Homeडेली पल्समंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी असे: पंतांना विचारा. अगदी तेव्हाचे राजभवनही यास अपवाद नसे. पंत म्हणजे कायदा पूर्ण कोळून प्यायलेले गृहस्थ. दुसरे म्हणजे त्यांची निरीच्छ वृत्ती. वास्तविक ते अशा पदावर होते की अफाट संपत्ती ते सहज कमवू शकले असते, असे

पंत

आजचे अनेक अधिकारी पाहिल्यावर सहजच वाटून जाते. पण सुपारीप्रेमी पंत यांनी कधीही कोणाच्याही सुपारीच्या खांडाचेही मिंधेपणही स्वीकारले नाही. म्हणूनच त्यांचे म्हणणे कोणीही अमान्य करत नसे. विविध मुख्यमंत्री, कायदेतज्ञ रामराव आदिक, शीघ्रकोपी पतंगराव कदम किंवा कठोर शिस्तीचे द. म. सुखटणकर हेसुद्धा यास अपवाद नव्हते, याचे त्या काळात मंत्रालयात कार्यरत असणारे कर्मचारी आणि वृत्तसंकलन करणारे वार्ताहर प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पंतांचे ‘आत्मभान’ हे छोटेखानी आत्मकथन वाचले की, त्याचा सहज प्रत्यय येतो.

मुंबई उच्च न्यायालयातही विविध प्रकरणांच्या संदर्भात पंतांचा नियमित वावर असे. त्यांनी एखादा मुद्दा शासनाच्या वतीने मांडला की, न्यायालय तो सामान्यपणे उचलून धरत असे. पंतबाळेकुंद्री आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ म्हणजे नगरविकास सचिव डी. टी. जोसेफ यांनी अथक परिश्रम करुन मुंबई नागरी वारसा नियमावली सिद्ध केली. तिला अपेक्षेनुसार आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्यासमोर ही सविस्तर सुनावणी झाली. प्रतिवादी होते गलेलठ्ठ विकासक आणि त्यांचे खंदे वकील. पण पंत सर्वांना पुरून उरले. परिणामी मुंबईचा बराच नागरी इतिहास बचावला. अन्यथा कुलाब्यापासून थेट माहीम-शीव या पट्ट्यात एकही ऐतिहासिक वास्तू वाचू शकली नसती. चहूकडे सिमेंटचे जंगल उभे झाले असते. पंतबाळेकुंद्री आणि जोसेफ ही लढाई एकहाती लढले. या दोघांचे ऋण मुंबई कधीच विसरू शकणार नाही. ही नियमावली आज देशभरातील राज्यांनी जवळपास तशीच स्वीकारली आहे. त्या अभूतपूर्व कामगिरीचा हा अल्पाक्षरी इतिहास या आत्मकथनात शब्दबद्ध केलेला आहे. पंत यांच्या निधनाने एक आदर्श लोकसेवक निजधामास गेला आहे.

Continue reading

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम...

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...
Skip to content