धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या प्रकरणांमध्ये ज्यांच्याविरोधात तक्रार असते त्यांना ताकद देणारे नाशिकच्या अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी भगीरथ देशमुख तसेच पोलीस नाईक प्रशांत नागरे यांना तातडीने निलंबित करून त्यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज नागपूर विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.
महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी विश्वासार्हता आहे. परंतु काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलावर नामुष्की येते. याच अधिवेशनामध्ये अहमदनगरच्या एका पोलिस अधिकाऱ्याची सरकारने बदली केली तर त्याविरोधात तिथे प्रचंड मोठा जनसमुदाय रस्त्यावर उभा केला गेला. विरोधी पक्षाचे काही आमदारही यात सहभागी होते. बहुजनांना त्रास देणारे आणि जनतेविरुद्ध कारभार करणाऱ्या काही लोकांना पाठबळ देणारे असेच हे अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी आहेत. या परिसरात आज अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात ते याच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे… काय करायचे ते करा अशी हिम्मत या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कशामुळे येते, असा सवाल त्यांनी केला.
कायद्यापेक्षा आपण मोठे आहोत अशा आविर्भावात हे अधिकारी वावरतात. यांच्याच कारकीर्दीत 2021-22 या कालखंडात खुनाच्या दहा घटना घडल्या. या दोघांकडे बंगले, गाड्या आहेत. इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून, असा सवाल करत नितेश राणे यांनी या दोघांनाही तातडीने निलंबित करून त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय किंवा गुन्हा अन्वेषण खात्याकरवी चौकशी करावी अशी मागणी केली.
या सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाईल. एका महिन्यात चौकशीचा अहवाल मागविला जाईल. त्याचप्रमाणे पोलीस नाईक नागरे यांची ताबडतोब बदली केली जाईल असे आश्वासन दिले.

