Homeएनसर्कलवीजजोडण्या कापण्यास तात्पुरती...

वीजजोडण्या कापण्यास तात्पुरती स्थगिती!

भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारने आज सकाळीच नमते घेतले आणि जोपर्यंत वाढीव बिलाच्या विषयावरील चर्चा होत नाही तोपर्यंत वीजतोडणी थांबविली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्त्वाखाली विधानभवनाजवळ वीज दरवाढीविरोधात निदर्शने केली. वीज दरवाढ रद्द करा, वीजजोडण्या तोडण्याची कारवाई तातडीने थांबवा, दिली गेलेली अवास्तव वीजबिले मागे घ्या, अशा मागण्या त्यांनी केल्या. वीजजोडण्या तोडण्यात आल्यामुळे निरूपयोगी ठरलेले कृषीपंप प्रतिकात्मक दाखविण्यासाठी काही पंपही यावेळी अनेकांच्या हातात होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी जोपर्यंत सरकार वीज दरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला.

विधानसभेचे कामकाज सुरू होण्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसूनही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वीज दरवाढ मागे घ्यावी तसेच वीजजोडण्या तोडण्याची कारवाई ताबडतोब थांबवावी, अशा मागण्यांचे फलक हाती घेऊन ठिय्या आंदोलन केले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून वाढीव वीजबिल तसेच वीजजोडण्या तोडण्याच्या कृतीविरोधात तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. आज ८०-८० कोटींची बिले लोकांना आली आहेत. राज्य सरकारने जनतेला वीजबिलात सूट देण्याची घोषणा केली होती. सूट देण्याचे सोडा, वीजेचे दरच वाढविण्यात आले. इतकेच नव्हे तर फार मोठ्या प्रमाणात वीजजोडण्या कापण्याचे काम चालू झाले. लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या दुकानदारांना त्यांची दुकानेच उघडता आली नाही. त्यांची आज वीजही तोडली जात आहे. त्यामुळे कलम ५७खाली आम्ही चर्चेची रीतसर नोटीस दिली आहे. तेव्हा यावर तातडीने चर्चा करावी, असे ते म्हणाले.

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तशाच स्वरूपाचा एक प्रस्ताव सत्ताधारी पक्षांकडून आला आहे. त्यावरील चर्चेत यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. फडणवीस यांनी त्याला विरोध केला. तो प्रस्ताव कोरोनाबद्दलचा आहे. तो जेव्हा चर्चेला येईल तोपर्यंत आणखी ५० हजार शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या कापल्या जातील, असे ते म्हणाले. सरकारने वीजजोडण्या कापणार नाही असे जाहीर करावे, मग चर्चा केली नाही तरी चालेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

काँग्रेसचे नाना पटोले यांनीही या विषयावर तातडीने चर्चा झाली पाहिजे, असे सांगितले. सरसकट वीजबिले दिली जाऊ नयेत, प्रत्यक्ष पाहणीनंतरच बिले काढावीत, अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. सरकारने वीज तोडण्याचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

वीजजोडण्या तोडण्याच्या विषयावर काँग्रेसने विरोधकांना पर्यायाने भाजपाला दिलेली साथ लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली. ऊर्जा विभागाच्या या विषयावर जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत वीजजोडण्या कापण्याचे काम तत्काळ थांबवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. चर्चेनंतरच यावर निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच आतापर्यंत कापण्यात आलेल्या वीजजोडण्या पुन्हा जोडाव्यात आणि त्या ग्राहकांनाही समान न्याय द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी उपाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला आणि हा विषय संपला.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content