आर्यन खान ड्रग प्रकरणी लाखो रुपयांच्या लाच प्रकरणात ज्याचे नाव घेतले गेले तो पट्टीचा झोलर सुनील पाटील याचे खरे नाव सुनील पाटील नसून सुनील चौधरी आहे आणि तो मूळचा धुळे येथील रहिवासी असल्याची खळबळजनक माहिती सांगली मुक्कामी मिळाली. सांगली मुक्कामी असे मुद्दामहूनच म्हटले. कारण, हा झोलर सुनील पाटील उर्फ चौधरी याने, मी आर. आर. उर्फ आबा पाटील यांचा मानसपुत्र असल्याचे सांगून अनेकांना लुबाडले आहे.
अनायासे कोल्हापूरला जाताना सांगलीला मुक्काम पडला होता. सवयीनुसार लोकांना बोलते करताना सुनील पाटीलबद्दल एकजण काहीतरी बोलून गेला. सुनील पाटीलचे नाव ऐकल्यावर कान आपोआप टवकारले गेले. त्या माणसाला पाहून घेतले. लक्षात ठेवले. अशासाठी की, हा माणूस खर बोलतोय की नाही हे पाहायचे होते. माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी त्याच्याबाबत खात्री दिली. काही वेळाने त्या माणसाला एकटा गाठले. बाजूला घेतले आणि विश्वासाचे चार शब्द बोललो. आणि काय आश्चर्य? सुनील पाटील उर्फ सुनील चौधरीचे जणू विराट दर्शनच मला झाले. मला जे विराटदर्शन झाले तसे ते तुम्हालाही होवो आणि कहाणी सुफळ संपूर्ण होवो हीच इच्छा!
तर मूळचा हा सुनील चौधरी सुमारे 20/25 वर्षांपूर्वी धुळ्याहून एका पिशवीनिशी मुंबईत आला. पिशवीतही काही जास्त सामान नव्हते. दोन शर्ट आणि एक जिनची पॅन्ट आणि काही जुजबी सामान! या भांडवलावर मुंबईत आलेला सुनील आपल्या झोलर कारामतींनी व दुसऱ्यांना टोपी घालण्याच्या जन्मजात स्वभावाने आज कुठल्याकुठे पोहोचला आहे हे पोलिसांनाच माहीत.
तर धुळ्यातून आलेला हा तरुण काही दिवस आमदार निवासात काही आमदारांच्या वळचणीला राहिला. पण, त्याचे मन काही तेथे रमेना. त्याने एक दिवस मंत्रालयासमोरील सुरेशदादा यांचा बंगला गाठला. (सुरेशदादा तत्कालीन मंत्री होते.) सुरेशदादांचा बंगला गाठला. प्रवेश मिळवणे कठीण होते. पण झोलर माणसाला काही कठीण नसते हे पुन्हा एकदा सुनीलने दाखवून दिले. जसा एक साधा कार्यकर्ता म्हणून त्याने बंगल्यात प्रवेश मिळवला तसेच त्याने बंगल्यातील काही कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन बंगल्याच्या किचनमध्ये प्रवेश मिळवला. त्या किचनच्या फरशीवर झोपून काही दिवस काढले.

काही दिवसांनंतर त्याने बंगल्यातील खासगी कर्मचाऱ्यांना घोळात घेऊन काही फोन करण्यास सुरुवात केली. प्रथम प्रथम तो ऑपरेटरकडून फोन मागत असे. कालांतराने एका कॉलमागे 50 रुपये देऊन तो डायरेक्ट लाईनवर फोन करू लागला. झाले येथेच त्याला फोन करून पैसे उकळण्याचा चसका लागला. रात्री बंगल्यात कर्मचारीवर्ग कमी असतो. याचा गैरफायदा घेऊन तो पोलीसठाण्यात फोन करू लागला व डान्स बार आणि लेडीज बारबद्दल माहिती देऊन पोलिसांना हैराण करू लागला.
रात्री पोलिसांना फोन करून माहिती दिलेल्या डान्स बार किंवा बारमध्ये दुपारी जाऊन हा मांडवली करू लागला. या मांडवलीची नशा त्याला चढू लागली आणि आबा जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा तर ही नशा त्याला अधिकच चढू लागली. तो पोलीस हवालदार, निरीक्षक, अधिकारी आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांना झापू लागला. स्वतःला खबरी म्हणवून घेऊ लागला. दरम्यान आबांच्या केबिनमध्ये उठबस असल्याने अधिकाऱ्यांच्या ओळखी होऊ लागल्या. मग तर सुनील हवेतच उडू लागला. परंतु आबांच्या एका कर्मचाऱ्याला त्याचे खरे स्वरूप कळले आणि त्याच्या पार्श्वभागावर लाथ बसली. परंतु तोपर्यंत त्याने बरीच माया जमवली होती.
आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावीशी त्याचे संबंध आले. त्यानंतरच त्यांनी एनसीबी अधिकाऱ्यांशी सबंध जोडले आणि क्रूझ पार्टीवर छापा घालायचा प्लॅन आखला. त्यातील सर्व माहिती आणि न्यायालयात काय काय झाले हे सर्व सर्वांनाच माहीत आहे. सुनील पाटील उर्फ चौधरी माणसांना कटवण्यात अत्यंत पटाईत असून तो उंदरासारखा डोळ्यादेखत लपून बसण्यातही वाकबगार आहे, असे मंत्रालय परिसरात बोलले जाते. अनेकांकडून त्याने हजारो रुपये उकळलेले आहेत. नेहमीच तो माझा ताजमहाल हॉटेलमध्ये सूट बुक असल्याच्या थापा मारत असतो. अनेकदा पैशाच्या व्यवहारावरून त्याला मारहाण झालेली आहे. सध्याही तो चौपाटीनजीकच्या एका हॉटेलमध्ये दडी मारून बसलेला असल्याची माहिती मिळाली आहे. पैसे लावून पत्ते खेळण्याचे व्यसनही त्याला आहे. अशा या सुनीलचे विराट दर्शन तुम्हालाही भावो आणि मुंबई पोलिसांना त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची सुबुद्धी देवो अशी सद्भावना व्यक्त करतो.


त्याची देह बोलीच त्याचे उथळ व्यक्तीमत्व किती गढूळ आहे हे पडद्यावर पहाताना पुष्कळांना जाणवले असणार परंतु लांचेने मोतीबिंदू झालेल्या महाभागांना कसे दिसणार?