मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’चा उत्साहवर्धक पीळदार सोहळा आज, रविवारी १५ डिसेंबरला परळ येथील आर. एम. भट महाविद्यालयाशेजारील कामगार मैदानात रंगणार आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने हर्क्युलस फिटनेसच्या सहकार्याने या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी शेकडो नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग पाहायला मिळेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी व्यक्त केला आहे.
दिवसेंदिवस शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड क्रेझ पाहयला मिळतेय. त्यातच फिटनेसच्या गुलाबी वातावरणात डंबेल्स मारून बेटकुळ्या काढण्याचे प्रमाणही तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेय. अशाच हौशी आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात शरीरसौष्ठवाची आवड वाढावी म्हणून हर्क्युलस फिटनेसने नवोदित मुंबई श्रीच्या निमित्ताने मुंबईकरांचे शरीरसौष्ठव प्रेम उफाळून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नेहमीच खेळ आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी पुढाकार घेणार्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाईने या स्पर्धेच्या आयोजन केले आहे.
नवोदित खेळाडूंना उर्जा मिळावी म्हणून संघटना आणि आयोजकांनी लाखाची रोख बक्षिसेही जाहीर केली आहेत. एकंदर सात गटांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल पाच खेळाडूंना ५, ४, ३, २ आणि १ हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेचा विजेता २१ हजार रूपयांचा मानकरी ठरेल, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई शरीरसौष्ठवाला नवे खेळाडू मिळणार आहेत, हे विशेष. नवोदित मुंबई श्रीच्या विजेत्या आगामी स्पर्धांसाठी प्रोत्साहनासह आर्थिक पुरस्कारही मिळावे म्हणून खुद्द मुंबई श्री आणि महाराष्ट्रचा किताब विजेता रसल दिब्रिटोने पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेतील विजेत्याला त्याने २१ हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करून खेळाला आपलेही आर्थिक योगदान जाहीर केले आहे आणि खेळातील दिग्गज मंडळींनी पुढाकार घेऊन विजेत्या रोख पुरस्कार जाहीर करावेत, असे आवाहनही रसलने केलेय.