नाविक दलाच्या उठावामुळे ब्रिटिशांच्या छातीचे ठोके वाढले होते. काही सैनिकांनी बंद पुकारला तर काही सैनिकांनी अधिकाऱ्यांचा आदेश मान्य न करता त्यांना आव्हान देऊन संघर्षमय पवित्रा घेतला. उठाव थांबविणे लष्करी मुख्यालयास खूप कठीण झाले होते. भारतीय सैनिक आदेश मान्य करण्याऐवजी आपल्यावरच कुरघोडी करीत आहेत, ही बाब बलाढ्य साम्राज्यशाहीसाठी खूप शरमेची होती. ब्रिटिश युद्ध कार्यालयाकडे हे वृत्त जाताच त्यांचे धाबे दणाणले. सत्तांतराच्या हालचालीना वेग देऊन भारतीयांना नवे गाजर दाखविण्याची योजना तयार केली पाहिजे, हे धूर्त एटली यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यामुळेच त्यांनी वेव्हेल यांना आपली योजना कळवून त्वरित ती जाहीर केली. “भारतीय संघराज्याचे नवे स्वरूप ठरविण्यासाठी माझे तीन सहकारी लवकरच दिल्ली प्रयाण करीत आहेत.” ते नवे स्वरूप भारतीय राजकारण्यांना पटवून द्यावे, असा लेखी आदेशच एटली यांनी दिला.
15 मार्च 1946 रोजी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये बोलताना या उठवाविषयी त्यांनी अतिशय त्रासिक पण खोचक उदगार काढले. “हिंदुस्थानात आता राष्ट्रप्रेमाची भरती आली आहे. ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी निश्चित स्वरूपाची पावले उचलावीच लागतील. 1920 ते 30 किंवा 42मध्ये असलेली उद्रेकाची भावना 46मध्ये कितीतरी अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना जास्तीतजास्त प्रमाणात स्वातंत्र्य देण्याविषयी आमचे मंत्री अधिकाधिक प्रयत्न करतील, असे मी वचन देतो. शासनप्रणाली कशी असावी? याविषयी भारतीयांनीच ठरवायचे आहे.” शेवटची मेख त्यांनी अत्यंत चपखलपणे मारून दिली. “हिंदुस्थान ब्रिटिश राष्ट्रकुलातच राहिल याविषयी मला संपूर्ण विश्वास वाटतो.”
एटली यांच्या वक्तव्यात 46च्या उद्रेकाविषयी जी चिंता दिसते त्यावरून नाविक दलाच्या उठावाची त्यांनी किती धास्ती घेतली होती हे स्पष्ट होते. भारतीय सैनिकांना शस्त्रप्रशिक्षण देण्याचा ब्रिटिशांचा हेतू स्व-स्वार्थासाठी होता. “आम्ही आदेश देऊ त्याप्रमाणे भारतीय सैनिक आमच्या शत्रूवर तुटून पडतील. हे सैनिक आमच्या इशाऱ्यावर राबणारे यंत्रमानव आहेत. त्यांना कोणत्याही मानवी भावभावना नाहीत असे समजणाऱ्या अमानवी राज्यकर्त्याना हा उठाव एक जबदस्त चपराक होती.
भारतीय नाविक उठावाला शाही भारतीय नौदलाचे बंड, मुंबईचे बंड, नाविक उठाव असेही संबोधले जाते. उठावाचा प्रारंभ 18 फेब्रुवारी 1946ला ‘तलवार’ जहाजावर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये झाला. नाविकांचा संप पुढे मुंबईत उघड बंड, त्यानंतर कराची ते कलकत्ता अशी त्याची व्यापकता पूर्ण भारतात पोहोचली. प्रत्येक ठिकाणी नाविकांनी उठावाला पाठिंबा दिला. तो वाढतच गेला. 78 जहाजातील वीस हजारांपेक्षा जास्त नाविक व किनाऱ्यावरील आस्थापना कर्मचारी सहभागी होते. सैनिकांच्या मनातील या उद्रेकामुळे येथील मूठभर गोऱ्यांची काय दाणादाण उडाली असेल याची कल्पना सूज्ञ वाचक करू शकतात.
18 ते 23 फेब्रुवारी 1946 या बंडाचा कालावधी साम्राज्यशाहीला दिवसा तारे दाखवणारा ठरला. या उठावाला तत्कालीन भारतीय नेतृत्त्वाने साथ दिली असती तर ब्रिटिशांना नाक घासून शरणागती पत्करावी लागली असती व आपल्या प्राणाची भीक मागून ब्रिटनच्या दिशेने धाव घ्यावी लागली असती, पण तत्कालीन नेत्यांनी या उठावाचा निषेध करून गोऱ्या साम्राज्यशाहीला अभय देण्याचे काम केले. त्यामुळे सामान्य जनतेचे खच्चीकरण होत गेले. उठावाचे नेतृत्त्व करण्यासाठी सुभाषबाबू त्यावेळी असते तर ब्रिटिशांना उठाव चिरडून टाकण्याची संधीच मिळाली नसती. ब्रिटिशांच्या शवपेट्याच लंडन रवाना झाल्या असत्या. पण तेव्हा सुभाषबाबू जिवंत की मृत यावरच खल सुरू होता. भारतीय स्वातंत्र्याचे श्रेयच अहिंसावाद्यांना द्यायचे हीच कदाचित नियतीची इच्छा असावी.
निवासव्यवस्था व निकृष्ट दर्जाचे भोजन हे या उठावाचे तत्कालिक कारण असले तरी साम्राज्यशाही विरोधात असणारी संतापाची ज्वाला हेच खरे कारण होते. 19 फेब्रुवारीला या उठावाचे नेतृत्त्व करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्त्व सिग्नलमॅन लेफ्टनंट मोहमद शरीफ, पेटी ऑफिसर टेलिग्राफीस्ट मदन सिंग आणि बी. सी. दत्त यांची निवड करण्यात आली होती. या नेतृत्त्वात पुढील अवघ्या पाच दिवसात भारतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना ब्रह्मांड आठवले. स्वा सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आवाहन केले होते- “लेखण्या मोडा, बंदुका उचला”. भारतीय तरुणांच्या हाती जर अत्याधुनिक शस्त्र असतील तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समस्त भारतीयाबरोबर जगाच्या निदर्शनास आले.
दुसऱ्या महायुद्धात भारतीय नौदलाचा विस्तार करणे ब्रिटिश सत्तेला आवश्यक वाटले. त्यामुळे 1939 ते 45 या कालावधीत नौदलाचा विस्तार दहा पटीने वाढला. सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्यवादी विचारसरणीचे कार्यकर्ते भरती झाले. सैन्यामध्ये अधिक चिकित्सा किंवा क्रांतीचा विचार घेऊन जगणारे वीर जेव्हा एकत्र येतात तेव्हा साम्राज्यशाहीचा खेळ बिघडण्यास किती वेळ लागणार? अर्थात हे होणेही गरजेचेच होते. घुसखोरांना धडा देण्यास कोणता विचार प्रभावी ठरतो, हे महत्त्वाचे नसून अन्यायाला वाचा फोडणारा प्रत्येक विचार क्रांती घडवून आणत असतो. व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनात कुणाला कोणत्या प्रसंगामुळे पेटून उठणे महत्त्वाचे वाटले यावर अधिक चिकित्सा करण्यापेक्षा तो अन्यायाविरुध्द समर्थपणे उभा राहतो हा भाग मला जास्त महत्त्वाचा वाटतो.
फेब्रुवारी 1946च्या उठावाला 76 वर्ष पूर्ण होऊन गेली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या बंडाशिवाय पूर्णच होऊच शकत नाही. मुंबई, कराची त्यानंतर भारतातील अनेक ठिकाणी या उठावाचे पडसाद पडले. 1946च्या उठावामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय अन्य पर्याय नाही, हे ब्रिटिशांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. स्वातंत्र्यलढ्यातील खऱ्या लढवय्यांचा इतिहास स्वातंत्र्य मिळाल्यावर आजतागायत सांगितला गेला नाही. सत्य घटना ह्या जनतेसमोर जाणीवपूर्वक येऊ द्यायच्या नाहीत. जमेल त्या प्रमाणात तळहाताने सूर्य झाकण्याचा प्रयोग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे केला गेला. सत्तेच्या चाव्या आपल्याकडे आहेत. कोणती दालने खुली करावयाची, कोणाला बंदिस्त ठेवायचे ही राजकीय किमया अगाध आहे. भोळ्या जनतेच्या आकलनापलिकडची आहे. त्यांच्या अज्ञानाचा लाभ उठवत त्यांच्या मनावर वारंवार काय बिंबवायचे व त्यांच्याकडून काय वदवून घ्यायचे? हे सर्वच राजकीय खेळात पूर्वनियोजित असते. त्या ठिकाणी सत्याचा वाली कोण असतो?
नौसैनिकांच्या उठावाची पार्श्वभूमी जर समजावून घेण्यासाठी नेताजींचे नेतृत्त्व आदर्श मानून आझाद हिंद सेनेतील सैनिकांनी केलेला असीम त्याग, त्या अधिकाऱ्यांवर चालणारे खटले आणि भुलाभाई देसाईसारख्या निष्णात कायदेतज्ज्ञांनी या निःस्सीम देशभक्तांना कसे अभय द्यायचे? यासाठी केलेला कायदेशीर संघर्ष, भारतीय जनतेने व येथील नेताजींच्या समविचारी पक्षांनी आझाद हिंद सैनिकांवर दाखवलेला प्रचंड विश्वास या सर्व घटनांचा ब्रिटिशांच्या आदेशाखाली दबून शस्त्र चालविणाऱ्या सैनिकांवर खूप गंभीर परिणाम झाला. त्यांना स्वतःविषयी घृणा वाटायला लागली. आपले रक्तशोषण करणाऱ्या, मायभूमीचे लचके तोडणाऱ्या नराधमासाठी आपण लढा देतोय. आपला मार्ग चुकला आहे याची स्पष्ट जाणीव त्यांना व्हायला लागली. त्यामुळे उघडपणे विरोध करण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण झाले होते. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वर्गणी गोळा करून पंडित नेहरूंकडे सोपविण्यात आली. “आय एन ए (इंडियन नॅशनल आर्मी)मधील अधिकारी भारतमातेवर प्रेम करणारे थोर सुपुत्र आहेत.” असे पत्र द्यायला सैनिक विसरले नाहीत.

भारतीय सेनेच्या तीन्ही दलात प्रचंड जागृती निर्माण झाली. गोऱ्या अधिकाऱ्यांना समर्थपणे विरोध करण्यासाठी भारतीय अधिकारी आणि सैनिक ठामपणे उभे राहिले. असंतोषाचा स्फोट वाढतच होता. नौसैनिकांचे नेते बी सी दत्त यांनी या उठावाची पार्श्वभूमी आपल्या अनुभवकथनाद्वारे स्पष्ट केली. ब्रिटिश हितासाठी हिंदी सैनिक प्राणपणाने लढत असताना त्यांच्या वाट्याला अपमान, अवहेलना, उपेक्षा येत असेल तर आम्ही का, कशासाठी व कोणासाठी लढत आहोत? हे प्रश्न माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते. ब्रिटिश राजसत्ता टिकविणारे आपण एक प्यादे आहोत, याची तीव्र खंत व्यक्त करीत असताना सर्वांचा संताप शिगेला पोहोचला होता. सुभाषबांबूच्या नेतृत्त्वाला आदर्श मानून सशस्त्र क्रांतीचा मार्ग अधिक मजबूत करून पुढील मार्गक्रमण केले पाहिजे, हा विचार दृढ होत चालला होता.
उठावाचा प्रारंभ आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास काही बाबींचा उलगडा होतो. 1 डिसेम्बर 1945ला सर्व प्रमुख नाविक तळावर नौसेना दिन साजरा करण्याचे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ठरविले. त्यादिवशी काही प्रतिष्ठित भारतीय नागरिकांना युद्धनौका दाखवून आपली नौसेना किती सक्षम आहे, हे निदर्शनास आणून देण्याचा तो प्रयत्न होता. 1 डिसेम्बरला सकाळी ‘तलवार’ या युद्धनौकेची तपासणी करण्यास अधिकारी दाखल झाले, तेव्हा नौकेच्या सर्व बाजूला एक फूट उंचीचा रंगीत अक्षरात घोषणा लिहील्या होत्या- “चलेजाव”, “साम्राज्यवाद्यांचा धिक्कार असो”, “ब्रिटिशांना मारून टाका” या घोषणांमुळे इंग्रज अधिकारी खवळले.
हा उद्रेक कोणाच्या मनातला हे कळायला मार्ग नव्हता. 2 फेब्रुवारी 1946ला सरसेनापतींनी बोटीस भेट दिली. सलामी घेणार त्या लाकडी प्लॅटफॉर्मवर “जयहिंद”, “चलेजाव” या घोषणा पेंट केलेल्या आढळल्या. ब्रिटिश यंत्रणेकडून त्या घटनेची तत्काळ चौकशी सुरू झाली. चौकशीअंती निदर्शनास आले की त्यात बी सी दत्त यांचाच पुढाकार होता. दत्त यांना तत्काळ कोठडी देण्यात आली. पण त्यांच्या कुशल यंत्रणेमुळे वृत्त वायूवेगाने सर्वत्र पसरले. आपल्या नेत्यास अटक झाली हे वृत्त कळताच सर्वत्र संतापाची लाट उसळली.
18 फेब्रुवारी 1946ला सकाळी ‘तलवार’वर नाश्त्यासाठी सैनिक एकत्र आले. सर्वांच्या भावनेचा उद्रेक झाला होता. सर्वांनी एका सुरात घोषणा द्यायला सुरुवात केली. “हम नाश्ता नही करेंगे”, “अच्छा नाश्ता अच्छा भोजन और पुरा रेशन”, “गाली देनेवाले कमांडर किंग को सजा मिलनी चाहीये।” हा प्रचंड आक्रोश पाहून गोरे अधिकारी पुरते हैराण झाले. त्यांच्या छातीचे ठोके वाढले. कोणतीही बोलणी करण्यासाठी समोर येण्याची हिम्मत एकही गोरा अधिकारी करीत नव्हता. त्वरित बंद पुकारण्यात आला.
इतर जहाजावरील कार्यरत सैनिकांना त्वरित सर्व माहिती मिळाली आणि ते या उठावात सहभागी झाले. तलवार जहाजावरील गोरा अधिकारी चांगल्या दर्जाच्या जेवणाची मागणी केल्यावर सैनिकांना शिव्यांचा भडिमार करून मोकळा झाला. स्वाभिमानी भारतीय सैनिक नौकरीसाठी त्याच्या शिव्या निमूटपणे सहन करतील, असे कधीही होणार नव्हते. त्यांचा स्वाभिमान दुखावल्यामुळे ते क्रोधीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य अधिकारी रिअर अडमिरर रेटरे तत्काळ स्वतः तिथे हजर झाला. नाश्ता करण्याची त्याची विनंती सैनिकांनी अमान्य केली. सैनिकांच्यावतीने प्रतिनिधी पाठविण्याची सूचना रेटरेकडून करण्यात आली तेव्हा आमच्यावतीने काँग्रेस, कम्युनिस्ट किंवा मुस्लिम लीगचा नेता बोलणार असेल तरच बोलणी करण्यात येईल, असे नौसैनिकाकडून बजावण्यात आले. रेटरेने मात्र हा प्रस्ताव फेटाळला.
18 फेब्रुवारीला प्रत्यक्ष उठावाला प्रारंभ झाल्यावर मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांना पळता भुई थोडी झाली. उठावाचे वृत्त वायूवेगाने सर्वत्र पसरले. त्यानंतर एकाच दिवसात विद्रोह्यांची संख्या वीस हजार झाली. मुंबई, कलकत्ता, कराची, मद्रासबरोबरच इतर 78 युद्धनौकावरील सैनिक या उठावात सहभागी होते. हा उठाव मुंबईत सहा दिवस, कलकत्त्यात सात दिवस, कराचीत दोन दिवस आणि मद्रासमध्ये एक दिवस चालू होते. मुंबईत एस एन खान, मदनसिंग आणि दत्त हे तिघे या उठावाचे नेतृत्त्व करीत होते. तलवार युद्धनौका नाविकांनी ताब्यात घेतली. इतर नाविक आपली युद्धनौका सोडून ‘तलवार’च्या दिशेने धाव घेत होते. मुंबईच्या प्रमुख रस्त्याने जल्लोष सुरू झाला. “इंनक्लाब जिंदाबाद”, “हिंदुस्थान एक हो” या घोषणांचा अक्षरशः पाऊस सुरू झाला. नौसैनिकांच्या मागण्या होत्या- सर्व राजकीय कैद्यांची तुरुंगातून सुटका व्हावी, नौसैनिकाना शिव्या देणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ब्रिटिश सैनिकासमान सन्मान व वेतन मिळाले पाहिजे.
या मागण्यांच्या निमित्ताने हिंदुस्थानी सैनिक ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध पेटून उठणे हा ब्रिटिशांसाठी भूकम्प होता. त्यामुळे साम्राज्यशाहीचा पायाच मुळासकट खिळखिळा झाला. भव्य प्रसादाला चिरा गेल्या. उठाव दडपून टाकण्यासाठी रणगाडे मुंबईच्या रस्त्यावरून धडधडू लागले. पोलीस दल व सशस्त्र सैन्याला निर्भय बनलेले व पेटून उठलेले नागरिक रणगाड्यावर व सशस्त्र सैनिकांवर दगडविटांचा वर्षाव करायला लागले तेव्हा ते विसाव्या शतकातील शिवरायांचे मावळे भासत होते. 4 दिवसात 228 लोक मारले गेले. पण प्रतिकाराची पकड कमी होत नव्हती. उठाव उधळून लावण्यासाठी नाविकांचा बराकीभोवती सशस्त्र पहारा करून रसद तोडली गेली. नाविकांच्या उपासमारीचा हेतू नागरिकांनी यशस्वी होऊ दिला नाही. खाद्यपदार्थांचे पुडे गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने पोहोचत होते.
या प्रसंगाविषयी दत्त आपल्या अनुभवकथनात लिहितात, “मुंबई बंदरात त्यादिवशी नवसंचार भरला होता. भारतीय सैनिकांचा पहारा, ब्रिटिश सोल्जर बंदुका रोखून उभे असताना खाद्यपदार्थ नौसैनिकापर्यंत पोहोचत होते. पहारा देणारे आपले सैनिक नागरिकांचे व नौसैनिकांचे मनोबल उंचावत होते. तेव्हा ब्रिटिश अधिकारी हतबल झाले होते.” भारतीय सैनिक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासून त्यांना आव्हान देत होते. या उठावाने अशी जबरदस्त पकड घेतली असताना त्यावेळेस कराची बंदरात हिंदुस्थानी जहाज ओहोटीमुळे समुद्राच्या रेतीत फसले. त्या संधीचा लाभ घेऊन ब्रह्मदेशाच्या ब्रिटिश फौजेने त्यावर हल्ला चढविला. त्यामुळे नौसैनिकांना माघार घेणे अपरिहार्य होते. शेवटी म. गांधींनी सरदार पटेलांना बोलणी करण्यासाठी पाठविले.
नाविकांना शिक्षा दिली जाणार नाही. त्यांच्यावर सूड उगविला जाणार नाही अशी शाश्वती देऊन 23 फेब्रुवारी 1946ला नौसेनिकांचा उठाव शांत करण्यात आला. भारतीय सैनिक आणि आझाद हिंद सेना एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती वाढवावी, हे सुभाषबाबूंचे स्वप्न होते. नाविक दलाच्या उठावापूर्वीच आझाद हिंद सेनेला स्वीकारावा लागलेला पराभव आणि सुभाषबाबूंच्या मृत्यूचे वाढत चालले गूढ त्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही, पण नौसेनेला मिळालेले आत्मबळ व त्या उठावाचे भारतीय स्वातंत्र्यावर झालेले सकारात्मक परिणाम आपल्याला विसरता येणार नाहीत. सुभाषबाबूंच्या लढ्याचे महत्त्व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात येऊन एटली कबूल करतात. आय एन ए आणि असंख्य सूज्ञ नागरिक ते कबूल करतात, तसेच सर्व राजकीय पक्षांनी ते कबूल करावे. अहिंसावाद्यांना स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग या उठावाने सोपा करून दिला. हे अनेक अभ्यासकांनी सिद्ध करून दिले आहे. अहिंसावादी हे कबूल करतील का?
- प्रा. वसंत गिरी (मेहेकर, जि. बुलढाणा)
- संपर्क- 9011229232

