Monday, December 23, 2024
Homeडेली पल्सनेवार सैल झाली..

नेवार सैल झाली..

सत्ता उपभोगण्यासाठी किमान समान कार्यक्रम नावाचा एक नवा उपक्रम मागील वर्षी तीन सत्तापिपासू पक्षांच्या लोकांनी राज्यात राबवला आहे. आता त्यांच्या या किमान समान कार्यक्रमात एकमेकांवर कुरघोडी करणे आणि राज्याच्या विकासात खोडा घालणे हा एकमेव कार्यक्रम तेवढा समान राहिलेला आहे. सत्तालोलुप शिवसेना आणि काँग्रेस पक्षात तर मागील काळात नित्त्यनेमाने उंदरा-मांजराचा खेळ चाललाच आहे. गुळाला मुंगळे चिटकतात त्याप्रमाणे खुर्चीला चिकटलेल्या या मुंगळ्यांचा कुणाचा कुणास मागमूस नसल्याने ते सैरभैर झालेले आहेत. मग कधी कुणी खाट कुरकुरल्याचा आरोप करतो तर कुणी स्वतःच कुरकुर करतो. अशातच आता महामहीम शरद पवारांनी विणलेल्या सत्तेच्या खाटेची नेवार औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावरून सैल झालेली असून, महाविकास आघाडीची विण घट्ट असल्याचा दावा करणार्‍यांचे पितळ उघढे पडले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून जारी करण्यात आली. यामध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयावर जोरदार हल्ला चढवला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे, अशा खरमरीत शब्दात महिती व जनसंपर्क विभागाचे कान टोचत अधिकाराची जाणीव करून दिली. तर, शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, अशी समज बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला दिली. काँग्रेसवर सातत्याने हल्ला करणार्‍या शिवसेनेवर आता काँग्रेसकडून जोरदार पलटवार करत, संताप व्यक्त केला जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असे बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला ठणकावून सांगितले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून राजकारण खेळू नये. आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, अशा शब्दांत थोरातांनी शिवसेनेला कर्तव्याची जाणीव करून दिली. मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची भूमिका, त्यानंतर औरंगाबाद नामांतरणाला जोरदार विरोध, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवाविण्यासंदर्भातले मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिलेल्या कानपिचक्या.. असे एक नव्हे तर अनेक विषय आहेत, ज्या माध्यमाद्वारे काँग्रेसने थेट शिवसेनेला अंगावर घेतले आहे. नव्हे, आता सातत्याने ते वेळोवेळी शिवसेनेला त्यांची जागा दाखवत आहेत. असे असताना, राजकारणातली जुनी खाट कुरकुतेय… अशा शब्दात उपहास करणार्‍या शिवसेनेच्या वाघाने यावेळी मात्र शेपूट घातलेली दिसत आहे. फडणवीस सरकारमध्ये सहभागी असताना भाजपावर रात्रंदिवस गुरगुरणार्‍या या वाघाची यावेळी शेळी झालेली दिसत आहे. शिवराळ भाषा तर सोडा साधे खोचक टोले, चिमटे नव्हे तर, प्रेमाचा सल्लासुद्धा देण्याचे धाडस आता यांच्यात राहिले नाही. शिवसेना स्टाईल अ‍ॅक्शनची अपेक्षा तर यांच्याकडून सोडाच, उलट आता काँग्रेसला गोंजारण्याचा प्रयत्न यांच्याकडून चाललेला दिसतो आहे.

फडणवीस सरकारच्या पूर्ण पाच वर्षांच्या काळात शिवसेनेने आपली सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेने नामांतरणाचा साधा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला नाही. प्रशासकीय कार्यप्रणालीनुसार महानगरपालिकेने ठराव घेऊन तो प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवावा लागतो. मग नगरविकास विभागामार्फत हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जातो. कॅबिनेटने सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन त्या प्रस्तावाला अधिकृतपणे केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर केंद्र सरकार याबाबतची अधिसूचना काढते. आता पाच वर्षे राज्यात सरकारमध्ये असताना यांची महापालिकेतही सत्ता असताना त्या कार्यकाळात नामांतरण का होऊ शकले नाही? तर शिवसेनेचे युवराज सांगतात की भारतीय जनता पक्षामुळे ते होऊ शकले नाही. मुळात तुमची सत्ता असणार्‍या महापालिकेने प्रस्ताव पाठविला होता का? वारंवार सांगून

महापालिका प्रस्ताव का पाठवत नव्हती? हे जनतेला सांगणार का? जर औरंगाबाद महापालिकेने प्रस्ताव पाठविला असेल तर शिवसेनेने त्या प्रस्तावाची प्रत सार्वजनिक करून, देवेंद्र फडणवीसांना उघडे पाडावे. जर शिवसेना सोबत सत्तेत असताना, फडणवीसांनी त्यांच्या महत्त्वाच्या विषयी उदासीनता दाखविली होती. तर मग खिशात राजीनामे घेऊन फिरणार्‍या यांच्या पक्षप्रमुखांनी राजीनामे खिशातून बाहेर का काढले नाहीत? एकूणच काय तर शिवसेनेला काहीही करायचे नाही आणि दुसर्‍याच्या डोक्यावर खापर फोडून आपण नामानिराळे राहून राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न तेवढा करायचा असा धूर्तपणा दाखविताना शिवसेना नेहमी उघडे पडत चालली आहे.

कोरोना विषाणूच्या साथरोगासारख्या उद्वलेल्या गंभीर परिस्थितीत इथली साधीभोळी माणसे कोरोनाशी झुंजत आहेत. घराघरात आबालवृद्ध, लेकरं-बाळं अत्यंत भयभीत मनाने काळजीत आहेत. तर सत्तेचा सोपान चालविण्यासाठी आपमतलबी सत्तातूर मात्र आपल्याच मस्तीत आहेत. राजकारण आणि अर्थकारण यावर अस्थिरतेचे सावट असताना सत्तेतील ही तिघांची टोळकी महाराष्ट्रधर्म सोडून स्वप्नरंजन करत बसले आहेत. हिंदू, हिंदुत्व, शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी माणूस वगैरे-वगैरे यांना केवळ निवडणुका आल्या की किंवा मग स्वतःच्या अंगावर काही संकट आलं की आठवतात. आता महापालिकांच्या निवडणुका आल्याबरोबर औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय आणला ऐरणीवर. भाजपा खासदार भागवत कराड यांनी नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलाची अधिसूचना काढण्याबाबतची उपरती झाली. विमानतळाचे पत्र पाठवताना त्यासोबत जर शहराचे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव पण मुख्यमंत्र्यांनी पाठविला असता तर, खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांप्रती आदर दिसला असता. मात्र, यांचा केवळ महाराजांच्या नावाचा राजकारणापुरता वापर करण्याचा तेवढा उद्देश असल्याने, केवळ विमानतळाचे नाव बदलण्यासाठी पत्र लिहिले. त्याचवेळी शहराच्या नामांतरणावर काँग्रेसचा विरोध असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्तेसाठी लाचार झालेल्यांनी हिंदुत्व तर कधीचेच सोडले असून, आता तर महाराजांसोबतही आपले नाते तोडल्याचे यानिमित्ताने उजागर झाले आहे. छत्रपतींच्या या महाराष्ट्रात जर त्यांच्या अनुयायांना म्हणजे मराठा समाजाला न्याय देऊ शकत नसतील, महाराजांचे नाव एका शहराला देण्यास हतबल होत असतील तर अशा सत्तेचे काय लोणचे घालायचे? महाराजांचे नाव देण्याला विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून खुर्चीला चिकटलेली शिवसेना खर्‍या अर्थाने फितूर झाली आहे. हा छत्रपतींच्या महाराष्ट्रासोबत, महाराजांसोबत, मराठी माणसांसोबत केलेला दगाफटकाच म्हणावा लागेल!

Continue reading

निर्लज्जम् सदा सुखी!

अलिकडेच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला विश्‍वप्रवक्ता म्हणतो, महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेचे अधःपतन झाले आहे. पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देतो आणि...

दिशा मृत्यू प्रकरणात अब होगा न्याय!

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप त्यावेळी होऊ लागला होता. जेव्हा त्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रिकरण गहाळ झाल्याचे समोर आले; सोबतच तिचं...

…. म्हणे महाराष्ट्र थंड का?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे पुरोगामी, सेक्युलर आणि महाराष्ट्राचे स्वयंघोषित ठेकेदार करताना दिसत आहेत. बरोबरही आहे त्यांचं. महाराज हे महाराष्ट्राचे...
Skip to content