Monday, November 4, 2024
Homeटॉप स्टोरीकाँग्रेसच्या निवडणूक खर्चात...

काँग्रेसच्या निवडणूक खर्चात जाणार आजची इंडिया आघाडीची सभा

भारत निवडणूक आयोगाने काल दुपारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाचा कार्यक्रम तसेच राहुल गांधी यांचे आजचे दिवसभराचे कार्यक्रम आणि संध्याकाळी होणारी शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेचा खर्च प्रचाराच्या खर्चात धरला जाणार आहे. संध्याकाळच्या या जाहीर सभेचे आयोजन मुंबई काँग्रेसने केले असल्यामुळे हा खर्च त्यांच्या खात्यावर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईच्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून त्यात राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबरोबरच सोनिया गांधीही सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारूख अब्दुल्ला यांची उपस्थिती राहणार असल्याचे समजते. तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी तसेच डीएमके व दक्षिणेकडील कोणत्या पक्षाचे नेते या सभेत सहभागी होतात याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सभास्थानी असणार की नाही याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. वंचितला सोबत न घेता निवडणुकीला सामोरे जाण्यावर सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

भारत जोडो न्याय यात्रेचा झाला चैत्यभूमीवर समारोप

दरम्यान, मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली. त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली. मुंबईत भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून या सभेतून इंडिया आघाडी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रियंका गांधी, मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आशिष दुआ, सोनल पटेल, बी. एम. संदीप, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, सचिन सावंत, राजन भोसले, आदी उपस्थित होते.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केले. देशातील सर्व महत्त्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे. परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळकावणाऱ्या अदानींच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानींना देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

धारावी तुमची आहे व तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारचे छोट्याछोट्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कौशल्याचे काम येथे होत आहे. या उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे. बँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी भारताचे उत्पादन हब बनवले पाहिजे. कारण धारावीच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे. देश तुमच्यासारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतो, दलालांमुळे नाही. परंतु आज मेहनत तुम्ही करता व पैसा अदानी घेऊन जात आहेत. आज लढाई कौशल्य व दलाल यांच्यात आहे. आज लढाई धारावी व अदानी यांच्यात आहे. तुम्हाला लुटले जात आहे, जागे व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या की, सरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवत आहे. देशाची वस्तुस्थिती कळावी व जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील १० वर्षांत महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे. परंतु परिस्थिती तशी नाही. जीएसटी व नोटबंदीने देशातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. ४ वर्षांची लष्करी सेवा करुन काय करायचे, अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजपा सरकार गरिबांसाठी काम करत नाही. ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करते.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content