देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाखालील संगीत नाटक अकादमी, या स्वायत्त संस्थेकडून कालपासून 17 एप्रिलपर्यंत विविध सात शक्तिपीठांत ‘शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सव’ नावाचा महोत्सव आयोजित केला आहे.
नवरात्र म्हणजे नऊ देवींच्या सामर्थ्याचे द्योतक मानले गेले असल्याने, अकादमी ‘शक्ती’ या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा करत असून या अंतर्गत देशाच्या विविध भागांत 9 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत सात भिन्न शक्तिपीठांच्या ठिकाणी, मंदिर परंपरा साजरी करणारे कार्यक्रम होतील. कालपासून चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. याचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शक्ती महोत्सवाचा उद्घाटनपर कार्यक्रम गुवाहाटी येथे कामाख्या मंदिर येथे सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील ज्वालामुखी मंदिर, त्रिपुरामधील उदयपूर येथील त्रिपुरसुंदरी मंदिर, गुजरातमध्ये बनासकांठा येथील अंबाजी मंदिर, झारखंडमधील देवघर येथील जलदुर्गा शक्तिपीठ येथे तो सुरू राहील. मध्य प्रदेशात उज्जैनमधील जयसिंगपूर येथील माँ हरसिद्धी मंदिर या शक्तिपीठावर त्याचा समारोप होईल.
रंगमंचीय कलाविष्कारांची राष्ट्रीय अकादमी असणारी संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. देशातील रंगमंचीय कलाप्रकारांचे संरक्षण, त्यांवर संशोधन, त्यांना प्रोत्साहन आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आणि आदिवासी कला तसेच देशातील इतर कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर व्यक्त होणाऱ्या कलेसाठी ही संस्था काम करते.