Homeहेल्थ इज वेल्थकोविडनंतरही लस घ्या,...

कोविडनंतरही लस घ्या, पण ६ आठवड्यांनंतर!

कोविडला टाळण्यासाठी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर जर कोविड संसर्गाची लागण झाली तर, ६ आठवड्यानंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी. तसेच, रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ६ आठवड्यांनी लस घ्यावी. लस घेण्यापूर्वी जर काही लक्षणे असतील तर लस घेण्याअगोदर चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला डॉ. शेखर साळकर यांनी आज दिला.   

सध्याच्या कोरोना महामारीचे संकट थोपवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी अस्त्र असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. शेखर साळकर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाने पणजीतल्या धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “लसीकरणाची आवश्यकता का?” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. त्यात ते बोलत होते.

कोविड लसीकरणाविषयक कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. महिलांनी मासिक पाळीच्या काळात लसीकरण करून घेणे अगदी सुरक्षित आहे. मात्र, गर्भवती, स्तनदा महिला आणि अ‍ॅलर्जिक व्यक्तींनी लस घेऊ नये, असे शासकीय नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणानंतर सौम्य लक्षणं दिसून येणे ही नियमित बाब आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असून, त्याचे दुष्परिणाम अगदी नगण्य आहेत. तसेच लसीकरणानंतरही कोविडचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे कमी कालावधीत किमान 70% लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे डॉ. साळकर म्हणाले.

लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. ‘टीका उत्सवा’नंतर लसीकरण मोहिमेला गती आल्याचे त्यांनी सांगितले. युवा वर्गाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. त्यामुळे युवावर्गाने १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. साळकर यांनी केले.

लसीकरणानंतरही कोविड अनुरूप योग्य वर्तन म्हणजे मास्कचा नियमित वापर, हातांची स्वच्छता आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर या बाबींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मास्क वापरल्यामुळे संसर्गाचे प्रमाण होण्याची शक्यता ९५%नी कमी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

या वेबिनारमध्ये धेंपे महाविद्यालयाच्या उपप्राचार्या गौरी तांबा याही सहभागी झाल्या होत्या. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

Continue reading

पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीतल्या ‘घोळा’ची याचिका फेटाळली!

पश्चिम बंगालमध्ये 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहिमेदरम्यान मतदारयादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या...

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सूनचा (पाऊस) जोर ओसरण्याची शक्यता असून, पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९२ म्हणजे 'बिलो नॉर्मल' राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने 'एल निनो' प्रभावामुळे हा धोका निर्माण झाला असल्याचे...

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...
Skip to content