बुधवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. अशक्तपणा जरूर आहे. परंतु दैनंदिन कामकाज ते करू शकतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात हजर राहण्याचा निर्णय घेतल्याचे या नेत्याने सांगितले.
गेले काही दिवस मुख्यमंत्री आजारी असल्याने आणि त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतपणे कोणीही सांगत नसल्याने एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता. काही वर्तमानपत्रांनी (मुंबईतील नव्हे) राज्य सरकार सुट्टीवर असल्याचा बातम्या दिल्या होत्या, तर मी स्वतः काही दिवस मुख्यमंत्रीपदाचा भार अन्य व्यक्तीवर सोपविण्याबाबत शिवसेनेत विचार सुरू असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. या सूत्रांच्या हवाल्यामागे डॉक्टरांनी पुरवलेली माहितीच होती.
मुख्यमंत्र्यांवरील शास्त्रक्रियेनंतर दोन-चार दिवस नियमितपणे हेल्थ बुलेटिन येत होते. परंतु अचानक ते बंद केले गेले. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या हालचालीबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात होती. साहजिकच पतंगबाजीला काहीसा जोर आला. कारण, कोणीच काही सांगायला तयार नव्हते. अशातच मणक्यावरील शस्त्रक्रिया असल्याने तब्येत बरी होण्यास बराच कालावधी लागणार असे खुद्द डॉक्टरच सांगत असल्याने ‘पादुकांची’ शक्कल पुढे आली. असो. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारत असल्याचे त्यांनी शुक्रवारी विधिमंडळाला भेट देऊन दाखवून दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारो अशी सदिच्छा आहेच. पाच दिवस चालणारे हे हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने झळाळून निघेल यात शंका नाही. परंतु, विधिमंडळाचे कामकाज दीर्घ काळ चालते. इतका वेळ मुख्यमंत्री देऊ शकतील का, ही शंकाच आहे. डॉक्टरांचा चमू त्यांच्यासमवेत असला तरी इतका ताण ते सहन करू शकतील की नाही ही शंका आहेच. मुख्यमंत्र्यांच्या सेवेत इतके तज्ज्ञ डॉक्टर्स असताना सल्ला वगैरे देणे शोभत नाही व आम्ही तो देणारही नाही. परंतु मी फिट अँड फाईन आहे असे दाखवण्याचा ब्रेव्हडो अंगाशी न येवो हीच इच्छा!
काही काळ त्यांनी पूर्ण विश्रांती घेऊन ताजेतवाने व्हावे व विरोधकांशी दोन हात करावेत अशीच सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. तोपर्यंत कारभाराचा प्रभारी कोणाला तरी नेमावे अशी सूचना आली तर लगेचच धुडकावून न लावता त्यावर सांगोपांग विचार करून कृती अपेक्षित आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली तर सोने पे सुहागाच ठरेल. परंतु हे किती किचकट आहे ते फक्त ठाकरे आणि त्यांच्या डॉक्टरांनाच माहीत.. शिवाय विरोधी पक्ष समजूतदारपणे एक वेळ मुख्यमंत्र्यांवर अधिवेशनात निशाणा साधणार नाहीतही. परंतु, इतर मंत्र्यांबाबत विरोधी पक्ष मुळीच समजूतदारपणा दाखवणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मंत्रिमंडळावरील टीका तसेच कारभाराचे वाभाडे पुरेसे तणाव देण्यास समर्थ आहेत. मग, उगाचच परीक्षा कशाला बघायची?
“दुसऱ्याच देखवेना
जळणं नशिबी आलंय
कैदशीन भांडण शोधते
तसं विरोधकांचं झालंय..”
अशी काहीशी राजकीय परिस्थिती आहे हे अमान्य करण्यात हशील नाही. शिवाय काहीच निर्णय होत नाही हे लक्षात आल्यावर त्याचा पहिला गैरफायदा नोकरशाही घेते हे अजून कसे लक्षात घेतले जात नाही, याचेच आश्चर्य वाटते. नोकरशाहीने तोंड फिरवले की सर्वांचीच गोची होणार हे ठरलेलेच! आधीच नोकरशाही आस्तेकदम कामे करत असते. त्यातच राजकीय भांडणे किंवा धोरणलकवा दिसला की त्याचे भयानक परिणाम दिसायला वेळ लागणार नाहीत. म्हणूनच सुचवावेसे वाटते की, मुख्यमंत्र्यांनी चांगली विश्रांती घ्यावी आणि ताजेतवाने होऊन कारभाराला दिशा द्यावी. कदाचित माझे हे मत कोणाला आवडणार नाही. परंतु त्यांना मी फक्त इतकेच म्हणेन..
“वेडावाकुडा गाईन, परी तुझाच म्हणविन!”

