Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या...

महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दुकान बंद!

महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव ठाकरे, हा विषय आता संपलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे दुकान आता बंद झाले आहे. लवकरच तेथे लॉकआउट होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केले.

नारायण राणे यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उद्या सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या विविध प्रश्नांना त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तरे दिली. आमदार नितेश राणे तसेच कालिदास कोळंबकर यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते महाराष्ट्राच्या विविध भागांत एकत्रित दौरे करणार असल्याच्या बातमीवर ते म्हणाले की, महाविकास आघाडीने अडीच वर्षांमध्ये जो काही पराक्रम केला तो सांगण्यासाठी हे नेते फिरणार असावेत. या काळात त्यांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांत जेमतेम अडीच तास मंत्रालयात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिव्या घालण्यापलीकडे कोणतेही काम आघाडीच्या नेत्यांकडे सध्या राहिलेले नाही, असेही ते म्हणाले.

खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या सभेत स्थानिक लोकच नव्हते. मुंबई, रायगड, रत्नागिरी येथून लोकांना बोलावून गर्दी जमवण्यात आली होती. खुर्च्यांची रचना अशी मस्त केली होती की, दोन खुर्च्यांमध्ये दोन ते तीन माणसे झोपतील, अशी जागा सोडण्यात आली होती. आपली सभा विराट दाखवण्याचा हा प्रयत्न होता. या सभेबद्दल काय सांगावे? त्यांच्याकडे सांगण्यासारखेच काय नव्हते. काय सांगणार… काय बोलणार… विकासाचा विषय त्यांच्याकडे नाही. जनतेच्या हिताचा काही प्रश्न त्यांच्याकडे नाही. कोकणात झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान अजून दिलेले नाही. त्याचे पैसे देणार की नवीन योजना दिल्या? काय केले का यांनी… जे त्या सभेत सांगणार, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची ताकद आता संपली आहे. जे काही पंधरा आमदार आहेत तेसुद्धा त्यांच्या हाताशी राहत नाही, तशी परिस्थिती आहे. ज्यांची मंत्रालयात यायची ताकद नाही ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत… अहो, त्यांना बोलतानासुद्धा त्रास होतो. वीस पावले ते चालू शकत नाही. आता वयसुद्धा राहिलेले नाही आणि वयात होते तेव्हाही काय करू शकले नव्हते. शिवसेना जेव्हा आक्रमक होती आणि ज्या आक्रमकतेने ती घडली त्या काळात यांनी कोणाच्या कानफटात तरी मारली का? महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांमध्ये असा प्रभाव आहे की जो जनतेत प्रभावी ठरू शकेल, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विरोधकांची जीभ हासडण्याचा इशारा दिला आहे. हे असेच फिरत राहिले तर त्यांची जीभसुद्धा जागेवर राहायची नाही. एकनाथ शिंदे एकटेदुकटे नाही तर चाळीस आमदार सोबत घेऊन गेले. काय केले? यांनी जीभ हासडण्याचे सोडा… हात तरी धरला का कोणाचा? मी शिवसेनेत असताना कोणाची हिंमत होती का पक्ष सोडण्याची, असा प्रश्नही राणे यांनी विचारला.

मी केंद्रीय मंत्री आहे. विविध प्रकारचे उद्योग खाते माझ्याकडे आहे. समाजातल्या विविध स्तरावर उद्योगधंदे वाढवावेत, दरडोई उत्पन्न वाढवावे, हे काम करण्यासाठी लाखो, करोडो रुपयांचा निधी आमच्या मंत्रालयाला मिळतो व त्याचे वाटप केले जाते. देशाच्या एकूण विकासात आमच्या मंत्रालयाचा 30 टक्के वाटा आहे. निर्यातीत आमच्या मंत्रालयाचा 49 टक्के वाटा आहे आणि हे आमच्यावर टीका करणार… अडीच वर्षे जे मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत, त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेणे योग्य तरी आहे का? काही बोलले तर म्हणतात.. घणाघात केला… कसला घणाघात? हात वर नेला तर खाली आणायला तीन मिनिटे लागतात आणि हे घणाघात करणार… काय बोलता तुम्ही? अशा शब्दात नारायण राणे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली.

महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या काळात खोके कोणी जमवले हे एकनाथ शिंदे यांच्या टीमला किंवा माझ्या टीमला विचारा. खोके कलेक्शन मास्टर उद्धव ठाकरेच होते. अडीच वर्षांत कोरोना रुग्णांनाही त्यांनी सोडले नाही. त्यांचे शोषणही करून यांनी खोके जमवले. या काळात कोणत्याही खात्याचे टेंडर निघाले तर त्याच्यातली टक्केवारी खाण्याचे काम ठाकरे कुटूंबच करत होते, असा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे त्यावर विधिमंडळाची समिती कारवाई करत आहे. त्यामुळे आता ते, मी असे बोललो नाही, मी तसे केले नाही असे सांगत वेळ मागत पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत असेही राणे म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content