भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता ही द्वैवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे.
विधान परिषदेच्या सदस्या डॉ. मनीषा कायंदे, विजय तथा भाई गिरकर, अब्दुल्ला खान दुर्राणी, नीलय नाईक, ॲड. अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील अशी निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे आहेत.
या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, 3 जुलै, 2024 रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 5 जुलै, 2024 अशी आहे. शुक्रवार, 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी 5 वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया 16 जुलै, 2024पर्यंत पूर्ण होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.