विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून गेले वर्षभर सरकारच्या विरुद्ध बाजूला बसणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना तळ्यात की मळ्यात, या पद्धतीने सभागृहात बसवण्यात आले आहे.
अर्धवर्तुळाकार किंवा इंग्रजी सी अक्षराच्या आकारात असलेल्या आसनव्यवस्थेत अध्यक्षांच्या उजव्या हाताला सत्तारूढ पक्ष किंवा महायुती तर अध्यक्षांच्या डाव्या हाताला विरोधी आघाडी सदस्य आसनस्थ होतात. गेले वर्षभर अजित पवार विरोधी पक्षनेते होते. या कारणामुळे राष्ट्रवादीचे सदस्य अध्यक्षांच्या डाव्या हाताला आणि अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्या बरोब्बर समोर बसत होते. पण, आता अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नऊ मातब्बर नेते मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे.

सभागृहातील आसनव्यवस्था कशी असावी, हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात. सामान्यपणे, सभागृहातील बलाबल किंवा संख्याबळ लक्षात घेऊन ते आसनव्यवस्था ठरवतात. पण, सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांची शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा दिलेला असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल संभ्रम असल्याने नवी आसनव्यवस्था अस्तित्त्वात आली आहे.
नव्या आसनव्यवस्थेत महायुतीकडे दोनशेपेक्षा जास्त आमदार असल्याने अर्धवर्तुळाकार रचनेपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाग सत्ताधारी महायुतीने व्यापला जात आहे. परिणामी, सी आकाराच्या रचनेत मध्यभागी म्हणजे अध्यक्षांच्या बरोब्बर समोर राष्ट्रवादीचे आमदार बसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीपैकी काही सरकारमध्ये तर काही विरोधी पक्षात, अशी ही रचना आहे. राष्ट्रवादीतील आमदारांपैकी नेमके कोण कुठे आहे, हे काहींचे अपवाद वगळता अस्पष्टच आहे. त्यामुळे, सर्वांना एकत्रही बसवण्यात आले आहे आणि वेगवेगळेही.
अध्यक्षांनी त्यांच्या पदाच्या अपेक्षेनुसार निष्पक्षपातीपणे ही रचना केलेली असली तरीही राष्ट्रवादीची संदिग्धता मात्र त्यातून स्पष्ट होत आहे. त्याबरोबरच इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे, ही राष्ट्रवादीतील संभाव्य घडामोडही आसनव्यवस्थेतून स्पष्ट होत आहे. पक्षाचा इतिहास लक्षात घेता सत्तारूढ बाकांची संख्याच वाढण्याची शक्यता अधिक दिसते.

