Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसआज बघा डी...

आज बघा डी आर डी ओची सज्जता!

भारतीय प्रजासत्ताक म्हणजे अनेक राज्यांचा समूह नि त्याची सांस्कृतिक महत्ता, विविधांगी एकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, काय काय सांगावं! याची झलक पाहायची तर सैन्य संचालनासह विविध क्षेत्रातील भरारी दर्शवणारे, सांगणारे चित्ररथ हेदेखील एक वैशिष्ट्य असते. तिन्ही सैन्य दले, त्यांच्या नाना शाखा, चित्तथरारक कवायती, राज्यातील महोत्सव, सण, यासह देशाच्या सर्वोच्च प्रमुखाला दिली जाणारी मानवंदना हे याचे मुख्य आकर्षण! यावेळी कोरोना काळामुळे सर्वच बाबतीत एकत्र जमण्यावर मर्यादा आहेत. मात्र, हे संचालन नेहमीप्रमाणे विविध वाहिन्यांवरून पाहता येईल ही सोय आहे. अर्थात सुट्टी भोगणे हा कार्यक्रम नसेल तर!

भारतीय संरक्षण क्षेत्रात आपले योगदान देत वेगवेगळ्या संशोधनाद्वारे देशाच्या सुरक्षा दलांना हत्त्यारे, संरक्षणात्मक आयुधे, याचा पुरवठा करणाऱ्या डी आर डी ओ अर्थात भारतीय संरक्षण विकास संस्थेच्या अलीकडच्या काही शोधांची माहिती राजपथावरील संचलनात यावेळी दिसणार आहे. अतिप्रगत (ऍडव्हान्स) अत्याधुनिक अशा सुरक्षा तंत्राचे सादरीकरण यावेळी होईल. यंदा आपल्या देशात निर्मित स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान जे खास नौदलाची गरज लक्षात घेऊन बनवले गेले ते ‘तेजस’ कसे उतरते नि आकाशात झेपावते याची झलक पाहता येणार आहे. देशाची एकमेव विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य हिच्यावर हल्लीच नि त्यापूर्वी कारवार येथील ‘हंसा’ तळावर यासाठी अगणित चाचण्या झाल्या. विमानवाहू नौकेच्या तळावरून लढाऊ विमान आकाशात झेपावणे हे चालकाला एकवेळ सोपे पण मर्यादित जागेत ते उतरवून थांबवणे कठीण कर्म असते. यासाठी अशा नौकेवर स्टोबार प्रणाली असते जी विमानाला साखळ दंडात अटकावू शकते, ज्याद्वारे विमानाच्या गतीला अवरोध निर्माण होऊन ते जागीच थांबते. या नौकेवरील जागेची मर्यादा लक्षात घेता याच्या अनेक चाचण्या जमिनीवरील नौकेसमान असणाऱ्या धावपट्टीवर घेण्यात आल्या. नंतर प्रत्यक्षात घेऊन यात मोठे यश मिळवल्याचे नि वैमानिकांनी तंत्र आत्मसात केल्याचे जाहीर करण्यात आले.

नौदलाचे म्हणून ओळखले जाणारे एलसीए विमान यातून पाहण्यास मिळेल. गेल्या वर्षात यात यश मिळवण्यात आल्याने हा एक मानाचा तुरा समजला जातो. स्टोबार म्हणजे स्की जम्प टेक ऑफ बट अरेस्टड लँडिंग. एलसीए हे चौथ्या पिढीतील हलके लढाऊ विमान आहे. नौसेना कमोडोर अभिषेक गावंडे या सादरीकरणाचं नेतृत्त्व करत आहेत. या विमानवाहू नौकेच्या धावपट्टीवर विमान उडवण्यासाठी १४५ मीटरचे अंतर मिळते तर उतरवण्यासाठी अवघे ९० मीटर अंतर वैमानिकाला मिळते. यात अत्यंत कुशलतेने नि सर्व तांत्रिक बाजू सांभाळत विमान उतरवावे लागते.

रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आपण मोठे यश मिळवले आहे. त्याचे ही सादरीकरण देशासमोर केले जाणार आहे. हे सर्व संचलन जगभरात पाहता येणे शक्य असल्याने संपूर्ण विश्व नक्कीच पाहणार! अँटी टँक गायडेड मिसाईल यंत्रणा बघण्यास मिळेल. यात नाग (एन ए जी), हेलिना (एच इ एल आय एन ए), एम पी ए टी जी एम, सेंट (एस ए एन टी) यासह एम बी टी अर्जुनसाठी बनवलेले लेसर गायडेड मिसाईलदेखील दिसेल. याचे नेतृत्त्व हैद्राबाद येथील संशोधन केंद्राचे तरुण वैज्ञानिक शिलादित्य भौमिक करणार आहेत. यातील नाग हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून दुश्मनाच्या अवजड रणगाड्याचा सामना करण्यास विविध यांत्रिक प्रणालीसह भक्कम आहे. हेलिना हे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून डागता येणारे मिसाईल तिसऱ्या पिढीतील असून त्याचा पल्ला सात किमी इतका आहे. त्याचा वापर ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरवरून एकीकृत (इंटिग्रेटेड) मारा करण्यासाठी विकसित केले आहे. पायदळ सैन्यासाठी वापरता येईल असे एमपीएटी जीटीजीएम म्हणजे मनुष्यद्वारा उपयोगात आणता येईल असे अडीच किमी पल्ल्याचे हे क्षेपपणास्त्र आहे. एकाच वेळी वापरून मोठा हल्ला याद्वारे चढवता येऊ शकतो. SANT स्मार्ट स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल जे वायू सेनेच्या MI 35 हेलिकॉप्टरद्वारे मारा करण्यासाठी विकसित केले आहे. तर MBT अर्जुन साठी लेसर गायडेड नि प्रिसीजन गायडेड म्युनिशन अशा पद्धतीचे कवच आहे जे चिलखती वाहनांच्या सुरक्षेसाठी वापरले जाते. अर्जुनाच्या 120 मिमी रायफल बंदुकीद्वारे ते डागले जाते.

यासह भारतीय वायू सेनेच्या देखाव्यात एलसीए तेजस पाहायला मिळेल. हल्लीच हिंदुस्थान एअरोनॉटिकसला तेजस बनवण्याचं कंत्राट दिलं असून काही देशांनी यात खरेदीसाठी स्वारस्य दर्शवल आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे ‘आकाश’ नि हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रही पाहता येईल. सशस्त्र सेनादलांसाठी एक महत्त्वपूर्ण संशोधन संस्था म्हणून डी आर डि ओचे कार्य उल्लेखनीय आहे. सर्व संबंधितांच्या सहकार्याने ‘आत्मनिर्भर भारत’ याच्या अंमलबजावणीत पुढाकार आहे. यासह सर्वच क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देत बलशाली भारताची वाटचाल यशस्वी होत राहो असं म्हणत सर्वांनी एकतेचा जयघोष करत म्हणू या ‘जय हिंद’!

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content