Homeमाय व्हॉईसअमित शाहंच्या मनात...

अमित शाहंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

गेल्याच आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे यावेळी अमित शाह यांनी शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एका पक्षाचे दैवत नसून आमचेही आहे असे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर झाली असा भाजपचा समज असल्याने वारंवार त्यांना सांगावे लागत आहे की, शिवाजी महाराज हे आमचेही दैवत आहे. यापूर्वी भाजपच्या कार्यक्रमात जय भवानी.. जय शिवाजी.. किंवा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.. या घोषणा दिल्या जात नसत. मात्र हल्ली भाजपच्या कार्यक्रमात किंवा समारंभात या घोषणा वारंवार दिल्या जात आहेत.

शिवसेना हा पक्ष शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत असला तरी त्याची संघटनात्मक बांधणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन केल्याने आणि ही संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत पोहोचल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आव्हान अजूनही काही कमी झालेले नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 शिलेदारांना फोडून भाजपने शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असलातरी संघटना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नसल्याचे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या लक्षात आले आहे. लोकसभेतील राज्यातील यशानंतर भाजप नेते अस्वस्थ होते. परंतु विधानसभेत लाडक्या बहिणीने भाजपप्रणित महायुतीला हात दिल्याने महायुतीतील तिन्ही पक्षांचा विजय सोपा झाला. विधानसभेत भाजपला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याने त्यांना आता अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची गरज उरलेली नाही. मात्र अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध मधुर असल्याने त्यांचा कारभार व्यवस्थित चालला आहे. गेल्या अडीच वर्षांतील एकनाथ शिंदे यांची कामगिरी चांगली असली तरी ते फडणवीस आणि अजितदादा यांच्याशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकटे पाडण्यात यशस्वी झाले आहेत.

अमित

हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे गेले चार महिने अस्वस्थ आहेत. राज्यात फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अमित शाह यांनी दोन भेटी दिल्या. या दोन्ही भेटींमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे मांडली. परंतु अद्यापही शिंदे यांना न्याय मिळाला असे वाटत नाही. यापूर्वी पहिल्या भेटीत आपल्याला न मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वपक्षीयही जाब विचारत नाहीत तर एकनाथ शिंदे कसे विचारू शकतात? त्यामुळे थंड डोक्याने अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी पीए सचिन जोशी यांना ईडीची नोटीसही आली. 18 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना मुंबईतील इडी कार्यालयात दिवसभर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर आपल्याबाबत काय चालले आहे हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात यायला हवे होते. परंतु ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली की नाही हे तेच जाणोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना अधिकारीवर्ग विशेषतः आयएएस अधिकारी दाद देत नाहीत. खात्याचे अधिकारी किंवा सचिव फोनही उचलत नाहीत किंवा रिप्लायही देत नाहीत असा अनुभव शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना आला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसापूर्वी एका विभागाची बैठकही लावली होती. परंतु या बैठकीतून फार काही निष्पन्न झाले नाही. कारण, या बैठकीस स्वतः मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांशिवाय फारसे कोणाला गिनत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या इशारावरूनच हे चालले असावे असा एकनाथ शिंदे यांचा ग्रह आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार वाद सुरू आहे. रायगड जिल्हा तटकरे यांच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न अनेक दिवस शिवसेनेचे आमदार करत आहेत. परंतु त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनील तटकरे यांच्या घरी पाहुणचार घेतल्याने स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्यातील त्यांचे शिलेदार अस्वस्थ आहेत. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री तटकरे कुटुंबीयांनाच मिळणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेनेचे आमदार सांगत आहेत.

अमित

अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत नवीन तक्रार होती. आपल्या मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने आपल्या समर्थक आमदारांना निधी मिळण्यास अडचणी येत आहेत. या तक्रारीत तथ्य असले तरी अमित शाह एकनाथ शिंदे यांच्या तक्रारींची फारशी दखल घेतील असे वाटत नाही. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.

संपर्क- 9820355612

Continue reading

उद्धव ठाकरेंचा भाजपकडे काणाडोळा!!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणे अपेक्षित असते. परंतु सर्वाधिक आमदार आणि मंत्री असलेला भारतीय जनता पक्ष यावेळी आनंदात होता. विशेष म्हणजे भाजपच्या एकाही मंत्र्यांवर एकही आरोप या अधिवेशनात झाला नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री...

मराठीवरील मंथनात भाजप उताणी!

वरळी येथील NSCI डोममधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मुंबईतील मराठी माणसांमध्ये चैतन्य पसरले आहे. या मेळाव्यातील भाषणामध्ये नेहमीप्रमाणे राज ठाकरे सरस ठरले. त्यांनी एकत्र येण्याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. याव्यतिरिक्त त्यांनी एकही राजकीय मुद्दा काढला...

ठाकरे बंधुंच्या मनोमीलनामुळे शिंदेंच्या शिवसेनेला फटका!

अखेर राज्य सरकारला अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा जीआर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द करावा लागला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर काढून राज्यातील विरोधी पक्षांना उचकावण्याचा प्रयत्न केला. परंतु हा खेळ त्यांच्याच अंगाशी आला. विशेष म्हणजे हिंदी...
Skip to content