संजय राऊत नुकतेच जेलमधून बाहेर आले आहेत. तेथे राहून कैद्यांकडून काही शब्द ते शिकले आहेत. त्यामुळेच ते रोजच्या रोज ते षंढ, नामर्द, रेडे असे शब्द वापरत आहेत. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहित नाही. येथील जनता काय पचवू शकते ते त्यांनी समजून घ्यावे. कोणाला आव्हान देता? देवेंद्र आणि एकनाथजींना आव्हान देता? ते संयमाने काम करत आहेत. सरकारला संयमानेच काम करावे लागते. त्यांना तुम्ही काय बघितले आहे? त्यांनी मनावर घेतले नाही म्हणून… तेव्हा स्वतःला आवरा, असे इशारावजा आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
शरद पवारांनी राजकारणातून थोडे बाहेर पडावे. जो प्रश्न तुमच्या काळापासून चालत आला आहे, तो मंत्र्यांना तेथे पाठवून सुटणार आहे का? कर्नाटकाच्या सीमेवर फक्त कुस्ती खेळायची आहे का? तुमच्याकडून चांगल्या सूचनांची अपेक्षा आहे. तेव्हा चिथावणीखोर भाषणे करून सीमा भागात अशांतता निर्माण करू नका, असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचा सीमा प्रश्न प्रलंबित असताना सीमा भागात अशांतता निर्माण करणे दोन्ही राज्यांना परवडणारे नाही. कोणतेही सरकार तोडफोड करा, मारामारी करा याला प्रोत्साहन देत नाही. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी असा प्रयत्न कोणतेही सरकार करत नसते. काही समाजकंटक अशी कृत्य करतात आणि त्यांना चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या लोकांकडून उचकावणी मिळते. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्ये कोणी करू नये. संजय राऊतांकडून रोजच्या रोज होत असलेली वक्तव्ये लक्षात घेता ते या षड्यंत्रात सहभागी तर नाहीत ना, असा संशय येतो असेही बावनकुळे म्हणाले.
या प्रश्नावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरीता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी असे आवाहनही त्यांनी केले. संजय राऊत यांचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे तुमचे सरकार होते. तुमचे मुख्यमंत्री होते. तेव्हा तुम्ही काय केले? नवनीत राणा या महिला खासदार फक्त मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार म्हणाल्या… तर त्यांना तुरुंगात टाकून वाईट वागणूक देण्यात आली. वाचली असती चालीसा तर काय बिघडले असते? आल्या असत्या… वाचल्या असत्या… गेल्या असत्या. मग षंढपणा कोणी दाखवला? नामर्दांगी कोणी दाखवली? गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातले राजकीय वातावरण जे गढूळ झाले आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
जी-२० परिषदेचे आयोजन करण्याबाबत केंद्र सरकारने १५ नोव्हेंबरला राज्यातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सूचना करण्यासाठी पत्र पाठवले. दोन वेळा फोनवरून संपर्क साधला. या बैठकीसाठी शरद पवार गेले नाहीत. ठीक आहे… तुमची तब्येत बरी नव्हती. अजित पवारांना पाठवायचे. अडीच वर्षे ते उपमुख्यमंत्री होते. का गेले नाहीत? अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. स्वतः गाडी चालवत प्रकाश आंबेडकरांना भेटले. महाविकास आघाडीची बैठक घेतली. पण, सरकारला काही सूचना केल्या का? नाही. नुसते राजकारण करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. रोजच्या रोज षंढ, मर्दानगी… हे शब्द वापरून जर टीका होत असेल तर भाजपा सहन करणार नाही. भाजपा रस्त्यावर उतरेल. संजय राऊत यांना पुन्हा सांगतो. विषय हमरीतुमरीवर येईल आणि तो कुणालाही आवरता येणार नाही. पाच-पाच वेळा निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही रेडे म्हणाल.. पाच-पाच लाख लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. संजय राऊत कधी लोकांमधून निवडून तरी आले का? आत्मपरीक्षण करा. त्यानंतर वाट्टेल ते बडबडा, असेही त्यांनी सांगितले.
जत तालुक्यातल्या सीमावर्ती भागातील लोकांनी कर्नाटकात सामील होण्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून ४० वर्षे कोणाचे सरकार होते? या सरकारांमध्ये असलेल्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्राचा का विकास केला नाही? विकास फक्त बारामती आणि सांगलीच्या काही भागाचाच कसा झाला? अजित पवार २२ वर्षे मंत्री होते. जयंत पाटील १८ वर्षे मंत्री होते. सरकारमधली ८० टक्के महत्त्वाची खाती यांच्याकडे होती. मग जतसारखा भाग का दुष्काळी राहिला? हे त्यांचे दुःख आहे. त्या दुखण्यापोटी येथील जनता अशा मागण्या करत आहे. त्याला सध्याचे सरकार जबाबदार नाही. किंबहुना मनोहर जोशी, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घ्या. सर्व काही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

