Sunday, December 22, 2024
Homeमाय व्हॉईसअन्य भाषांचा आदर...

अन्य भाषांचा आदर करा नि स्वभाषेवर प्रेम!

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसी
मराठीचे वैभव नित्य जोपासण्याचे कर्तव्य!
इंग्रजीसह अन्य भाषा स्वीकारा
पण आईचा भक्कम आधार व्हा!

गेल्याच रविवारी जागतिक मातृभाषा दिन झाला. आता आज, शनिवारी आपण ‘माय मराठी दिन’ साजरा करत आहोत. विख्यात कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांची जयंती हा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा होतो. काहीजण तो पाळतात! वरच्या संस्कृत सुभाषितचा अर्थ असा, जननी आणि जन्मभूमी निसर्गतःच आपल्याला वारसा रुपात प्राप्त होते, तसेच मातृभाषेचे आहे. हेही एक वैभव आपण जन्माला आल्याने आपसूकच मिळवतो. घरात बोलली जाणारी भाषा हीच त्या माणसाला शिकावी लागत असल्याने ती मातृभाषा ठरते. या देशात मातृभाषांची संख्या १६५२च्या आसपास सांगितली जाते. काही भाषेत अन्य भाषा मिळूनही नवी भाषा तयार झाल्याचे अभ्यासक सांगतात. काळाच्या बरोबर काही भाषा लयास गेल्यात. संस्कृत ही मूळ जननी सांगितली जात असली तरी अनेक भाषेत शब्दांचे अपभ्रंश होऊन भाषेत बराच बदल दिसतो. काही वेगळे शब्द, त्याची उच्चाराची ढब बदलते, त्यालाच आपण कोसावर भाषा बदलणे असे म्हणतो.

वस्तुतः देश इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाला असला तरी जगाची भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारणे अपरिहार्य ठरले. कारण इतर देशांप्रमाणे आपली एकाच भाषा नव्हती. अन्य देशात इंग्रजी असली तरीही त्यांनी मूळ भाषा सोडली नाही. त्यांचे व्यवहार, कारभार त्यांच्याच भाषेत चालतात. देशाच्या इतर प्रांतातून उत्तर भागातील आलेल्या लोकांना जोडण्याची भाषा म्हणून आपण हिंदीला, सहज डोक्यावर बसवून घेतलं ते देवनागरीने मी जवळची भाषा म्हणून! आज राज्याच्या बहुसंख्य भागात हिंदीचा सर्रास वापर होतोय. याला जबाबदार आपण कसे याचे उगळणं अनेकदा उगाळलं जातं. मराठी सक्तीचा वापर आपले आपणच धुडकावून लावत असतो नि भाषेवरच्या अतिक्रमणाचा गळा काढून रडतो. प्रत्यक्ष कृतीची जोड नसतेच. चर्चा, परिसंवाद, शासन दरबारी निवेदने इतकेच मराठी प्रेम आपल्याला उरलंय. आपणच गुलाम म्हणून जगायचं ठरवलंय त्याला कोण काय करणार? मतांच्या बेरजा वजाबाक्या करत, राजकारण साधत बसलोय इतर राज्याचे गोडवे गात. साधा 80% मराठी माणसाला सक्तीची नोकरी इतका आदेश नाही काढू शकलो, आपण साठ वर्षांत! इतकं केलं असतं तरी आजचे लोंढे नि त्यावर गळा काढायची वेळ आली नसती.

विभिन्न प्रांत, सांस्कृतिक रचना, भाषा वेशभूषा, रिवाज अशी विविधता आढळते. जिल्हा गावात भाषेत बदल प्रत्यक्ष बोली भाषा नि लिहिण्याची व्यवहार भाषा यात तफावत आहेच. अलिकडच्या तरुण पिढीत फार कमी असतील जे आपल्या बोली भाषेत इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्दांचा वापर न करता सलग चार वाक्ये बोलू शकतील. इंग्रजी, हिंदीचे वाढते आक्रमण हाही चिंतेचा विषय आहे. नवीन गोष्टी शिकताना जुन्याचे विस्मरण किंवा अनादर करणे हे एक नवे ‘फॅड’ म्हणजे प्रघात, रिवाज सर्वत्र बोकाळलाय. जपानी, फ्रेंच, जर्मन, रशियन यासह विविध भाषा शिकणे यात गैर काहीच नाही. उलट नवं शिकण्याची हौस रोजगार संधी, संपर्क यासाठी ती उपयुक्त आहे. परराष्ट्र व्यवहार नीती पाहता हे कौशल्य देशाच्या उपयोगी पडू शकते. काही दिवसांपूर्वी यु ट्यूबवर एका कार्यक्रमात एक ललना जिला विविध प्रकारच्या १६-१७ भाषा येतात हे ऐकले नि ती ते चक्क मराठी भाषेत व्यक्त करत होती. असे भाषिक कौशल्य जरूर असावे यासाठी मराठीला तिलांजली देऊ नये!

देशोदेशीच्या शिक्षण तज्ज्ञांनी मातृभाषेत व्यक्त होण्याची ताकद जबरदस्त असते असे निष्कर्ष नोंदवलेत. मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा अट्टाहास जरूर करा, पण घरची भाषा बाहेर उभी करू नका. मातृभाषेतील शाळांचा दर्जा यामुळेच खालावतो आहे, याला आपली जबाबदारी का मानत नाही आपण? आपल्याला बाहेर आपल्या भाषेत चटकन बोलणे कमीपणाचे का वाटते हेच कळत नाही. हेच गंभीरपणे घेतले पाहिजे. मम्मी, पप्पा, डॅडी, मॉम यासह अन्य रितीरिवाज सहजतेने स्वीकारत चाललो आहोत आपण. ऐंशी टक्के मुले आज इंग्रजी शिक्षण घेत आहेत. आपल्या भाषेची गोडी लागत नाही. इंग्रजीत लक्ष घालत नाहीत. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या, अशी गत. कारण आई-वडिलांच्या आग्रहाखातर मूल इंग्रजी शाळेत, त्याच्या डोक्याचा भुस्कट! माय मराठी समृद्ध आहे. अलीकडच्या पिढीला त्याची फारशी माहिती नाही. घरात कोणाला वाचनाची आवड नाही. जे वाचलं जाईल ते काय आहे हे मुलांना सांगितलं जात नाही. त्यामुळे पुलं, कुसुमाग्रज, साने गुरुजी, केशवसूत, आचार्य अत्रे आदी दर्जेदार सकस साहित्य मराठीत बी ए करणारे वगळता कोणी वाचत असेल याची सूतराम शक्यता नाही. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम, आदी वाचन करणारे तर दूरच! हे सर्व पवित्र ग्रंथ वाचणे हे वृद्धावस्थेतलं काम अशी समाजाचीही धारणा आहे. ती बदलणे गरजेचे आहे.

खरं पाहता वळवावी तिकडे वळणारी लवचिक, पण तितकीच अमृताहून गोड अशी मराठी भाषा असा लौकिक टिकवायची जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायची हा मोठा प्रश्नच आहे. सरकार, सामाजिक संस्था – मंडळे एक दिवस उपक्रम राबवून मोकळे होतात. बोली भाषा म्हणून सध्या तरी मराठीला ‘प्रॉब्लेम’ होण्याची ‘पॉसिबिलिटी’ नसली तरी ‘इन फ्युचर’ काही सांगता येत नाही. अनेक म्हणी, बोली भाषेतील शब्द सहज हद्दपार होत आहेत. ठिकठिकाणी आधीच वाचनालये नव्हती. जी आहेत तिथे आजच्या जमान्यातील ‘सोशल मीडिया’मुळे कोणी फिरकेनासे झालेय. जी आहेत ती सरकारी अनास्थेचा बळी आहेत. पुरेसे ग्रंथानुदान, वाचन आवड असलेला कर्मचारीवर्ग नाही. हल्ली सर्व काही मोबाईलवर उपलब्ध असल्याने संदर्भ वगळता फारसं कोणी वाचनालयाकडे फिरकत नाही. हे कुठेतरी आपणच आपल्यावर लादून घेतलंय. याच्या आहारी गेलोय. यात बदल करायला हवाय! साहित्य वाचन, थोरा-मोठ्यांची आत्मचरित्रे वाचली गेली पाहिजेत. यातूनही मानसिक ताणतणाव निवळण्यास मोठी मदत मिळेल. हल्ली ताण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा मोठा घटक झालाय. त्याचे निवारण होण्यास वाचन, तेही पुस्तकांचे चांगला हातभार लावू शकेल. हे सगळं जमवलं तर कोणत्याही भाषेचं आक्रमण माय मराठीवर होणार नाहीच. ती डळमळणार नाही नि आपणही! आपली मातृभाषा जतन करणं, तिचा विकास हेच आपलं ध्येय असायला हवं! हे सर्व जमेल ते अन्य भाषांचा आदर करून नि स्वभाषेवर प्रेम करूनच.. 

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content