Homeमुंबई स्पेशलराज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत...

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मुंबईतल्या रिया साहिसचे सुयश

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुलाबा महापालिका उच्च प्राथमिक शाळेतील सातवीची विद्यार्थिनी रिया बप्पी साहिस हिला ७,५००/- रूपयांचे विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

चर्चगेट परिसरातील पाटकर सभागृहात नुकत्याच आयोजित झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारच्या संबंधित खात्याचे ज्येष्ठ अधिकारी सुब्रता मंडल यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन रिया साहिस हिच्या कलेचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी जी. जी. वाघमारे, कला क्षेत्रातील ज्येष्ठ प्राध्यापक नितीन केणी, पूनम परुळेकर, मीरा सावंत यांच्यासह राज्यभरातून आलेले पुरस्कारविजेते विद्यार्थी व संबंधित शिक्षक उपस्थित होते.

राज्यभरातून १ हजार ३००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. रिया हिने १८ X २४ इंच आकाराच्या ‘हाफ इम्पिरियल’ प्रकारच्या कागदावर ‘ऑईल पेस्टल’ प्रकारचे रंग वापरुन हे अर्थवाही चित्र काढले होते, असे तिच्या कला शिक्षिका मीरा बोडके यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १ हजार १००पेक्षा अधिक शाळांपैकी ए विभागातील ‘कुलाबा उच्च प्राथमिक इंग्रजी शाळा’ ही एक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग असून यामध्ये १ हजार ५६३ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. या शाळेत ४० शिक्षक असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ५ आहे. या शाळेमध्ये नियमित शिक्षणासोबतच कलागुण विकास केंद्र, संगणक वर्ग, व्हर्च्युअल क्लासरुम, संगीत वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा वर्ग आदी सोईसुविधा आहेत, अशीही माहिती शाळेकडून देण्यात आली.

महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी, कुलाबा महानगरपालिका उच्च प्राथमिक इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आरिफ शेख, विभाग निरिक्षिका सुजाता हुलवान आणि शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रिया साहिसला शुभेच्छा दिल्या आहेत.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content