आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही. त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
तांत्रिक शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होत राहावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात कुशल मनुष्यबळाची गरज आहे हे लक्षात घेऊन कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली, असे ते म्हणाले.

रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी व्यवसाय समुपदेशन शिबिरं मोलाची
जास्तीतजास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनीचित्रफित माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजित केले आहे. या मार्गदर्शन शिबिराचा युवक व युवतींना नक्की फायदा होईल. या शिबिरात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचीही एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल.

