सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीतसंयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २८ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता पौडवाल, नितीन तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या खार येथील निवास्थानी झालेल्या या कार्यक्रमात केळकर यांना ५१ हजार रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, अरुणजी स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार होते. ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केले आहे, अशा कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. उत्तरा केळकर यांनी अरुणजींसोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना उत्तरा केळकर म्हणाल्या की, हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते. माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. ते अनिल-अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला. मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे.
हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवासस्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याप्रसंगी उत्तराताईंनी ‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली’ हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले तसेच याप्रसंगी ‘अशी ही बनवाबनावी’मधील गीतकार सुधीर मोघेलिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं ‘कोणी तरी येणार येणार गं’ या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अरुण पौडवाल यांचे निस्सीम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी केले.