रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदार बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत, हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अद्याप कारवाई होत नसल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजपाच्या महिला नेत्यांनी याप्रकरणी पुढे येऊन पीडित खेळाडूंना समर्थन दिले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या खासदाराला वाचवण्यासाठी भाजपा आटापीटा करत आहे, त्याला संरक्षण दिले जात आहे. नवीन संसद भवनचे उद्घाटन होत असताना या पीडीत खेळाडूंना धक्काबुक्की करत पोलीस बळाचा वापर करत जंतरमंतरवरून हुसकावून लावले गेले. अत्याचारी खासदारावर पोलीस कारवाई करण्याऐवजी पीडितांवरच पोलीस अत्याचार करत आहेत. छोट्याछोट्या प्रसंगावर ट्विट करणारे पंतप्रधान या अतिशय गंभीर प्रकरणावर गप्प आहेत हे आश्चर्यकारक व संतापजनक आहे, असेही ते म्हणाले.

महिला कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी देशभरातून राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती पुढे येत असताना बॉलिवूडमधील कलाकार व इतर खेळाडूंनीही पुढे येऊन महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. खेळाडूंच्या पाठिशी उभे नाही राहिले तर अत्याचारी खासदाराला समर्थन दिल्याचा संदेश जाईल, असेही ते म्हणाले.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन दिवसांची आढावा बैठक आयोजित केली असून सर्व ४८ मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ही जागावाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांची मते अजमावली जात आहेत. चर्चा सकारात्मक होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीयवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने मविआचे सरकार पाडले त्याचा तीव्र संताप जनतेत आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सूर बैठकीत उमटत आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

