Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या रस्त्यांवर यंदा...

मुंबईच्या रस्त्यांवर यंदा पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर

मुंबई महानगरात पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर केला जात आहे. या रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर एच पूर्व विभागात खार सबवे येथे करण्यात आला आहे.

मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. खास करून खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईत तीन ठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणाचा वापर करत पथदर्शी प्रकल्प राबविल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईकरांना उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे उपायुक्त (पायाभुत सुविधा) उल्हास महाले यांनी नमूद केले.

खार भुयारी मार्ग येथे गुरूवारी (२९ जून २०२३) खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. याठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करून तत्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करत एक पथदर्शी प्रयोग काही दिवसांपूर्वीच पार पडला. पथदर्शी प्रकल्पामध्ये मिश्रणाच्या वापराचा यशस्वी परिणाम आढळून आला. म्हणून मिश्रणाचा वापर संपूर्ण महानगरात करण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. रस्ते विभागाने प्रत्येक विभागनिहाय हे मिश्रण रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पुरवले आहे.

असा आहे वापर

रिॲक्टीव्ह अस्फाल्ट हे केमिकलमिश्रीत डांबर आहे. महत्त्वाचे म्हणजे एरव्ही पाण्याच्या संपर्कात आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो. रिअॅक्टीव्ह अस्फाल्टमधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते, असे मिश्रणाचे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या पुरविण्यात आल्या आहेत. इकोग्रीन इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीकडून हे तंत्रज्ञान विभागांना पुरवण्यात आले आहे. त्यातील केमिकल पावडरची आयात करण्यात आली आहे.

मुंबईतील पथदर्शी प्रकल्प शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे याठिकाणी काही रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी राबविण्यात आला. त्यानंतर या रस्त्यांवर खड्डे बुजवलेल्या ठिकाणी वाहतूकही सुरळीतपणे सुरू राहिली आहे. रस्त्यावरची खडी निघणे किंवा पुन्हा खड्डा पडणे यासारखी कोणतीही तक्रार निदर्शनास आली नाही.

रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचाही होणार वापर

गतवर्षीच्या पावसाळ्यात पालिकेकडून रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नऊ सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून मुंबईत रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरातही पालिकेला यश मिळाले. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोरड्या पृष्ठभागाची गरज असते. रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर केल्यानंतर या रस्त्यावरून सहा तासांनी वाहतूक सुरू करणे शक्य होते.

कोल्डमिक्सचा पुरवठा

मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व विभागात आतापर्यंत १३०० मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी पुरवण्यात आले आहे. २०० मेट्रिक टन कोल्ड मिक्स राखीव ठेवण्यात आले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content