गेल्या काही वर्षांपासुन एक लक्षात आले आहे की, सणासुदीचा मोसम सुरु झाला की झाडून सर्व कपंन्या किंमतीत भरीव सूट देणाऱ्या सेलची जाहिरात करत असतात. मग या सेलमध्ये अगदी झाडू, चप्पलपासून उंची साड्या, ड्रेसेसपर्यंत काहीही मिळते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तर हल्ली केव्हाही सूट मिळत असते, असा अनुभव आहे. अगदी याच तालावर गणपती व नवरात्रौत्सवात विविध पक्षांचे नेते (मग ते जुने असोत की नवोदित) आपले मार्केटिंग करायचे काही विसरत नाहीत. नेत्यांनी मार्केटिंग करू नये, या मताचे आम्ही मुळीच नाही. मार्केटिंग करणे म्हणजे एखाद्या वस्तूत वा माणसात असलेले गुण ‘बढा चढाकर बताना’ असे असले तरी मार्केटिंग करताना मात्र त्यांच्या अंगी नसलेले गुणही खरेदी करणाऱ्याच्या तोंडावर फेकणे हे कसबच मानले पाहिजे, नाही! घाबरू नका मी विषयावरच येत आहे. देवीचा उत्सव, नवरात्र नुकतीच संपली. मात्र, या उत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि ठाणे परिसरात आलेले विविध अनुभव कथन करण्याचा हा आपला प्रयन्त.
“शस्थीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो।
घेऊनी दिवट्या हस्ते गोंधळ घातला हो।।”
म्हणजे देवीच्या नऊ दिवसांतील एकाच दिवशी ‘गोंधळ’ घालायचा असतो. पण आपले राजकीय नेते वर्षभर वा वर्षामागुनी वर्षे विविध प्रकारचे ‘गोंधळ’च घालत असताना दिसत आहेत. निदान जनतेला तरी तसाच अनुभव येत आहे. येत्या एकदोन महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेतच. आता काही आणखी पुढे जाणार नाहीत. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत अनेक राजकीय पक्षांनी वा त्यांच्या नवोदित नेत्यांनी प्रत्येक उत्सवाच्या मंडपात वा रस्त्यात शुभेच्छा आणि स्वागताचा उद्घोष करणारे बॅनर्स लावून काही प्रमाणात देवीचा व मोठ्या प्रमाणावर भक्तांचा कोंडामारा केल्याचे दिसत होते. विरोधी पक्षाला वा गटाला कधीही बरोबर न घेणारे महाभाग या उत्सवाच्या मार्गांवर मात्र शेजारीच विराजमान झालेले दिसत होते. अनेक ठिकाणी तर हे सर्व दाटीवाटीने एकत्र आल्यासारखे वाटत होते तर काही ठिकाणी मात्र नाईलाज म्हणून शेजारी जागा दिल्याचे जाणवत होते.
या सर्वांपेक्षा मराठीबहुल भागात म्हणजे मुंबईतील गिरगाव, दादर प्रभादेवी, चुनाभट्टी ,आग्रीपाडा, दगडी चाळ, २४ टेनामेंट, चेंबूर, गोवंडी, बांद्रा, अंधेरी, मुलुंड, ठाणे शहरातील वागळे इस्टेट, किसन नगर, टेंभी नाका, पाच पाखाडी, आनंद नगर, बाळकूम आदी परिसरातील उत्सव तर जोरदार होतेच, जोडीला नवोदित उमेदवारांनी बरोबर पाच-दहा कार्यकर्त्यांसह अगदी लहान स्वरूपात का म्हणा एक प्रचार मोहीम आखलेली दिसत होती. मग उत्सव समितीच्या प्रमुखांना कधी भाई, कधी भाऊ, कधी दादा, कधी अण्णा, कधी साहेब, असे संबोधून ‘तुमचा आशीर्वाद हवाय’, त्याशिवाय काही होणार नाही. सांगाल ते करू, पण यावेळी सीट आपलीच.. फक्त तुमचा हात डोक्यावर हवाय..’ असं चढवल्यावर कोण फुगणार नाही? पण चेहऱ्यावर मात्र असा कोणताच अविर्भाव न आणता भाई वा भाऊ पाहू, बघतो, अरे ते पण येऊन गेले.. असं सांगून ‘भाव’ वाढवून घेण्याचा प्रयत्न करतो. यावर ‘तुमच्या शब्दाबाहेर नाही भाई, तुम्ही सांगाल ते..’ असं सांगून नवोदित खुंटा बळकट करायचा प्रयत्न करतो. अखेर पाच-दहा मिनिटांच्या चर्चेनंतर मिनी कोला किंवा मिनी मिरांडा येतो व प्रतिनिधी मंडळाची बोळवण होते. यामध्येच देवीचा फोटो व उपरण्याची देवाणघेवाण होते. भाईचा चरणस्पर्श होतो व पुन्हा भेटण्याचे ठरते आणि प्रचाराचा एक अध्याय संपतो.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे दुखणे वेगळेच आहे. कधीकधी तर शिवसेनेचा शिंदे गट व उद्धव गट एकाच उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटत असताना दिसले. (एकत्र नव्हे, नाहीतर उद्या चौकशी..) भाऊ तुम्हाला काय सांगू? पैसा मोप ओततायत. काहीतरी चाप लागला पाहिजे. त्या याला सांगून जरा पाकीट ढिला करायला सांगा. कनवटीला हातच घालत नाही साला… भाऊ सांगतो.. शिवी नको शिवी नको! माफ करा भाई. पण तो वागतोच असा! तिकीटवाटपापर्यंत असा काही नको. नाहीतर वांधा हो.. हो भाऊ. तुमच्या सांगण्याबाहेर नाही, असे शब्द वरचेवर कानावर पडत होते. किमान दहापंधरा ठिकाणी वेगळाच अनुभव आला. भावी नगरसेवक वा सेविकेकडून भक्तांचे स्वागत असे, बॅनर्सही झळकलेले पाहिले. आणखी एक खासियत होती की यावेळी इच्छुक उमेदवार आपली पत्नी वा मुलीसोबत आलेले दिसले. न जाणो मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला तर पुन्हा ओळखपरेड नको. तरी भाऊ-अण्णा म्हणत होते, अरे या गर्दीतून यांना कशाला त्रास दिलात.. अरे वहिनींना वेणी, कॉफी वगैरे द्या.. ताईंशी भेटवा. बेबीला काय हवे ते द्या…
महापालिका निवडणुकीत निदान मुंबई परिसरात तरी शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात चुरस आहे. भारतीय जनता पक्षातही आहे. पण प्रमाण कमी दिसते. त्यांना असे वाटत असावे की शिंदे आणि ठाकरे यांच्या भांडणात आमची बोट किनाऱ्याला लागेल. तसेच अरुण गवळी यांची अखिल भारतीय सेनाही महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेच. जेथे अभासे लढणार नाही तेथे ते कुणाला पाठिंबा देतात यावर निवडणुकीतील यश निर्भर राहील. दगडी चाळीप्रमाणेच आश्विन नाईक यांच्या २४ टेनामेंट देवीचा उत्सवही जोरदार असतो. तेथेही इच्छुकांची गर्दी असते. (नाईक यांच्या घरातूनही दोन नगरसेविका निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या तिकिटावर) दादर प्रभादेवी, माटुंगा भागात त्यांचा थोडा प्रभाव आहे हे मान्यच करायला हवे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा ठाणे हा अभेद्य किल्ला मानला जातो व बऱ्याच प्रमाणात ते खरेही आहे. येथे आता ठाकरे गट सर्व सामुग्रीनिशी हल्ला करणार हे उघड आहे. परंतु सध्यातरी एकनाथराव सरस आहेत, असं मानायला बरीच जागा आहे. मात्र यामुळेच त्यांच्याकडे इच्छुकांची तोबा गर्दी उसळणार हे नक्कीच. येथेच शिंदेंची परीक्षा होईल. कारण भाजपही एकनाथरावांना खाली पडण्याची संधी सोडणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
‘अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा..’ अशी आळवणी एकनाथरावांकडून सातत्याने चालली असावी आणि ही ‘प्रसन्न वदना..’ आपल्यावर प्रसन्न होईलच, असा प्रचंड विश्वास एकनाथरावांच्या चेहऱ्यावर दिसला तर नवल नव्हे. पाहूया.. घोडमैदान जवळ आहे!
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर