राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. याला अपवाद ठरला आहे पुण्यातील द अकॅडमी स्कूल (TAS)चा १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ. हा विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारे ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही गाव, शहर किंवा देशाच्या हवामानाचा अंदाज घेण्यास मदत होईल.
पलाश वाघ म्हणाला की, “इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझे आवडते विषय भूगोल आणि संगणक आहे. या दोन विषयांचा आधार घेऊन मी कोडिंग करण्याचा प्रयत्न केला. हे ॲप जावा स्क्रिप्ट आणि एचटीएमएल वापरून तयार केले आहे. वापरकर्ता इंटरफेस सीएसएसने केला आहे. हे ॲप ॲपप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) नावाच्या सॉफ्टवेअरशी जोडले गेले आहे, जे उपकरणाच्या स्थानानुसार रिअल-टाइम हवामान दर्शवण्यास मदत करते. हे ॲप परिसरातील वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता देखील दर्शवते.”
“विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा प्रयत्न द अकॅडमी स्कूल (TAS) नेहमीच करत असते. शाळेतील अशा वातावरणामुळे पलाश वाघ, या विद्यार्थ्याला हे यश मिळवणं अधिक सोप झालं. प्रात्यक्षिकरित्या विद्यार्थी शिकताना त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर येतात आणि विद्यार्थ्यांना शिकण्यातदेखील आनंद मिळतो. शिवाय, शिकत असताना त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. ‘विद्यार्थ्याद्वारे आणि विद्यार्थ्यांसाठी’ या शाळेच्या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ पलाश वाघ या विद्यार्थ्याच्या कामगिरीतून स्पष्ट होतो.’, असे टीएएसच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या.
पलाश वाघ या विद्यार्थ्याने तयार केलेल्या या ॲपला टास व्यावसायिकरित्या समर्थन देण्यासाठी आणि ते अँड्रॉइड तसेच आयओएस सॉफ्टवेअरवर ॲप स्टोअरवर लॉन्च करण्याची योजना आखत आहे. शाळेमध्ये पलाशला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.