Friday, February 7, 2025
Homeकल्चर +निमित्त गौरी कुंज...

निमित्त गौरी कुंज भेटीचे, आठवण किशोरकुमारची…

गिरगाव गावदेवीतील भवन्स कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांचे टोळके कॉलेज कॅन्टीनपेक्षा गावदेवी सिग्नलच्या इराणी हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये प्रत्येकाच्या खिशात असतील तेवढी आठ-आठ आण्यांची नाणी टाकून गाणी ऐकण्यात रस घ्यायचो आणि माझा फेवरेट होता किशोरकुमार. आणि एकदा का किशोरकुमार ऐकायचा म्हटलं की, वेळ, पैसा व अभ्यास याची पर्वाच नसे. नवशक्ती दैनिकात नोकरीला लागलो तेव्हा ‘पहिले लक्ष्य’ नवीन टेपरेकॉर्डर आणि किशोरकुमारच्या गाण्याच्या अधिकाधिक गाण्याच्या कॅसेट भरुन अथवा विकत घेणे याला प्राधान्य होते.

ते होताच खोताची वाडीतील आमच्या घराच्या ओटीटीवरील बाकड्यावर आम्ही मित्र किमान तीन तास किशोरकुमार ऐकण्यात रमत असू. त्यातील शेखर मालाडकर, दिलीप भोमकर, नंदकिशोर माने यांच्यासोबतच्या गप्पांत हा फ्लॅशबॅक असतो. माझ्या सिनेपत्रकारितेचा सगळाच भर अगदी सुरुवातीपासूनच फिल्डवर्क असल्याने किशोरकुमारला प्रत्यक्ष पाहायला आणि ऐकायला मिळेल याची असलेली खात्री माझे मित्र निर्माते सतिश कुलकर्णी यांच्यामुळे अतिशय उत्तम रितीने पूर्ण झाली. त्यांच्या तुलसी प्रॉडक्शन्सच्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गंमत जमंत’ या चित्रपटाच्या वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील ‘अश्विनी तू ये ना’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘लाईव्ह अनुभव’ घ्यायला मला सतिश कुलकर्णी यांनी बोलवताच मी केवढा तरी सुखावलो हे वेगळे सांगायलाच नको. शांताराम नांदगावकर लिखित या गाण्याला अरुण पौडवाल यांचे संगीत आणि किशोरकुमार व अनुराधा पौडवाल यांचे पार्श्वगायन. आजही हा सुखद अनुभव जसाच्या तसा आठवतोय.

किशोरकुमारची भूमिका असलेले चित्रपट पाहणेही होत होतेच. अशा ‘किशोरकुमारने झपाटलेल्या’ वातावरणात १३ ऑक्टोबर १९८७ रोजी संध्याकाळी पीटीआयवर फ्लॅश आला, किशोरकुमारचे निधन. मी नवशक्ती ऑफिसमध्ये असल्याने मला काहीच सुचेना. मला हा फार मोठा धक्काच होता. पुढचे अनेक दिवस फक्त आणि फक्त किशोरकुमार ऐकत होतो, आठवत होतो. त्याच्या निधनाला वर्ष होत असतानाच जुहू येथील त्याच्या गौरी कुंज या बंगल्यावर मुलाखतीसाठी अमितकुमारला फोन लावला. त्या काळात लॅन्डलाईन फोन होते. ते उचलले जात आणि आम्हा सिनेपत्रकारांना मुलाखतीसाठी घरी बोलावण्याची पारंपरिक पद्धत होती. तसा अमितकुमारच्या किशोरकुमारवरच्या मुलाखतीसाठी गौरी कुंजमध्ये गेलो.

त्या काळात मी एक छोटा कॅमेरा जवळ ठेवत असे. किशोरकुमारच्या फोटोसमोर अमितकुमारसोबत फोटो काढला. जुहू परिसरात कधीही गेलो की हा बंगला दिसताच किशोरकुमार अनेक गाण्यांसह आठवणे सवयीचे आहे. काही वर्षांपूर्वीच रविवार लोकसत्ताने किशोरकुमारच्या एका जन्मदिवसानिमित्त लीना चंदावरकरची मुलाखत घ्यायला सांगितले तेव्हा पुन्हा एकदा या बंगल्यात गेलो. अलिकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी याच बंगल्याच्या काही भागात तारांकित हॉटेल सुरू केल्याने हा बंगला पुन्हा चर्चेत आला. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा बंगला आता कसा आहे, हे हॉटेल नेमके कुठे आहे हे पाहावेसे वाटले. ते बंगल्याच्या डाव्या बाजूला आहे हे पाहिलं. गर्दीही होती. मन सुखावलं…

Continue reading

द्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा हुकमी चाहतावर्ग असलेला चतुरस्र लेखक!

पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे. त्यांना ते पटकन कसे सुचते आणि ते अनेक उपमा, अलंकार, अनेक जुने-नवे संदर्भ देत देत...

कणेकर, तुम्ही कायम लक्षात राहाल…

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी उज्ज्वल वाडकर यांच्यासोबत आले. पण आश्चर्य वाटत होते ते, खास कोकणातून दूरवरचा प्रवास करीत काही...

गिरगावात ‘बत्तीजवळ’! म्हणजेच २८, खोताची वाडी!!

आपण लहानाचे मोठे होत जाताना आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसं, वातावरण, वास्तू  यांच्याशी असं आणि इतकं एकरुप होतो की ते सगळेच आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. काहींच्या बाबतीत तर ते सगळेच आयुष्यभरची साथसंगत असते, तर कोणी त्या सर्वच आठवणींवर पुढचे...
Skip to content