राजकारणात मी बराच सीनियर आहे. विविध पदांवर राहून मला 38 वर्षे झाली. राजकारणात 56 वर्षे झाली. पण नुसतं सीनियर होऊन चालत नाही. झाड नुसतं वाढलं म्हणजे चालत नाही. त्याला फळ लागावं लागतं. ते कोणीतरी चाखायला लागतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. कसरत करावी लागते. आत्मपरीक्षण करावं लागतं. आपण आपल्या पदाला कितपत न्याय देतो हे पाहवं लागतं. तुम्ही आज आयएएस अधिकारी झालात. त्यामुळे तुमचे अभिनंदन जरी करत असलो तरी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत करण्याच्या निर्धारात तुम्ही सहभागी होण्यासाठी जात आहात, हे लक्षात ठेवा, असे उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज काढले.
अमोल गवळी आणि अनिता गवळी यांच्या युवा उत्थान फाउंडेशनतर्फे सध्या उत्तीर्ण झालेल्या आणि आयएएस अधिकारी म्हणून निवडले गेलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राणे बोलत होते. पंतप्रधान मोदी 2014 साली पंतप्रधान झाले. त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक अर्थव्यवस्थेत भारत दहाव्या क्रमांकावर होता. आज नऊ वर्षे झाली. भारत पाचव्या क्रमांकावर आला. हा असाच आला नाही. त्यासाठी जिद्द ठेवली गेली, मेहनत केली गेली आणि इतक्यावरच ते थांबले नाहीत तर 2030मध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर येईल, असे स्वप्नही त्यांनी पाहिले आहे. तशा दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. अमेरिका, चीन यांच्यापाठोपाठ आपण जगाच्या नकाशावर दिसणार आहोत. आज अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 56 लाख आहे. चिनचे 36 लाख रुपये आहे. भारत त्यातुलनेत फक्त 1.97 लाख आहे. इतके कमी दरडोई उत्पन्न असताना इतके मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून… याला जिद्द लागते, आव्हान पेलायला लागतं आणि एक स्वप्न लागतं. त्या स्वप्नामध्ये तुम्ही सहभागी व्हायला जात आहात हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.

अधिकारी आणि राजकीय नेते हे प्रगतीच्या रथाची दोन चाके आहेत. देशाचा उत्कर्ष या देशाचा विचारात असतो. एकाच गतीने ते पळले तरच प्रगती होऊ शकते. मी अनेक खात्यांचा मंत्री होतो. अनेक हुशार अधिकारी मी पाहिले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही त्यांना पाहिले आणि एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनाही पाहिले. तुम्ही स्वतः ठरवले पाहिजे की आपण कोणत्या कॅटेगिरीमध्ये राहायला पाहिजे. एक कर्तबगार अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला सतत वाचन करावे लागते आणि तुम्हाला इथे करावे लागणार. आज देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. तरी आजही गरीब हा शब्द पुसला गेलेला नाही. ती गरिबी आपल्याला नष्ट करायची आहे. आपला देश शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवलं पाहिजे. बेकार शब्द पुसला गेला पाहिजे. देशातल्या सर्व उणिवा भरून काढण्यासाठीच आपली नेमणूक झाली आहे. अशी नवीन जबाबदारी घेऊन तुम्ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जेव्हा वाटचाल कराल तेव्हाच तुम्ही अधिकारी म्हणून यशस्वी व्हाल, असेही राणे म्हणाले.

मी आमदार होतो, तेव्हा गाडीतून चौपाटीवरून पुढे चाललो होतो. अचानक ड्रायव्हरने गाडी साईडला थांबवली. मी त्याला विचारले, तू हे का करतोय? तेव्हा त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची गाडी चालली आहे… तेव्हा मी ठरवले की आपणपण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि घरी गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो बाहेर काढला. तो सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल अशा पद्धतीने लावून घेतला. सकाळी उठलो की हा फोटो बघायचो.. अशी महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. माझी कामगिरी सर्व पदांवर उजवी होती. परंतु जबाबदारीने बोलले पाहिजे हे मी माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून शिकलो. सनदी अधिकारी विनम्र असलाच पाहिजे. त्याने समोरच्याची बाजू ऐकलीच पाहिजे. मी नेहमी उलट्या बाजूने फाईल वाचतो. एकदा महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी एका गरिबाला दहा एकर जमीन फुकट देण्याची शिफारस केली होती. मी त्यांना विचारलं, हे तुम्ही का केलं? ते मला म्हणाले, माणूस गरीब आहे. आपण सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे. मी विचारले की, सरकार कोण आहे? फुकट जागा अधिकारी देऊ नाही शकत. ते काम सरकारचं आहे. तुम्ही जशी विनंती करू शकता आणि तशी विनंती करणारी शिफारस करा. आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. आपल्या मताला काही किंमत नसते. आपले मत कायद्याचे असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेला महत्त्व असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाने एक प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर वीस दिवसाने तो प्रत्यक्षात यावा लागतो. मला तो दिसला नाही. मी चौकशी केली. तेव्हा असे कळले की संबंधित विभागाच्या सचिवांनी, त्यावर सहमत नसल्याचे म्हटले आहे. त्यांना बोलवून विचारले.. जेव्हा हा प्रस्ताव मांडला गेला त्याआधी तुम्ही सहमत नाही असे का म्हटले नाही? तुम्ही मंत्रिमंडळाच्या निर्णयापेक्षा वर आहात का? ते म्हणाले.. माझी चूक झाली. मी त्यावेळी त्यांना मेमो देण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी माझ्या घरी आले. परत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याबरोबर मी त्यांच्या वरिष्ठांना फोन करून तो मेमो फाडून टाकण्याचे निर्देश दिले. कायद्याच्या दोन्ही बाजू असतात. त्या तपासाव्या लागतात. राग असला म्हणून धडा शिकवू शकत नाही. कायदा शिक्षा देईल, तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही मनाला येईल तसे वागू शकत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

मी आमदार असताना जाता जाता रस्त्यावर एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. त्यानंतर दोन दिवसांनी मला माझ्या परिसरातील एका पोलिस अधिकाऱ्यांनी दोन कागद हातात आणून दिले. वाचा आणि मला फोन करा… म्हणून त्यांनी निरोप दिला. ते दोन कागद होते- अब्राहम लिंकन यांच्या आत्मचरित्रातली दोन पाने… त्यावर लिहिलेले होते- हे करा आणि हे करू नका. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, रस्त्यावरच्या टपरीवर उभे राहून चहा पिऊ नका. आपल्याकडे जनता पाहत असते. आपले वागणे असे असले पाहिजे की जनतेने आपले नाव काढले पाहिजे. संबंध कसे ठेवायचे? तर त्यातले पावित्र्य टिकवणे महत्त्वाचे. तुम्ही तुमच्या दृष्टीने कर्तबगार वाटणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो समोर ठेवा आणि त्यांच्या दिशेने मार्गक्रमण करा. तुम्ही तुमच्या भावी कारकीर्दीत नक्की यशस्वी व्हाल. आजच्या तरुणांना जे मिळते हे मला माझ्या तारुण्यात कधीच मिळाले नाही. पण म्हणून मी डगमगलो नाही. मी सतत पुढे जात राहिलो. सतत पुढे जात राहिलो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एका टेबलवर बसताना मी पाचव्या क्रमांकावर बसतो. ह्याचा मला आनंद आहे. आनंदाचे क्षण असे असावेत आणि यासाठी जे वागावे लागते, तसे वागायला लागते. अधिकाऱ्याने संवेदनशील असून चालत नाही. संवेदनशीलतेपेक्षा विकासाची, आधुनिकतेची, नव्या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. तरच आपले दरडोई उत्पन्न अमेरिका, चीन, जपान, जर्मनी याप्रमाणे वाढेल आणि आपण पुढे जाऊ. त्यामुळे तरुणांना मी हेच सांगेन की, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा. कोणताही मंत्री तुम्हाला कोणतेही काम, कोणत्याही क्षणी सांगेल. त्यावेळी ते काम करण्याची क्षमता तुम्हाला ठेवावी लागणार आहे. आपल्या देशाचा अभिमान कसा वाढेल याची चिंता करत तुम्ही तुमचे मोठेपण टिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील, वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहआयुक्त प्रेरणा देशभ्रर्तार, सेंसॉर बोर्डाच्या प्रादेशिक विभागाचे प्रमुख अनिल पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर आदींची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. कश्मीरा संख्ये, वसंत दाभोळकर, जानव्ही कुलकर्णी, गौरव कायंदे पाटील, श्रुती शाह, मंगेश खिलारी, सागर खराडे, एम भार्गव, सय्यद मोहम्मद हुसेन, अमित उंदीरवाडे, श्रुती कोकाटे, सिद्धार्थ भांगे, राजश्री देशमुख, महारुद्र भाटे, डॉ. पूजा खेडकर, तुषार पवार, निहाल गोरे, भगीरथी पवार आदी युपीएससी उत्तीर्ण झालेल्या भावी अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. नरेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर अमोल व अनिता गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

