कॉर्पोरट क्षेत्रातील धुरिणांनी क्रांतिकारी नवोन्मेषी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांसोबत कार्य करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय हवामान विभागाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात केले. यावेळी त्यांनी “भारताच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करणारे सुरक्षा कवच” म्हणून भारतीय हवामान विभागाचे महत्त्व विशद केले. विकसित राष्ट्रांमध्ये संशोधन सुरू करण्यात आणि निधी पुरवण्यात कॉर्पोरेट क्षेत्राने बजावलेल्या भूमिकेकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या गरजेवर भर दिला.
भारताचे शेजारी देशदेखील आयएमडीच्या तज्ञ माहितीवर अवलंबून असतात असे सांगून मोचा चक्रीवादळाच्या वेळी हे प्रकर्षाने दिसून आले आणि बांगलादेश आणि म्यानमारने त्यासाठी भारताची प्रशंसा केल्याचे सांगत उपराष्ट्रपतींनी आयएमडीचा जागतिक स्तरावरचा प्रभाव अधोरेखित केला. तंत्रज्ञानातील प्रगती ही मुत्सद्देगिरीतील गुरुकिल्ली असून एखाद्या देशाची आर्थिक आणि तांत्रिक प्रगती त्या देशाच्या इतरांबरोबरच्या आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रगतीवर प्रभाव टाकते, असे त्यांनी सांगितले.
“जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत” राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक पैलूवर आयएमडीने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. कृषी उत्पन्नात वाढ असो किंवा कोविड व्यवस्थापन असो तसेच जी 20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन असो, आयएमडीने अतिशय वैविध्यपूर्ण अशा प्रत्येक आघाडीवर आपले योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. आयएमडी आणि इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्यातील समन्वयामुळे आयएमडीला जगातील अग्रणी हवामान विभागांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सहाय्य होत आहे, असे धनखड यांनी सांगितले.
हवामान बदलाचा वाढता धोका लक्षात घेऊन आयएमडीने नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि संशोधन सहयोगाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपत्ती कमी करण्यात आघाडीवर राहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.