ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते बनवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा हे आता बंद होणार आहे. त्यांची दुकानदारी बंद करण्याचे हे काम असल्यामुळे यांची ओरड चालली आहे. जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. २०१८ साली सुमारे २०० रस्त्यांची चौकशी झाली होती. या चौकशीत या रस्त्यांना खालचा लेयरच टाकण्यात आला नव्हता असे आढळून आले. आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने यांची दुकानदारी बंद होणार आहे. इनका गोरखधंदा बंद होगा, यही उनका दर्द है… अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.
मी मुख्यमंत्री असताना एसटीपी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून आणल्या होत्या. परंतु टक्केवारी ठरली नाही म्हणून हे टेंडर काढू शकले नाहीत. आता आमचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेने याच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे क्रेडिट घेण्याचा यांना हक्कच नाही, असे ते म्हणाले. १५ वर्षे ज्यांना ते करता आले नाही ते एसटीपी प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असे कसे म्हणू शकतात? तसे म्हणण्याचा यांना अधिकारच काय, असा सवालच फडणवीस यांनी केला. यांच्या काळात हाती घेण्यात आलेला ब्रीमस्टोवॅड प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे इतर प्रकल्पांवर हे काय बोलणार, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपेत बोलणारे हे लोक आहेत. मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. आणि आता त्याचे उद्घाटनही तेच करणार आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेल्या योजनांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, या बोलण्यात काही तथ्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबईचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला होईल. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा जनसागर येथे उसळेल. त्यामुळे सर्व व्यवस्थेची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

