बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. या जेतेपदानंतर लगेचच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना विराम द्यायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेली मानाची चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धादेखील रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. त्यामुळे आता खडतर अशा इंग्लंड दौऱ्याला काही दिवस राहिले असताना रोहित शर्माने कसोटी सामन्यातूनदेखील घेतलेला निवृत्तीचा निर्णय त्याच्या चाहत्यांना धक्का देणाराच होता. वास्तविक टी-२०प्रमाणेच कसोटी सामन्यातूनदेखील तो मानाने निवृत्त होईल असाच त्याच्या चाहत्यांचा कयास होता. परंतु अचानक त्याने घेतलेला कसोटी निवृत्तीचा निर्णय भारतीय क्रिकेट संघासाठी काहीसा अचंबित करणारा होता. गेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे यावेळीदेखील तशीच अपेक्षा रोहितचे चाहते बाळगून होते. परंतु आता त्याच्या या निर्णयामुळे त्यांचा आवडता रोहित कसोटी सामने खेळताना दिसणार नाही.

गेली काही वर्षे कसोटी सामन्यांतून रोहितच्या धावांचा ओघ बराचसा आटला होता. न्युझीलंडविरुद्ध प्रथमच भारतभूमीत त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताला प्रथमच “व्हाइट वॉश” स्वीकारावा लागला. जागतिक कसोटी सामन्यांच्या अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला न्युझीलंडविरुद्ध मालिका विजय हवा होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या रोहित शर्माची कामगिरी अधिकच खराब झाली. शेवटच्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय त्याने स्वतःहून घेतला. ऑस्ट्रेलियात भारताला ३-१ अशी मालिका गमवावी लागली. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. कदाचित तेव्हाच तो निवृत्त होणार अशा बातम्या येत होत्या. परंतु त्या बातम्यांचे त्याने खंडन केले होते. आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय निवड समितीला नवा कर्णधार हवा होता. रोहितने आपण पहिल्या दोन कसोटीत नेतृत्त्व करू आणि त्यानंतर कामगिरी कशी होते हे बघून पुढे खेळायचे की नाही अशी अट निवड समितीपुढे ठेवली होती. परंतु या महत्त्वपूर्ण दौऱ्यात असा धोका पत्करण्यास निवड समिती तयार नव्हती. तसेच ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सुरुवात होत असल्यामुळे निवड समितीने रोहितची अट मान्य केली नाही. फलंदाजीत अपयशी ठरत असतानादेखील केवळ कर्णधार म्हणून गेले काही वर्षं त्याचे स्थान टिकून राहिले. त्यामुळे खेळाडू म्हणून आपली निवड आता इंग्लंड दौऱ्यासाठी होणार नाही याची खात्री पटल्यावर रोहितने तडकाफडकी आपल्या कसौटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. काहीसे हे स्वेच्छानिवृत्तीसारखेच झाले असे म्हणावे लागेल.

अलिकडच्या काळात त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ मंदावला असलातरी त्याचे कर्तृत्व मोठेच होते. त्यासाठी रोहितला दाद द्यावीच लागेल. मूळचा मुंबईतला बोरिवलीकर असलेल्या रोहितला द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त दिनेश लाड यांनी घडवले. मुंबईने माधव मंत्री, वाडेकर, उम्रीकर, गावसकर, वेंगसरकर, मांजरेकर, तेंडुलकर याच्यासारखे एकापेक्षा एक सरस फलंदाज भारताला दिले. त्याचाच वसा रोहितने पुढे चालवला असे म्हटले तर वावगे ठरू नये. टी-२० आणि वन-डे या दोन प्रकारच्या सामन्यात रोहितने आपल्या फलंदाजीची जबरदस्त छाप पाडली. परंतु कसोटी सामन्यात मात्र तो आपल्या फलंदाजीला मोठा न्याय देऊ शकला नाही, असे म्हणावे लागेल. टी-२०, वन-डेच्या तुलनेत खूप कमी कसोटी सामने रोहितच्या वाट्याला आले, हेदेखील एक कारण असू शकेल. ३८ वर्षीय रोहित ११ वर्षं कसोटी सामन्यात खेळला. ६७ कसोटी सामने खेळताना त्याने ४३०१ धावा केल्या. त्यामध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता. २१२ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे त्याने काढलेल्या १२ शतकी खेळीत भारताने सर्वच्या सर्व १२ कसोटी सामने जिंकले होते. हादेखील एक विक्रमच आहे. २०१३मध्ये त्याने कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याला मानाची कसोटी कॅप दिली होती. २०२२मध्ये कर्णधार विराटकडून त्याने भारताच्या नेतृत्त्वाची धुरा स्वीकारली. त्याने २४ कसोटीत भारताचे नेतृत्त्व केले. त्यात १२५४ धावा फटकवल्या. ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा त्यामध्ये समावेश होता. कर्णधार म्हणून १३१ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने १२ सामने जिंकले. १ सामना गमावला तर ३ सामने अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. सुनील गावसकरनंतर सलामीवीर म्हणून एकाच कसोटीत दोन्ही डावात शतक काढण्याचा पराक्रम रोहितने केला आहे. २०१९ ऑक्टोबरमध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रोहितने १७६ आणि १२७ धावा केल्या. याच कसोटीत त्याने १३ षटकार लगावले. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जागतिक विक्रम ठरला आहे.

एक कर्णधार म्हणून आपल्या सहकान्यांना तो नेहमीच प्रेरणा देत असे. त्यांच्यामागे ठामपणे उभा राहत असे. मैदानावर कायम आक्रमकता टिकवण्याकडे त्याचा नेहमीच कल असायचा. ड्रेसिंग रुममधील वातावरण नेहमीच हलकेफुलके करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. बऱ्याचदा धोका पत्करायला तो तयार असायचा. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग त्याचा आदर्श. त्याचा मोठा प्रभाव रोहितव्या कारकिर्दीवर पडला. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणूनच त्याची ओळख होती. तो कधीच वातावरणाचे अथवा गोलंदाजांचे दडपण घेत नसे. चेंडू हा फटकावण्यासाठीच असतो या एकमेव उद्देशानेच तो मैदानात उतरायचा. गोलंदाजाच्या टप्पा झटकन ओळखण्यात रोहितची खासियत होती. त्यामुळेच तो फ्रंटफूट अथवा बॅकफूटवर जाऊन गोलंदाजाचा योग्य तो समाचार घ्यायचा. माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेदेखील रोहितला मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य मिळाले. वेगवान आणि फिरकी गोलंदाजी तो दोन्ही उत्तमप्रकारे खेळायचा. चेंडू मैदानाबाहेर भिरकवण्यात त्याचा हातखंडा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक षटकाराची नोंद रोहितच्याच नावावर आहे. म्हणूनच तो काही दिवसांत “हिटमॅन” या टोपणनावाने क्रिकेट वर्तुळात ओळखला जाऊ लागला. रोहितच्या पूल फटक्यांमध्ये एक वेगळीच नजाकत नेहमी बघायला मिळाली. महेंद्रसिंग धोनीनंतर तो भारताचा दुसरा यशस्वी कर्णधार होता असेच म्हणावे लागेल. एवढे यश मिळवूनदेखील रोहितचे पाय नेहमीच जमिनीवर असायचे. त्याने कधीच वादग्रस्त विधाने केली नाहीत तसेच तो कुठल्या वादातही अडकला नाही. पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारले. ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताचा बुजूर्ग अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विननेही अचानक निवृत्ती जाहीर करून भारतीय क्रिकेटमध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. आता तसाच काहीसा प्रकार रोहितबाबत झाला आहे. येत्या इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाला रोहितची उणीव मात्र नक्कीच जाणवेल, यात शंका नाही.