यंत सुरक्षित राहतील, असेही डॉ. अरोरा यांनी सांगितले.

बूस्टर डोस त्याच कंपनीचा पाहिजे का?

एकाच रोगावरील लस शोधण्यासाठी भिन्नभिन्न प्रक्रिया आणि मंचांचा वापर व्हावा, असे मानवी इतिहासात यापूर्वी कधीच झाले नाही. या लसींच्या उत्पादन प्रक्रिया वेगवेगळ्या असल्याने शरीरावरील त्यांचे परिणामही एकसमान नसतील. दोन मात्रांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेणे, किंवा (गरज पडल्यास) पुढे बूस्टर डोस घेताना वेगळीच लस घेणे या प्रकाराला अदलाबदली असे म्हणतात. ‘तसे करता येईल का?’, हा एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रश्न आहे. त्यावर उत्तराचा शोध चालू आहे, असे ते म्हणाले.

बालकांसाठी केव्हापर्यंत लस येणे अपेक्षित आहे?

वयाच्या २ ते १८ वर्षे गटातील बालकांसाठी कोवॅक्सिनच्या लसीची तपासणी सुरू झाली आहे. देशभरातील अनेक केंद्रांमध्ये बालकांवर लसीच्या तपासण्या सुरू आहेत. यावर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत त्याचे निकाल अपेक्षित आहेत. बालकांना संसर्ग होऊ शकतो. परंतु ती गंभीर आजारी पडत नाहीत. मात्र, बालके ही विषाणूचे वाहक बनू शकतात. यास्तव, बालकांनाही लस देणे आवश्यक आहे.

लसींमुळे वंध्यत्व येते का?

पोलिओची लस नव्याने आली व ती भारतासह जागाच्या निरनिराळ्या भागांत टोचली जात  होती, तेव्हाही अशा अफवा पसरल्या होत्याच. लसींच्या विरोधात एकत्रितपणे प्रयत्न करणाऱ्यांकडून अशी चुकीची व खोटी माहिती पसरविली जाते. अशा अपप्रचारामुळे लोकांची फक्त दिशाभूल होते. त्यामुळे, प्रत्येकाने पुढे येऊन स्वतःहून लस घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंकवर पाहता येईल-

https://www.indiascience.in/videos/corona-ko-harana-hai-vaccination-special-with-dr-n-dot-k-arora-chairman-covid-19-working-group-of-ntagi-g

1 COMMENT

  1. सार्वजनिक आरोग्य विषयी आणि अर्थातच रोग प्रतिबंधक उपायातील सर्वाधिक वादातीत मुद्दा म्हणजे कोणाला यातील नेमके काय कळते?
    WHO?
    कोणत्याही देशाचे सरकार?
    की त्यातील राज्य सरकारे?
    जागतिक वैयक्तिक नामवंत आरोग्य तज्ज्ञ?
    कोण?
    निश्चित उपचार नसताना लाखो रुपयांची बिले कशी तयार होवून वसुली केली जाते? हे सर्वात मोठे कोडे आहे?
    मला वाटते हा प्रश्न आयएएस च्या अखेरच्या प्रश्न फेरीत सहज सामील करता येण्यासारखा आहे, नाही का?
    गेली वर्षी who चा प्रोटोकॉल म्हणून जगभरातील लोकांचे जे हाल झाले; ते लूत भरलेल्या कुत्र्यंपेक्षा वाईट होते.
    आतातर who स्वतः करोनाला संसर्गजन्य रोग मानीत नाही, व WHO चा कोणताही प्रोटोकॉल नाही असे सांगत असताना अजूनही विविध प्रकारे जनतेला वेठिला धरले जाते ते कशासाठी?
    कोणत्याही वैद्यकीय उपचार कारणासाठी, प्रवासासाठी करोणा टेस्ट? आणि आता covid19 पासपोर्ट?कशासाठी? प्रचलित पद्धती कोणत्याही प्रकारे योग्य व खरा रिपोर्ट देवूच शकत नाही हे त्या मशीनच्या manual मध्ये संशोधकाने लिहिले असताना देखील सर्व सामान्य लोकांच्या नाकात का काड्या खुपसल्या जातात?

    आता तर सुपर speciality दवाखाने स्वतःचा प्रोटोकॉल चालवीत आहेत व साध्या तपासणीला देखील करोणा टेस्ट करायला सांगतात ही सरळ सरळ जबरदस्तीची गुलामी आहे.
    सर्व उपचारपद्धतीचा वापर का नाही होतो आहे?

Comments are closed.

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content