Homeन्यूज अँड व्ह्यूजशरद पवारांना अंधारात...

शरद पवारांना अंधारात ठेवून सुनेत्राताईंनी काय साधले?

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी मुंबईतील लोकभवनात त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही दु:ख अनावर झाले होते. बारामतीत झालेल्या अत्यंस्काराच्यावेळी परत या.. परत या.. अजितदादा परत या, असा आक्रोश करताना, हजारो लोक ओक्साबोक्शी रडताना साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. मग अस्थिविसर्जन होऊन चोवीस तासही झाले नसताना उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी करण्याची घाई का झाली, अशा प्रश्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणाही नेत्याला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. भाजपाच्या कोणाही वरिष्ठ नेत्यानेही अजित पवार यांच्या गटाला थोडं थांबा, असा सल्ला दिला नाही.

अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर पुढे काय होईल याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील अशी चर्चा वेगाने सुरू झाली. दादांच्या जागी कोण, पक्षाची सूत्रे कोणाच्या हाती, उपमुख्यमंत्री कोण अशा प्रश्नांना उधाण आले होते. या प्रश्नांवर पक्ष निर्णय घेईल असे खुबीने उत्तर दिले गेले व पवार कुटुंबीय म्हणून शरद पवारांचा त्यात हस्तक्षेप होता कामा नये यासाठी वेगाने पावले उचलली गेली. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या दिग्गजांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन पुढचा आराखडा तयार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, अशी सावध भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. विधिमंडळ पक्षाची बैठक होण्यापूर्वीच प्रफुल पटेल व भुजबळ यांनी सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या व उपमख्यमंत्री होतील असे संकेत देऊन टाकले. सुनेत्राताईंवर एवढी मोठी जबाबदारी देताना त्यांचीही मान्यताही घेण्यात आली. पण त्यांनी बारामती सोडून मुंबईला निघताना परिवारातील सर्वात मोठा नेता शरद पवार यांच्याशी सल्लामसलत केली नाही, त्यांना विश्वासात घेतले नाही. तसेच पटेल, तटकरे, भुजबळ किंवा मुंडे यांनीही शरद पवारांशी संपर्क साधून हा निर्णय कळविण्याचे सौजन्यही दाखवले नाही. सुनेत्राताईंच्या शपथविधीला शरद पवारांना निमंत्रण नाही हे वृत्त जसे वेगाने पसरले त्यानंतर पवार कुटुंबात आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधे सर्व काही अलबेल नाही हे उघड झाले.

पवार

अजितदादांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद देण्याचे त्यांच्या पक्षाने ठरवले असले तरी शरद पवारांनी काय त्यात खोडा घातला असता की असे करू नका असे म्हटले असते? पण आमच्या निर्णयप्रक्रियेत शरद पवारांची गरज नाही हे त्या चौकडीला दाखवून द्यायचे असावे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार ही बातमी आपणास मीडियातून समजली असे सांगून टाकले. येत्या बारा फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची घोषणा करण्याचे अजित पवारांनी ठरवले होते असे पवार गटाचे नेते गेले तीन दिवस सांगत आहेत. पण अजितदादांच्या पक्षातून ज्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे, त्यांनाच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई झाली होती, अशी चर्चा आता उघड होत आहे.

सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. त्या पराभूत झाल्या. बहिणीच्या विरोधात पत्नीने निवडणूक लढवणे ही चूक होती, अशी कबुली नंतर अजितदादांनी दिली. नंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार झाल्या. अजितदादांच्या अत्यंस्काराच्या वेळी सुप्रिया सुळे या सुनेत्रा यांना धीर देताना दिसल्या. त्याच्यासोबत राहिल्या. मग उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्रा पवार शपथ घेणार, हे शरद पवारांपासून का लपवून ठेवण्यात आले? शरद पवारांचे महाराष्ट्रातील प्रस्थ मोडून काढण्यासाठी भाजपाने अजित पवारांना उत्तेजन देऊन त्यांचा पक्ष फोडला. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद व त्यांच्या पक्षाला दहा मंत्रीपदे दिली. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण ही काळाची गरज आहे असे जरी अजितदादांना वाटत होते तरी ते भाजपाला कसे मान्य होईल? शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची तोडफोड झाल्यामुळेच ठाकरे व पवार कमकुवत झाले. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व नाही हेच भाजपाला व अजित पवार याच्या गटाला यानिमित्ताने दाखवून द्यायचे होते का?

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

स्वतःची ओळख निर्माण तरी करणार कधी सुनेत्रावहिनी?

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर नेतृत्त्वाची कमान सोपवली आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्रालाच शोक अनावर झाला होता. लाखो कार्यकर्ते, मतदार, पक्षसंघटना यांचा पोशिंदा निघून गेल्याची भावना निर्माण झाली....

जनरल नरवणेंच्या पुस्तकातले वादग्रस्त मुद्दे अंधारात का?

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या आत्मचरित्राने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड वादळ निर्माण केले. सरकार आणि प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार हे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही. अप्रकाशित असलेले पण सैन्य दलातील एका उच्चपदस्थाने निवृत्तीनंतर लिहिलेले पुस्तक देशभर सुत्नामी...

कोकणकन्या महापौर रितू तावडे खरंच बांगलादेशींना हुसकावणार?

गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर गावी जन्मलेल्या रितू तावडे मुंबईच्या बिनविरोध महापौर झाल्या आणि शिवसेना (शिंदे)...
Skip to content