आजपासून बरोबर सहाव्या दिवशी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत शंकाच आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे आजारी असून त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी शस्त्रक्रियेचे स्वरूप पाहता त्यांना भरपूर विश्रांतीची गरज आहे, हे उघड असल्याने पडद्याआड राजकारण सुरू झाले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्रांती काळात त्यांच्या पादुकांची पूजा कोण करणार? रश्मी वहिनी, अजितदादा की सुप्रियाताई? या चर्चेला सध्या ऊत आला आहे.
त्यातच मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत काही माहिती देण्यात येत नसल्याने राजकीय पतंगबाजी जोरात सुरू झाली नसती तरच नवल होते..
“झाड अंधारात होते भूत जैसे,
सावल्यांचे फेकुनी गूढ फासे…
मी असा तंद्रीत माझ्या चालताना भासले,
ते हासले मजला जरासे”
अशी काहीशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाल्याचे आता जाणवू लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच ‘अपेक्षांचे ओझे असलेला मुख्यमंत्री’ असे लिहिले होते. शपथ घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्याने त्यांना तसे भरीव असे काहीच करता आले नाही. कोरोनाच्या संकटाने राज्याचे कंबरडेच मोडले आहे. त्यातच जोरदार पाऊस, महापूर आणि पुन्हा अवकाळी पावसाने महाराष्ट्राची पाठच सोडली नाही. त्यात पुन्हा छोटीमोठी आंदोलने, या सर्वांनी मुख्यमंत्र्यांचा जणू पिच्छाच पुरवला.
यातच मंत्रालयातील रोजच्या बैठका अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्त्या व त्यातून रंगलेले राजकारण, ते थंड होत नाही तोवरच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीनच्या काही कांड्या, त्यातून बॉम्ब ठेवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप व त्यावर कळस म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला 100 कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप या सर्वांनी मुख्यमंत्री जेरीस आले नसले तरी रोज त्रास तर होत होताच. शिवाय माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या विविध मंत्र्यांना ईडीच्या धमक्या होत्याच!!
या आरोप-प्रत्यारोपातून काही निघेल की नाही हे भविष्यात दडले आहे. परंतु असे आरोप भारतीय राजकारणात नवीन थोडेच आहेत. गेल्या दोन वर्षांतील या घटना मुद्दामहूनच सांगितल्या. अशा प्रकारचे राजकारण शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धवरावांना नवीन होते. पक्षप्रमुख असताना त्यांना फक्त आपलाच पक्ष सांभाळावा लागत होता. परंतु, मुख्यमंत्री झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन राजकारण करावे लागत आहे. आणि यामुळेच त्यांच्या आजारपणातील काहीशा लांबलेल्या विश्रांतीमुळे राजकीय पतंगबाजीला वेग आला आहे. कुजबूज तर चालूच आहे. काहींनी तर जानेवारी-फेब्रुवारीतला सरकार बुडवण्याचा मुहूर्तही काढून ठेवला आहे.
मुख्यमंत्री आजारी पडणे ही काही नवीन गोष्ट नाही. याआधीही अनेक मुख्यमंत्री आजारी पडले होते. ते आजारी असतानाही मुख्यमंत्रीपदाची सर्व कामे पाहत होते. परंतु त्या मुख्यमंत्र्यांनी वा त्यांच्या राजकीय पक्षांनी पर्यायी व्यवस्था निर्माण करून ठेवली होती. तसे काही येथे दिसत नाही. खरे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे होते. परंतु, आमच्या महितीप्रमाणे पवारसाहेब येत्या काही दिवसांत औषधोपचारासाठी परदेशी रवाना होत आहेत.
त्यांनी त्यांच्या पक्षाची तशी सोय करून ठेवलीही असेल. परंतु महाविकास आघाडीची सुकाणू समिती अजून अस्तित्त्वात आलेली नाही आणि असली तरी या समितीची एकही बैठक झाल्याचे ऐकिवात नाही. मुख्यमंत्री आजारी आहेत. त्याचा जास्त फटका शिवसेनेलाच बसणार आहे. शिवसेनेच्या विशिष्ट चौकटीमुळे कोणी उघड बोलत नसले तरी कुजबूज मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रश्मी वहिनी दररोजच्या कारभारात लक्ष देत नसल्या तरी महत्त्वाच्या बाबींबाबत त्या आपली मते मंत्री आदित्य यांच्या कानावर घालतात.
शिवसेनेच्या तिकीटवाटपात त्या नेमक्या सूचना करत असत व सूचना पक्ष मान्यही करत होता. मुंबई व ठाणे महापालिकेतील महत्त्वाच्या प्रश्नांवर त्या नेहमी आपली मते नोंदवीत असतात. शिवाय त्या शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. थोडक्यात राजकारण आणि निर्णय घेणे त्यांना नवीन नाही. म्हणूनच शिवसेनेतील एक मोठा गट रश्मी वहिनींनी आता सक्रिय राजकारणात उतरावे या मताचा आहे. पाहिजे तर वहिनींनी शिवसेनेतील अष्टप्रधान मंडळ पुनरूज्जीवित करावे व राज्याची कमान उद्धवसाहेब पूर्ण बरे होत नाहीत तोवर सांभाळावी, याबाबत आता बंद दाराआड चर्चा होऊ लागली आहे.
मात्र, रश्मी वहिनींच्या नावाला शरद पवार मुळीच संमती देणार नाहीत असे राष्ट्रवादीच्या गोटातून समजते. पवार अजितदादा यांच्यावरही विसंबून नाहीत. ऐनवेळी ते सुप्रियाताईंचे नाव हंगामी मुख्यमंत्री म्हणून सुचवण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पवार-ठाकरे कुटुंबियांत निर्माण होणाऱ्या मधुर संबंधांबाबत राजकीय चर्चा रंगत आहेत. मधुर संबंधांची चर्चा जर खरी ठरली तर पवार वहिनींच्या नावाला विरोध करणार नाहीत. मात्र, जे काही करायचे आहे ते आघाडीने लवकर करावे. नाहीतर…
“साखरपुडा?.. झाला. टिळा?.. झाला. वऱ्हाड?.. जमलं..
बँडवाले? आले.. नवरा-नवरी?.. हळकुंडावर चर्चा सुरू आहे..”अशी गत होईल. रश्मी वहिनींचे नाव पुढे आले की, शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांना ते पचवणे कठीण जाईल यात शंकाच नाही. परंतु शिवसेना नेत्यांनी जसे आदित्यला पचवले तसेच ते वहिनींच्या मागे उभे राहतील असे एका गटाला वाटते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबाबत काहीच संगण्यात येत नसल्याने अशाप्रकारच्या वावड्यांना उत आला आहे. नाव न सांगण्याचा अटीवर एका डॉक्टरनी सांगितले की, मुख्यमंत्री ठणठणीत बरे होतील. पण त्यांनी चांगली विश्रांती घेऊन नियमित फिजिओथेरपी घेतली की ते निश्चित बरे होतील. तोपर्यंत मात्र, लाखमोलाचा प्रश्न हा आहे की, मुख्यमंत्र्यांच्या विश्रांती काळात त्यांच्या पादुकांची पूजा कोण करणार? रश्मी वहिनी, अजितदादा की सुप्रियाताई?

