महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे.
‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा…’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना…’ यासारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. गेल्या वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. सुलोचना चव्हाण यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझलगायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती.
सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. या लावणीचे संगीतकार वसंत देसाई होते, तर ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. सुलोचना यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या लावणीचे बोल “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…” असे होते. आचार्य अत्रे यांनीच सुलोचना चव्हाण यांना “लावणीसम्राज्ञी” हा किताब दिला होता. आजही आपल्या सर्वांच्या मनांमध्ये सुलोचनाबाई चव्हाण या अजरामर आहेत, अशा भावना त्यांची नात आरती चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

