गळ्यात कापसाचे हार घालून शुक्रवारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातही घोषणाबाजी केली. पण, सभागृहाबाहेरील निदर्शने काही मिनिटांची तर सभागृहात केलेली घोषणाबाजीही केवळ दोनच मिनिटांसाठी करून विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयीचा क्षोभ आणि कळकळ व्यक्त केली.
प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाकी सर्व विषय बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घ्यावी आणि सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली. नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हा विषय विषयपत्रिकेतील कोणत्याही विषयाशी संबंधित नाही. या विषयावर कालच उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत उत्तर दिलेले आहे. त्यामुळे दोन्ही विषयांचे स्थगन प्रस्ताव मी नाकारत आहे, असे अध्यक्षांनी जाहीर केले.

त्यानंतर विरोधी आमदार जागेवर उभे राहिले आणि घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये म्हणजे हौद्यात जमा झाले. अध्यक्षांच्या आसनासमोर उभे राहून ते घोषणा देऊ लागले. त्यांनी ही निदर्शनेही दोन मिनिटांच्या वर केली नाहीत. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे सुरू झाला.