क्रोएशियाची राजधानी झार्गरबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पहलवानांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. एकूण ३० कुस्तीपटूंचा भारतीय चमू या स्पर्धेत सहभागी झाला होता. अंतिम पंघालने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात भारतातर्फे एकमेव कांस्यपदकाची कमाई केली. तिचा अपवाद वगळता इतर पहलवान मात्र खाली हात भारतात परतले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही सर्वात खराब कामगिरी होती. निदान अंतिमने एकमेव कांस्यपदक पटकावून भारताची थोडीफार लाज राखली. तिने स्वीडनच्या ऑलिंपियन एमायोना माइग्रेनला कांस्यपदकाच्या सामन्यात १५-९ गुणांनी सहज नमविले. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे कांस्यपदक होते. २०२३च्या बेलग्रेड येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेतदेखील तिने कांस्यपदक मिळवले होते. विनेश फोगाटनंतर या स्पर्धेत दोन पदके जिंकणारी अंतिम पंघाल केवळ दुसरी कुस्तीपटू ठरली. अल्का तोमर, गीता फोगाट, बबिता फोगाट, पूजा ढांडा, अंशु मलिक, सरिता मोर या इतर भारतीय महिला कुस्तीपटूंनीदेखील प्रत्येकी एक पदक या स्पर्धेत मिळवले होते. गेल्या सलग तीन स्पर्धांत भारतीय महिलांनी कुठले ना कुठले पदक या स्पर्धेत मिळवले आहे. पण भारतीय पुरुष पहलवानांची कामगिरी मात्र ढेपाळत चालली आहे.

महिला गटात सारिका, मनिषा, राधिका या तिघींना अवघी एक लढत जिंकता आली तर अंकुश, तपस्या पात्रता फेरीत पराभूत झाल्या. निशू, ज्योती, प्रिया पहिल्या फेरीत गारद झाल्या. पुरुष विभागात फ्री स्टार्ईलमध्ये केवळ सुजित आणि विकीने दोन लढती जिंकल्या. उदित, जयदीप, अमित सलामीला पराभूत झाले, तर रोहित, मुकूल पात्रता फेरीतच बाद झाले. ९२ किलो वजनी गटात दीपकने सलामीची लढत जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात तर भारताची कामगिरी अगदीच सुमार होती. ६० किलो वजनी गटात सूरजने दोन तर ९७ किलोमध्ये नितेशने एक विजय मिळवला. अनिल मोर, सनी, अनिल, अंकित, अमन, राहुल, करण, सोनू यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. पण फ्री स्टार्ईलमध्ये सहभागी झालेल्या ५७ किलो वजनी गटात खेळणाऱ्या अमनचे वजन चक्क १.७ किलो वाढल्याने त्याचा स्पर्धेतूनच पत्ता कट झाला. पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिला गटात विनेश फोगाटबाबतदेखील असाच प्रकार झाला होता. पण तिने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार झाला होता. तेव्हा तिचे वजन अवघे ५० ग्रॅमने वाढले होते. जागतिक स्पर्धेत अमनचे एवढे वजन कसे वाढले हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत संघाचे प्रशिक्षक, डॉक्टर, डायेटीशियन यांची भूमिका तपासायला हवी.

अमन सेहरावतवर एक वर्षाची बंदी
वजन वाढल्यामुळे जागतिक स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्कीची पाळी आलेल्या अमनवर आता अखिल भारतीय कुस्ती महासंघाने एक वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेला तो मुकणार आहे. वजन का वाढले याबाबबत अमनला खुलासा करण्यास सांगितले होते. पण त्यानीे केलेल्या खुलाशात अ. भा. कुस्ती महासंघाला फारसे तथ्य वाटले नाही. त्यामुळे अमनला आता बंदीला सामोरे जावे लागणार आहे. एखाद्या कुस्तीपटूवर बंदी घालण्याची ही अ. भा. कुस्ती महासंघाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. जपान येथे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धेला तो मुकणार आहे. संघासोबत गेलेल्या प्रशिक्षकांना कडी ताकीद देण्यात आली आहे. संघासोबत जमिंदर सिंग, विरेंद्र, नरेंदर, विनोद हे चार प्रशिक्षक गेले होते. यापुढे तरी ते सावध राहतील, अशी आशा करूया.
१९६१पासून भारतीय मल्ल या स्पर्धेत भाग घेत आहेत. जपान, योकोहामा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या उदयचंदने ६७ किलो वजनी गटात फ्री स्टार्ईलमध्ये पहिले कांस्यपदक भारताला मिळवून दिले होते. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण २४ पदके पटकावली आहेत. त्यात सुशील कुमारने मिळविलेल्या एकमेव सुवर्णपदकाचा समावेश आहे. ग्रीको रोमनमध्ये भारतीय पहलवान साफ अपयशी ठरले आहेत, हा या स्पर्धेचा इतिहास सांगतो. अवघे १ पदक ग्रीको रोमनमध्ये भारताला मिळाले आहे. ते एकमेव कांस्यपदक २०१३ साली हंगेरी येथे झालेल्या या स्पर्धैत ६६ किलो वजनी गटात संदीप तुलसी यादवने मिळवले होते. १९६७ साली भारताने या स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन नवी दिल्लीत केले होते. त्यावेळी विश्वंभर सिंगने ६७ किलो वजनी गटात भारतातर्फे पहिले रौप्यपदक मिळवले होते. या स्पर्धेत हेच एकमेव पदक भारताला मिळाले होते. भारताने आतापर्यंत एकदाच या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

२०१९ साली कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करताना पाच पदके पटकावली होती. तेव्हा बजरंग पुनिया, राहुल आवारे, रविकुमार दहिया, दीपक पुनिया, विनेश फोगाट हे पदकविजेते होते. आतापर्यंत बजरंग पुनियाने या स्पर्धेत सर्वाधिक ४ पदके पटकावली आहेत. त्यामध्ये १ रौप्य, ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. २००६मध्ये चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत अलका तोमरने महिला गटात भारतातर्फे पहिले कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या स्पर्धेसाठी क्रेंद्र सरकारने या चमूवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. भारतीय कुस्तीपटू स्पर्धेअगोदर एक महिना आधीच क्रोएशियात दाखल झाले होते. त्यांच्या दिमतीला सर्पोट स्टाफचा भलामोठा फौजफाटा होताच. असे असताना भारतीय कुस्तीपटूंची एवढी खराब कामगिरी का व्हावी? हा सारा मामला एकंदर गंभीर दिसतोय. आता अखिल भारतीय कुस्ती महासंघाने या स्पर्धेतील भारताच्या सुमार कामगिरीबाबत चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकर येईल अशी आशा करुया. पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. निदान त्या स्पर्धेत तरी भारतीय पहलवान आपली कामगिरी सुधारतील, अशी आशा आता भारतीय कुस्तीचाहते करत असतील.