Homeमाय व्हॉईसविधानसभेत गाजले गद्दार,...

विधानसभेत गाजले गद्दार, महागद्दार आणि ५० खोके!

विधानसभेमध्ये मंत्रिमहोदयांनी केलेल्या वैयक्तिक स्पष्टीकरणावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि गद्दार, महागद्दार असे उल्लेख झाल्यानंतर ५० खोकेच्या घोषणांनी दहा मिनिटांसाठी गदारोळ माजला.

राज्य मंत्रिमंडळातील सदस्य दादाजी भुसे यांच्यासंदर्भात उर्वरित सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटबद्दल भुसे यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. ते देताना महागद्दार संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात पण चाकरी शरद पवारांची करतात, असे विधान केले. या विधानाला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहाच्या हौदात जमा झाले. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार हेही संतप्त होऊन हौदात धावले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी भुसे यांच्या विधानाला आक्षेप घेत पन्नास खोके, एकदम ओके…च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.

राष्ट्रवादीचे सदस्य हौदात जमले खरे. पण त्यांनी आक्षेप घेतला तो शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचा. वास्तविक, भुसे यांनी पवार यांचा एकेरी उल्लेख केलेला नाही, हेही पुन्हा एकदा स्पष्ट केले. तेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवार यांच्या उल्लेखावरच आक्षेप घेतला. काहीही कारण नसताना पवारसाहेबांचा उल्लेख केला, असे ते म्हणाले.

त्यावर भुसे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केलेला नाही आणि अध्यक्षांनी त्यांचे विधान तपासून बघावे. आक्षेपार्ह उल्लेख असल्यास सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. तसेच, संजय राऊत यांचा उल्लेख महागद्दार असा करताना दादाजी भुसे म्हणाले की, हे महागद्दार आमचा उल्लेख कायम गद्दार असा करतात आणि ते आमच्या मतांवर राज्यसभेत निवडून गेलेले असल्याने ते महागद्दार आहेत. त्या महागद्दाराने ट्विटमध्ये केलेल्या आरोपांची जगातल्या कोणत्याही यंत्रणेने किंवा विरोधी पक्षनेत्यांनी चौकशी करावी आणि त्यात आपण दोषी आढळलो तर आपण केवळ आमदारकी, मंत्रिपदाचा राजीनामाच देणार नाही तर राजकारणातूनच बाजूला होईन, निवृत्त होईन, असे आव्हानही भुसे यांनी दिले. त्याचवेळी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाल्यास राऊत यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा तसेच सामना दैनिकाच्या कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा द्यावा, असेही भुसे म्हणाले.

गद्दार

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुसे यांचे म्हणणे ध्वनिमुद्रण बघून तपासले जाईल आणि आक्षेपार्ह उल्लेख असल्यास काढून टाकला जाईल, हे स्पष्ट केले.

मंत्री शंभुराज देसाई यांनीही भुसे यांचे समर्थन केले आणि पवार यांचा एकेरी उल्लेख केलेला नसल्याचा दावा केला. संजय राऊत आमच्या मतांवर निवडून गेले. ते आम्हाला कायम गद्दार, डुक्कर, गटाराचे पाणी, प्रेते म्हणतात. तुम्हाला असे बोलले तर चालेल काय? भुसे पवार साहेबांना काहीही बोलले नाहीत. ते या महागद्दाराला बोलले. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आमि मग आमच्यावर बोलावे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांनी टीव्ही वाहिन्यांवरून लगेचच बातम्या येतात, त्यामुळे तातडीने भुसे यांचे म्हणणे तपासून बघावे, अशी विनंती केली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी दिवसाचे कामकाज संपायच्या आत आपण ही कारवाई करू, असे स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी काल ट्विट करून दादा भुसे यांनी त्याबद्दलची माहितीही आपल्या स्पष्टीकरणाआधी दिली. दादा भुसे यांनी गिरणा एग्रो कंपनीच्या माध्यमातून १७८ कोटी २५ लाख रूपये गोळा केले आणि कंपनीच्या वेबसाईटवर फक्त एक कोटी ६७ लाख रूपये व ४७ सभासद दाखवले आहे. शेतकरी आता रस्त्यावर आले आहेत. ही लूट आहे. याचा लवकरच स्फोट होईल, असे या ट्विटमध्ये म्हटले असल्याचे भुसे यांनी सांगितले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content