Homeपब्लिक फिगरएकनाथ शिंदेंच्याच नेतृत्त्वाखाली...

एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्त्वाखाली पुढची निवडणूक!

ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून त्यांचे सरकार घेऊन गेलो. ते कसल्या वल्गना करताहेत? हे सरकार राहणार. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच नेतृत्त्वात पुढची निवडणूक लढवू आणि पुन्हा आमचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार, असा पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खा. संजय राऊतांवर यांच्या भाषणांवर केला.

फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महामोर्चाच्या भाषणांदरम्यान केला. यावर फडणवीस बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा का नाही काढला मोर्चा?

मागील काळात महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत होते. या लोकांकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना, ठाकरे गटाने त्यावेळी मोर्चा का काढला नाही? स्वातंत्र्यवीर महापुरुष नाहीत का, हे आधी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.

देवी-देवतांना शिव्या घालणार्‍यांना मोर्चा काढण्याचा अधिकार नाही

जे देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशांना हा मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. हा पूर्णपणे राजकीय मोर्चा असून, तिन्ही पक्षांनी पूर्ण ताकद झोकल्यानंतरदेखील तो नॅनो मोर्चा झाला, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा

उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता. कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्यदैवत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असेही ते म्हणाले.

ही १० वर्षे जुनी कॅसेट

उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते आहे आणि ती गेल्या १० वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. जेणेकरुन एका मोठ्या नेत्याचे ते भाषण आहे असे वाटले पाहिजे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, कारण, भारताचे संविधान हे सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत. त्यामुळे ते एकच एक टेप वाजवत असतात, असे त्यांनी सांगितले.

ड्रोनशॉट दाखवण्यालायकच मोर्चा नव्हता

या मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊनदेखील माध्यमांना ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, माध्यमांना ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या. पण, त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. आझाद मैदानाचा एक कोपराही त्यांना भरता आला नसता. ही भीती असल्याने त्यांनी निमुळती जागा निवडली. असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

भारताने भूभाग गमावला तेव्हा राहुल गांधींचे पूर्वजच सत्तेत होते

राहुल गांधी आणि पाकिस्तान एकाच दिवशी कसे बोलतात, हाच मला पडलेला प्रश्‍न आहे. त्यांची राष्ट्राच्या प्रती संवेदना काय आहे, हे यातून लक्षात येते. पाकिस्तान तसे बोलले, याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण त्यांना तर जगाने दहशतवादी राष्ट्र ठरविले. पण, राहुल गांधी असे विधान करतात, तेव्हा आश्‍चर्य वाटते. चीनने जेव्हा-जेव्हा भारतीय भूभाग बळकावला, तेव्हा गांधी कुटुंब सत्तेत होते. आज देशात मोदीजींचे सरकार आहे. आज एक इंचही जमीन भारताची कुणाकडे जाऊ शकत नाही. आमच्या सैन्याने शूरपणे त्यांचा मुकाबला केला आहे. उलट आज भारत आमच्या सीमेत आला म्हणून, चीन रडताना दिसत आहे. ही आहे मोदीजींच्या नेतृत्त्वातील भारताची ताकद, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे काँग्रेसचे पाप

मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही आमचे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही. तो 60 वर्षे जुना आहे. या वादाला काँग्रेसच जबाबदार आहे. महाराष्ट्रावर अन्याय करुन कर्नाटकला कसे झुकते माप देत हा वाद उपन्न केला आणि वर्षो न वर्षे तो चिघळवत ठेवला. या वादाला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे, असेही फडणवीस एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content