मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरीडॉरवरील (बुलेट ट्रेन)च्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील भूमिगत स्थानकाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. इथले उत्खनन 30 मीटर खोल म्हणजे 10 मजली इमारतीइतके असून त्याचे सुमारे 84 टक्के काम आधीच पूर्ण झालं आहे. या स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सेवा मजला, असे 3 स्तर असतील. या स्थानकाला रस्ते आणि मेट्रो या दोन्ही प्रकारच्या जोडण्या मिळणार आहेत. प्रवेश आणि निर्गमनासाठी एक मेट्रो स्थानकाजवळ आणि दुसरा एमटीएनएल इमारतीजवळ असे 2 मार्ग असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त जागा, आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट्सची सोय असणार आहे.

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 323 किलोमीटर व्हायडक्टचे काम पूर्ण झाले आहे. 399 किलोमीटर पीयर कामही पूर्ण झाले आहे. पुलाच्या बांधकामातील टप्प्यांमध्ये नदीवरचे 17 पूल, 5 पीएससी पूल आणि 9 पोलादी पूल पूर्ण झाले आहेत. एकूण 211 किलोमीटर ट्रॅक बेड टाकण्यात आला आहे. संपूर्ण मार्गावर 4 लाखांहून अधिक ध्वनीरोधक बसवले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात डोंगरातून जाणाऱ्या 7 बोगद्यांचे उत्खनन सुरू असून बीकेसी–शीळफाटा या 21 किलोमीटर एनएटीएम बोगद्यातल्या 5 किलोमीटर भागाचे काम पूर्ण झाले आहे. सूरत आणि अहमदाबादमधल्या रोलिंग स्टॉक डेपोंचे बांधकाम सुरू आहे. गुजरातमधल्या सर्व स्थानकांवर सुपरस्ट्रक्चर काम प्रगत टप्प्यात असून महाराष्ट्रातल्या 3 उन्नत स्थानकांवर काम सुरू झाले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे पायाभूत सुविधा व वाहतूक मंत्री हिरोमासा नाकानो यांनी काल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सूरत आणि मुंबईत सुरू असलेल्या बांधकामाच्या जागी भेट दिली. सूरतमध्ये ट्रॅकचा स्लॅब टाकण्याचे काम पाहिल्यानंतर त्यांनी रेल साइटवरील ट्रॅकच्या बांधकाम ठिकाणाला भेट दिली. येथे त्यांनी व्हायडक्टवर जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टम बसवण्याच्या कामाची पाहणी केली. अलिकडेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सूरत एचएसआर स्टेशनजवळच्या पहिल्या रूळ सांधेबदल यंत्रणेच्या स्थापनेचे निरीक्षण केले होते. त्याआधी सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाकानो यांचे पारंपरिक गरबा नृत्याने स्वागत करण्यात आले. सूरतचे खासदार मुकेश दलाल, महापौर दक्षेश मावानी, रेल्वे बोर्ड, एनएचएसआरसीएल आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


