Homeमुंबई स्पेशलअधिवेशनात मुख्यमंत्री हजर...

अधिवेशनात मुख्यमंत्री हजर राहणार का? राहिले तर कधी??

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरले असले तरी या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर राहणार की नाहीत, राहिले तर कधी राहणार आणि किती काळ, असे अनेक प्रश्न आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाही कायम आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळेच हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घ्यावे लागत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना प्रवास करून आणि अगदी हेलिकॉप्टरनेही नागपूरला येणे शक्य नसल्याने अधिवेशन मुंबईला घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले. मात्र, पुढचे अधिवेशन नागपूरलाच घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

यंदाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर काळात मुंबईत होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानालाही मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. चहापानानंतर सह्याद्री गेस्ट हाऊसमधे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते.

गेले महिनाभर नागपूरला अधिवेशन घेण्याचा खर्च चारशे कोटींच्या आसपास जातो आणि कोरोनाची लाट अद्याप ओसरलेली नसल्याने मुंबईला अधिवेशन घेतले जात आहे, असे सरकारकडून सांगितले जात होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अधिवेशन मुंबईला घेत असल्याचे स्पष्ट केले.

या अधिवेशनाआधी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी गेले होते. विधानभवनातही त्यांनी पाहणी केली. या अधिवेशनातही ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी त्यांनी आम्हाला सत्ताधारी आमदारांची बैठक बोलावण्यासही सांगितले आहे. मात्र, ते कधी येतील हे सांगता येणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मागच्या अधिवेशनात प्रलंबित राहिलेली पाच विधेयके, मंत्रिमंडळाने मंजूर केलेली २१ विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येतील. संयुक्त समितीकडे विचारासाठी पाठविण्यात आलेला शक्ती कायदाही या अधिवेशनात मंजूर केला जाईल. नवे कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यामुळे येथे करण्यात आलेले तीन शेतकरी कायदे मागे घेतले जातील, असेही ते म्हणाले.

आमदारांचे निलंबन काही हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेले नाही. राज्यपालांच्या अधिकारात कुठेही कपात केली जात नाही. ओबीसी आरक्षणाच्या विषयात सरकार कुठेही कमी पडलेले नाही. अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने करणार, पण ते आमदार फुटतील या भीतीने नव्हे. विरोधी पक्षाचा तसा दावा असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणावा, असेही अजित पवार यांनी सांगतले.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content