उद्या, २६ जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक कुंभमेळ्यात भारत आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने एकूण ३५ पदके जिंकली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पदकांचा समावेश हॉकी खेळाचा आहे. भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. १९२८ ते १९५६ या सलग ६ ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्णपदकांचा षटकार मारला होता. गेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करताना १ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य पदके मिळविली होती. आता यंदा पॅरिसमध्ये भारतीय चमू आपली सर्वोत्तम कामगिरी करून पदकांचा आकडा दुहेरी अंकात नेईल अशी आशा कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमी करत असतील.
गेल्या ५ ऑलिंपिक स्पर्धांचा विचार केला तर २०१२च्या लंडन ऑलिंपिकनंतर टोकियोत गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीत चांगलीच सुधारणा केली. कारण लंडननंतरच्या २०१६च्या रियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कामगिरी खालावली होती. अवधी २ पदके भारताला तेव्हा मिळाली होती. त्या तुलनेत टोकियोत भारताने आपली कामगिरी उंचावत आणखी ५ पदके आपल्या खात्यात जमा केली. आता पॅरिसमध्ये भारतीय संघ आपला यशाचा आलेख नक्कीच उंचावेल असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीत बऱ्यापैकी सुधारणा केली आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूंना केंद्र सरकारचे भक्कम पाठबळदेखील मिळत आहे हे विसरून चालणार नाही. यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत ११७ जणांचा भारतीय चमू सहभागी होत आहे. या चमूमध्ये सर्वाधिक खेळाडू अॅथलिटेक्सचे असून त्यांची संख्या २९ आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नेमबाजीचे खेळाडू असून एकूण २१ नेमबाज ऑलिपिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर १९ खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय हॉकी संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या पॅरिस स्पर्धेसाठी अॅथलेटिक्स, नेमबाजी, हॉकी, तिरंदाजी, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, घौडसवारी, गोल्या, ज्युदो, रोईंग, सेलिंग, जलतरण, टेबलटेनिस, टेनिस, बेटलिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांसाठी भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत. गत ऑलिंपिकमध्ये भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राकडून यंदादेखील दुसऱ्या सुवर्णपदकाची आशा करायला हरकत नाही. पहिल्या सुवर्णपदकानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावला असून त्यानंतर प्रमुख जागतिक स्पर्धा, डायमंड लिग स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेमध्येदेखील चमक दाखवताना नीरजने अव्वल क्रमांक सोडला नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर असून तौ पॅरिसमध्ये ९० मीटरच्या पुढे भालाफेक करतो का, याची उत्सुकता आहे. पॅरिसमध्ये सुवर्ण राखणे नीरजसमोर मोठे आव्हान असेल. त्याला जर्मनीच्या मॅक्स, वेबर, पाकिस्तानचा नदीम, ग्रेनेडाचा अंडरसन, झेक प्रजासत्ताकाचा गाकुब आणि भारताच्या किशोर जैना यांच्याशी जोरदार मुकाबला करावा लागणार आहे. आशियाई स्पर्धेत जैनाने ८७.५४ मीटर भाला फेकून रौप्यपदकाची कमाई करून भारतीय अॅथलेटिक्त विश्वात खळबळ माजवली होती.
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने स्टीपलचेस शर्यतीत गेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. परंतु पदकापासून तो खूपच दूर होता. यंदा पदकाच्या जवळपास तो पोहोचतो का, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेल. महिलांमध्ये याच शर्यतीत पारुल चौधरीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. रिले शर्यतीत भारतीय पुरुष आणि महिला चमूने आपल्या कामगिरीत चांगलीच सुधारणा केली आहे. आता पॅरिसमध्ये हे दोन्ही चमू पदकापर्यंत झेप घेतात का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. बॅडमिंटनमध्ये भारताला काही पदके मिळविण्याची चांगली संधी आहे. पी. व्ही. सिंधूकडून तिसऱ्या ऑलिंपिक पदकाची अपेक्षा सारेचजण करत आहेत. तिने पॅरिसमध्ये तिसरे पदक जिंकल्यास ऑलिंपिकच्या इतिहासात तीन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. या अगोदर कुस्तीपटू सुशीलकुमारने दोन पदके ऑलिंपिकमध्ये जिंकली होती. अलिकडच्या काही वर्षांत सिंधूची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे पॅरिसमध्ये तिसरे पदक जिंकण्यासाठी तिचा खरा कस लागणार आहे. तिच्यासमोर आन यग, यामागुची, मरिन, यिंग यांचे खडतर आव्हान असेल.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चिराग शेट्टी, सात्विक रेड्डी यांच्याकडून मात्र हमखास पदकाची अपेक्षा आहे. या जोडीने गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करत विश्वातील बहुतेक अव्वल जोड्यांना नमविले आहे. त्यांना सुरुवातीचा ड्रॉदेखील काहीसा सोपा मिळाला. लक्ष सेन, बी प्रणॉय हेदेखील काही धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. टेनिसमध्ये दुहेरीत रोहन बोप्पणा-युकी भांबरी आणि एकेरीत सुमीत नागल यांच्यावर भारताची मोठी मदार असेल. रोहनचे हे शेवटचे ऑलिंपिक असल्यामुळे तो पदक मिळविण्यासाठी नक्कीच जोरदार प्रयत्न करेल. अॅटलांटा ऑलिंपिकमध्ये लियंडर पेसने भारताला टेनिसमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर मात्र ऑलिंपिकमध्ये भारताची टेनिसची पदकाची पाटी कोरीच राहिली. टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघ प्रथमच पात्र ठरले आहेत. परंतु टेबल टेनिसमध्ये पदक मिळण्याची आशा फारच कमी आहे. कारण भारतीय खेळाडूंना बलाढ्य चीन, कोरिया, जपान, जर्मनी, सिंगापूर, मलेशिया याच्यासमोर खेळायचे आहे.
यंदाच्या ऑलिंपिकचा भारतीय चमूचा ध्वजधारक शरथ कमलचीदेखील शेवटची ऑलिंपिक स्पर्धा असेल. या अगोदर तो चार ऑलिंपिकमध्ये खेळला आहे. तो आणि महिला संघातील अनुभवी खेळाडू मोनिका बत्रा यांच्या कामगिरीकडे टेबल टेनिसमध्ये लक्ष ठेवावे लागेल. मुष्टियुद्ध स्पर्धेत विश्वविजेती निकहत झरीन आणि गत ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती लोव्हलिना यांच्याकडून पदकाची आशा बाळगायला हरकत नाही. नेमबाजीत भारताचा १२ खेळाडूचा चमू सहभागी होत आहे. गेल्या दोन स्पर्धांत भारताची पदकाची पाटी नेमबाजीत कोरीच राहिली आहे. यावेळी पदकाचा अचूक वेध घेण्यात नेमबाज यशस्वी ठरतात का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. मनु भाकर, इशा सिंह यांच्याकडून नेमबाजीत पदकाची आशा बाळगली जात आहे. तिरंदाजीत दिग्गज दिपिका कुमारी आपल्या चौथ्या ऑलिंपिक स्पर्धेत पदकाला गवसणी घालणार का ? तिने जागतिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत खोऱ्यांनी पदके जिंकली आहेत. परंतु ऑलिंपिक पदक तिला नेहमीच हुलकावणी देत आले आहे. यंदा मात्र दिपिकाची ही बहुधा शेवटची ऑलिंपिक स्पर्धा असेल. त्यामुळे ती नवा इतिहास रचणार का, याची उत्सुकता आहे.
हॉकीपाठोपाठ भारताने सर्वाधिक सात पदके कुस्ती खेळात जिंकली आहेत. त्यात २ रौप्य, ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. २००८च्या बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेत भारताने कुस्तीमधील पहिले पदक जिंकले. त्यानंतर आतापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कुस्तीत भारताने कुठले न कुठले पदक मिळविले आहे. यंदा सर्वाधिक पाच महिला खेळाडू ऑलिंपिकमध्ये पात्र ठरल्या आहेत. अमन सेहरावल हा एकमेव पुरुष कुस्तीपटू पात्र ठरला आहे. अनुभवी विनेश फोगटकडून पदकाची मोठी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांतील भारतीय कुस्ती महासंघातील अनेक वाद चव्हाट्यावर आले आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरणदेखील चांगलेच गाजले. या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्तीपटू ऑलिंपिकमध्ये आपला खेळ कितपत उंचावतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल. वेटलिफ्टिंगमध्ये गत स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही एकमेव स्पर्धक पात्र ठरली आहे. यंदा सलग दुसरे पदक जिंकण्यात ती यशस्वी ठरेल का, हीच उत्सुकता तिच्या कामगिरीबद्दल आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने गेल्या टोकियो स्पर्धेत कांस्यपदक मिळवून ४० वर्षांचा हॉकी खेळातील पदकाचा दुष्काळ संपवला होता. यंदा पदक मिळविण्यासाठी भारतीय संघाला कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. १९८०च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१६च्या रियो ऑलिपिकपर्यंत हॉकीत भारताला पदकाने नेहमीच हुलकावणी दिली होती. एका जमान्यात या खेळावर सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या भारतीय हॉकी संघाची अलिकडच्या काळातील कामगिरी मात्र फारशी चांगली झाली नाही. खासकरून पेनेल्टी कॉर्नरचे हमखास गोलामध्ये रुपांतर करणाऱ्या चांगल्या खेळाडूंची उणीव भारताला नेहमीच भासत आहे. तसेच आघाडी घेऊनदेखील शेवटच्या सत्रात प्रतिस्पर्ध्यासमोर भारतीय हॉकी संघाने शरणागती स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. भक्कम बचाव आणि धारदार आक्रमण या खेळाच्या प्रमुख दोन्ही अंगात भारतीय संघ काहीसा कमी पडतो, हेच चित्र बघायला मिळते.
यंदाच्या स्पर्धेत भारताचा ‘ब’ गटात समावेश असून भारताला गतविजेत्या बेल्जियम, उपविजेत्या ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, अर्जेंटिना, आर्यलंड या काही तगड्या संघांशी मुकाबला करायचा आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघासमोर मोठे आव्हान आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आपल्या गटात अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. कर्णधार हरमनप्रित सिंह, गोलरक्षक श्रीजेश, मनप्रित सिंग, अमित रोहिदास, विवेक प्रसाद या अनुभवी खेळाडूंवर भारताची मदार असेल तसेच युवा खेळाडू हार्दिक सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक यांच्या कामगिरीबाबतदेखील उत्सुकता आहे. भारताने या स्पर्धेसाठी एकमेव अनुभवी गोलरक्षक श्रीजेसची निवड केल्यामुळे हॉकी वर्तुळात काहीसा नाराजीचा सूर आहे. या प्रमुख स्पर्धेसाठी दोन गोलरक्षकांची निवड अपेक्षित असल्याचे या खेळातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे राखीव गोलरक्षक असलेला कृष्णा पाठक, श्रीजेश जखमी झाल्यास पॅरिसला रवाना होऊ शकतो. त्यामुळे श्रीजेशवर या स्पर्धेत कमालीचे दडपण येऊ शकते.
केंद्र सरकारने ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी तब्बल आतापर्यंत ४७० कोटी रुपयांचा खर्च केला. त्यावर सर्वाधिक खर्च अॅथलेटिक खेळावर केला असून तो तब्बल ९६ कोटी ६ लाख रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर बॅडमिंटन असून केंद्र सरकारने खेळाडूंच्या तयारीसाठी ७२.७ लाख रुपये भारतीय बॅडमिंटन संघटनेला दिले. केंद्र सरकारने ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी आतापर्यंत तब्बल ४७० कोटी रुपयांचा खर्च केला. त्यावर सर्वाधिक खर्च अॅथलेटिक खेळावर केला असून तो तब्बल ९६ कोटी ६ लाख रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर बॅडमिंटन असून केंद्र सरकारने खेळाडूंच्या तयारीसाठी ७२.७ लाख रुपये भारतीय बॅडमिंटन संघटनेला दिले. भारतीय चमूबरोबर १४० जणांचा सहाय्यक स्टाफ पॅरिसमध्ये दाखल झाला आहे. स्टार खेळाडूंना स्वतःचे प्रशिक्षकदेखील नेण्यास केंद्र सरकारने हिरवा झेंडा दर्शवला आहे. निवड झालेल्या बहुतेक सर्व खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाले आहे. तसेच विदेशातील स्पर्धांचा मोठा अनुभवदेखील त्यांच्या गाठीशी आहे. भारतीय चमूला सर्वाधिक २४ खेळाडू हरियाणाचे असून दुसऱ्या क्रमांकावर पंजाब आहे. त्यांचे १९ खेळाडू आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे खेळाडू आहेत. त्यांची संख्या १५ आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राचे अवघे ५ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये भारतीय चमू सर्वाधिक पदके जिंकून नवा इतिहास रचेल अशी आशा करूया.
खुप सुंदर लेख पॅरिस मध्ये सर्वाधिक पदके मिळावीत हि सद्धीचा
खूपच सुंदर लेख
सर्वाधिक पदके मिळावीत हि इच्छा