Homeमाय व्हॉईसमराठवाड्यात अजूनही बरेच...

मराठवाड्यात अजूनही बरेच ‘वाल्मिक कराड’! तळघरांत कित्येक गुपितांचे अवशेष!!

बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणीचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले. वाल्मिक कराडसह इतर काही आरोपींचा यात समावेश आहे. एकीकडे हे आरोपपत्र दाखल झाले असतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. सुमारे १५/२० दिवसांपूर्वी लिहिल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असा प्रचंड दबाव आणला असल्याचे लिहिले होते. त्या प्रक्रियेचे क्रियेत रूपांतर होण्यास वीस दिवस गेले. अखेर सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्त्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागला. पोलिसांचे आरोपपत्र व जाहीर करण्यात आलेले फोटो हे केवळ निमित्त होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कधीही तोंड न उघडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केल्याने खरंतर अजितदादा मनातून पुरते हादरलेच होते. तुम्ही काही कारवाई करणार नसाल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याचा निर्वाणीचा इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने दादाही संभ्रमात होते. पण हा संभ्रम आरोपपत्र व फोटोंनी क्षणातच दूर केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगाने हालचाल करून मुंडेंना राजीनामा द्यायला भाग पाडले व तूर्त तरी हा अध्याय संपवला आहे.

या एका अध्यायाने एकमात्र झाले की उपमुख्यमंत्री अजितदादा बॅकफूटवर गेले. आता त्यांना आघाडी मिळवायला बराच वेळ लागेल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यन्त बोलकी आहे. ते म्हणतात की, १९९६पासून मुंडे कुटुंबियांनी सुरु केलेल्या हिंसेला आता कुठेतरी पायबंद बसेल अशी आशा वाटते. बाहेर आलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे. खरंतर बीडवासियांनी नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते व समाजधुरीणांनी यावर गांभीर्याने विचार करून काही ठोस पावले उचलण्याची वेळ आलेली आहे.

वाल्मिक

“Fear is the parent of cruelty” आणि या कौर्याला घाबरून समाजाला गप्प करायचे आणि आपला कार्यभाग उरकून घ्यायचा असा शिरस्ता गुंड टोळ्यांमध्ये असतो. तोच दुर्गुण येथे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रकर्षाने दिसून आलेला आहे. या संदर्भातील सर्व लिखाणात या कौर्याचा सतत उल्लेख केला गेला आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनीही शरीरावर २५०पेक्षा अधिक भोसकल्याच्या खुणा असल्याचे जाहीर केले तेव्हाच तमाम महाराष्ट्राला कोर्य काय असते ते समजले होते. मी गुन्हे वार्ताकन व गुंड टोळीयुद्धाचेही वृत्तांत लिहिलेले आहेत. परंतु इतके कौर्य कुठेच पाहिलेले नव्हते. शिवाय यात फरकही आहे. ते गुंड होते व हे राजकीय कार्यकर्ते होते. (वृत्ती मात्र गुंडाचीच होती.) त्यानंतर इंस्टाग्रामवरसुद्धा मुंडे-कराडच्या पिलावळीने घातलेला धुमाकूळही पाहिलेला आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेले असले तरी त्याला म्हणावा तसा अर्थ नाही. कारण अजून एक प्रमुख आरोपी पोलिसांना सापडलेलाच नाही. हा आरोपी फरार असून तो पकडला जाईपर्यंत खटला खऱ्या अर्थाने सुरूच होणार नाही. त्यामुळे विलंबाच्या कारणामुळे एकेक आरोपी जामीनावर सुटण्यास मोकळा आहे. बघूया सरकारी वकील किल्ला कसा लढवतात ते!!

धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्याविरुद्धच्या लढाईत पहिल्या दिवसापासूनच सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आघाडीवर होत्या. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांचेही जनतेने आभार मानले पाहिजेत. एक गोष्ट आवर्जून उल्लेख करण्यासाखी आहे ती म्हणजे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची. एरवी या मॅडम कुणालाही सोडत नाहीत. परंतु वाल्मिक कराड यांनी अंधारे यांच्या नातेवाईकांनाही वाईट प्रकारे छळले होते. काही नातेवाईकांना तर बीड सोडून जाण्यास भाग पाडले होते. स्वतःवरील अन्यायाची धगधगती जुडी टाकून त्यांना हा अग्नी वाढवता आला असता. परंतु स्वानुभवावरून या बड्या धेंड्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही हे जाणून अंधारे यांनी सुमारे तीन महिने शांतता राखली हे कौतुक करण्याजोगेच आहे. (नाहीतर या मॅडम सोलून काढायची वाटच पाहात असतात) अखेर कारवाई झाल्यानंतर मात्र त्यांनी कडवट स्वानुभव सांगितला.

वाल्मिक

“आजची आमची लोकशाही

म्हणजे भडकलेला कंदील

ना पुरेसा प्रकाश आजसाठी

ना पुरेसे आश्वासन उद्यासाठी” (कुसुमाग्रज)

असं हल्लीचं राजकारण आहे. समाजाला आणि विद्वानांना प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहायची सवय झाल्याने (त्यात तथ्यही आहे म्हणा) दादा गटाला शह बसला आहे. आता नजरा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात शिंदे यांचा वाल्मिक कराड कोण याची शोधमोहीम हाती घेतली गेल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. सरकार वा संबंधिताना माहिती पुवणारे बरेच आहेत. असे काही झालेच तर मात्र राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या अनेक जिल्ह्यांत कुणाचा तरी कुणीतरी वाल्मिक कराड असतोच.

खरेतर मराठवाड्यातच अजूनही अनेक वाल्मिक कराड आहेत. बीडचीच गोष्ट सुरु आहे म्हणून सांगतो. तेथील चार-पाच राजकीय नेत्यांच्या बंगल्यांची तळघरं खोदली तर अनेक गायब झालेल्या आणि अद्यापी शोध न लागलेल्या व्यक्तीचे सांगाडे नक्कीच मिळतील असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका बीडवासियाने मला सांगितले. मागे एका लेखात एक आयपीएस सनदी पोलीस अधिकारी बीडमधून गायब झाला होता असे लिहिले होते. त्याचा ठावठिकाणा पोलिसांनाही अजून लागलेला नाही. खरं पाहता पोलीस महासंचालक कार्यालयाने या संबंधात सविस्तर माहितीपत्रक काढणे अपेक्षित आहे. त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीला पोलिसांनी वा सरकारने काय उत्तर दिले हे जाणण्याचा अधिकार जनतेला नाही काय?

वाल्मिक

जाता जाता..

“प्राजक्ताच्या देठावरती रक्त कुणाचे?

रक्त शोषूनी उभे राहते तख्त कुणाचे?

देव आंधळा, सैतानाला लाखो डोळे..

नाडूंनी घेती, गाडून घेती, भक्त कुणाचे” (महेश केळुस्कर)

प्रत्येक ठिकाणच्या वाल्मिक कराडला वेसण घालणारा कुणी तडफदार पोलीस अधिकारी व राजकीय नेता महाराष्ट्राला हवा आहे हे मात्र नक्की!

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content