Homeपब्लिक फिगरसटरफटर लोकांमुळे नाराज...

सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याचा प्रश्नच नाही!

अयोध्येत राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक पावले, तलाकपीडित महिलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा, बाळासाहेबांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्यासाठी काम केले जात आहे. त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजे शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज स्पष्ट केले. आपण कोणावरही नाराज नाही. कोणत्याही सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवेसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, प्रविण दरेकर उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनाच अधिकृत असल्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन शिक्कामोर्तब केले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वावर शिवसेना योग्य मार्गावर आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेत आपण कार्यरत राहणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

१९९८ यावर्षी म्हणजे २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय विश्वासार्हता, मराठी व हिंदुत्व, महिला धोरण तसेच सामाजिक न्याय या प्रश्नावर असणारा एनडीएसोबत असणारा राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. विशेषतः १९८५च्या शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानोला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. त्यामुळे सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो. परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता. राष्ट्रीय स्तरावरील या भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली हा देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित आहेत. शिवसेना-भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे. आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन हे युती सरकार आले आहे. वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेतले. लोकांच्या मनात स्थान मिळाले आहे. शिवसेना व धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र काही जण त्यांच्या समाधानासाठी आपल्या सोयीचा अर्थ काढत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आमची युती भावनात्मक आहे. नीलम गोऱ्हेंनी अतिशय चांगला निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content