शिवतत्त्व १ सहस्त्र पटीने कार्यरत असणारा दिवस म्हणजे ‘महाशिवरात्री’! शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत. शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ, शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी? आणि शिवाला बेल वहाण्यामागील यांविषयीचे शास्त्रीय विवेचन महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात केले आहे. या लेखात शिवपूजेतील काही विधीनिषेधही जाणून घेऊया.
१. शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पाहणे)
शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते.
शृंगदर्शनाची योग्य पद्धत
वामहस्ती वृषण धरोनि।
तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि।। – श्री गुरुचरित्र, अध्याय ४९, ओवी ४४
सविस्तर अर्थ: नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.
शृंगदर्शनाचे लाभ
शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्तीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्तीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्तीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्या शक्तीशाली लहरी पेलवणे व्यक्तीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे राहवे.
२. शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी?
शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथून चालू होतो. प्रदक्षिणा घालताना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसर्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.
३. शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र
बेलाची वैशिष्ट्ये
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम्।
त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम्।। – बिल्वाष्टक, श्लोक १
अर्थ: तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.
शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र
तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा?- बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.
शिवाच्या तारक रूपाची उपासना करणाऱ्या सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वहावे. (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च।). या पद्धतीत बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते आणि समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.
शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे. शक्तिपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. या पद्धतीत देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्यालाच मिळते आणि व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.
बेल उपडा वहाण्यामागील कारण- बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्या दिवशी चालत नाही.
बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ- आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.
४. शिवपूजेतील काही विधीनिषेध
पांढर्या अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) आणि फुले वहा!– अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्या रंगाच्या अक्षता वहा. त्याचप्रमाणे शाळुंकेला निशिगंध, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १०च्या पटीत त्यांचे देठ पिंडीकडे करून वहावीत.
उदबत्ती आणि अत्तर वापरा!- उदबत्ती आणि अत्तर यातून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे.
हळद-कुंकू वाहू नये!- हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये.
शिवाला वाहिलेला बेल इत्यादी अग्राह्य!- शिव वैराग्यदायी आहे. शिवाला अर्पण केलेले ग्रहण केल्यास वैराग्य येऊ शकते.
या लेखात सांगितल्याप्रमाणे शिवाच्या उपासनेमागील शास्त्र समजून आणि त्यानुसार कृती करून, शिवभक्तांनी अधिकाधिक शिवतत्त्वाचा लाभ करून घ्यावा, ही भगवान शिवाच्या प्रार्थना!
संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’
संपर्क क्र.: 9920015949