मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवसाच्या लसीकरणासंबंधीची माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेच्या समाज माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे.
देशभरात १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. लससाठ्याच्या उपलब्धतेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आणि तेथे नियोजित सत्रांची माहिती प्रसारमाध्यमांसह मुंबई महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यम स्थळांवरून दररोज सायंकाळी प्रकाशित केली जाते. यामध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांचा समावेश आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना अंमलबजावणीत सुसूत्रता आणता यावी यासाठी आता सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांची कामकाजाच्या दिवशी (म्हणजेच रविवार / लससाठा नसल्यास लसीकरण बंद असल्याचे दिवस वगळून) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमणे दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित करण्यात येईल. उपलब्ध लससाठ्यानुसार ही वेळ असेल. निश्चित केलेल्या वेळेत काही बदल होणार असेल तर त्याची आगाऊ माहिती प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.