हवाई दल कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) कार्यसज्जतेबाबत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी सत्रादरम्यान संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली.

कार्यसज्जता वाढवण्याच्या गरजेवर भर देत, तिन्ही दलांद्वारे संयुक्त नियोजन करणे आणि कार्यान्वयनाच्या अंमलबजावणीचे महत्त्व राजनाथ सिंह यांनी यावेळी अधोरेखित केले. वेगाने बदलणाऱ्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीचे परीक्षण करण्याचे आणि भारतीय संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे आवाहन त्यांनी हवाई दल कमांडर्सना केले.

हवाई युद्धाच्या क्षेत्रात नवनवीन कल पुढे येत आहेत आणि संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करणे, त्यामधून शिकणे आवश्यक आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. भारताच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी ड्रोन आणि संबंधित हवाई क्षेत्र तसेच हवाई संरक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी आयएएफला केले. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यांच्याशी सामना करण्यासाठी आपण नेहमीच तयार असले पाहिजे, असे ते म्हणाले.

हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतर पूरग्रस्त भागात नुकत्याच झालेल्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाने बजावलेल्या उत्कृष्ट भूमिकेची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या प्रयागराज येथील वायुसेना दिन संचलन आणि हवाई कसरती यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयएएफचे अभिनंदन केले. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यावेळी उपस्थित होते.

या द्वि-वार्षिक परिषदेत सध्याचे भू-राजकीय वातावरण आणि तांत्रिक गरजा लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाचा पुढील मार्ग ठरवण्यावर चर्चा केली. प्रख्यात राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांना परिषदेदरम्यान त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.