मुंबईतल्या चारकोप नाका परिसरातील ७ एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या वैदिक थीम पार्क उद्यानामुळे परिसरातील नागरिकांचा जगण्याचा स्तर उंचावेल. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या पी उत्तर विभागात चारकोप नाका परिसरात ७ एकर क्षेत्रात वैदिक थीम पार्क उभारले जात आहे. याठिकाणी नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) उद्यान, वृक्षारोपण, संरक्षक भिंत व इतर सुविधांचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला. त्यावेळी फडणवीस बोलत होत्या.

खासदार तथा अभिनेत्री हेमा मालिनी, आमदार योगेश सागर, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, पालिकेचे उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वैदिक थीम पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. या ७ एकर क्षेत्रात दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, मी अभिनेत्री असली तरी मला जनतेसाठी कामे करायला आवडते. आज लोकांच्या सेवेसाठी उभारण्यात येत असलेल्या या उद्यानाच्या भूमिपूजन समारंभाला आल्याचे समाधान वाटते. सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी कोविड काळात केलेल्या कामकाजाची आठवण करून देत हेमा मालिनी यांनी त्यांचे कौतुक केले. आपली भारतीय संस्कृती पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या वैदिक थीम पार्कची आवश्यकता आहे. मुंबई सगळ्यांना रोजगार देते, त्यामुळे आपण सगळ्यांनी असे उपक्रम राबवून मुंबईला जपायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

गत ३० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. मात्र इतक्या कमी वेळेत इतक्या मोठ्या भूखंडावर अशा प्रकारचे वैदिक थीम पार्क उभे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि प्रशासनाने ती समस्यादेखील मार्गी लावली. आता येथे लवकरच अतिशय दर्जेदार उद्यान उभारले जाईल, असा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.
मुंबईसारख्या अतिमहत्त्वाच्या महानगरात नागरिकांसाठी इतके सुंदर आणि बहुपयोगी वैदिक थीम पार्क उभारण्याचा संकल्प करणारे पालिका प्रशासन अभिनंदनास पात्र आहे, अशा शब्दात आमदार आशीष शेलार यांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. आमदार योगेश सागर यांनी लवकरच हे वैदिक थीम पार्क मुंबईकरांच्या सेवेसाठी खुले होईल, असा विश्वास व्यक्त केला.

उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी या भूखंडावरील अतिक्रमण निष्काषणपासून तर उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्यापर्यंतचा प्रवास सांगितला. प्रशासकीय पातळीवर आलेल्या अडचणींवर कशी मात केली, याबाबतही त्यांनी माहिती दिली. सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी प्रास्ताविकात वैदिक थीम पार्क संकल्पना समजावून सांगितली. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प हाती घेतला. लवकरच हे उद्यान मुंबईकरांच्या सेवेसाठी खुले करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने ६ जातीची १० ते १२ फूट उंचीची १,२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरु, ताम्हण या झाडांचा समावेश असेल.


