पाहुण्या न्युझीलंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध झालेली ३ सामन्यांची वन डे मालिका २-१ अशा फरकाने जिंकून भारतभूमीत पहिल्यांदा असा पराक्रम करुन यजमान भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला आहे. गतवर्षी त्यांनी भारताला कसोटी मालिकेत त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-० असा “व्हाईटवॉश” देण्याचा पहिल्यांदा मोठा पराक्रम केला होता. आता वनडे मालिकेतदेखील त्या विजयाची पहिल्यांदा पुनरावृत्ती करून न्युझीलंड संघाने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आंनदावर विरजण घातले. विशेष म्हणजे न्युझीलंड संघातील ७ खेळाडू पहिल्यांदाच या मालिकेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत होते. १९८९पासून न्युझीलंड संघ भारतभूमीत वन डे मालिका खेळतोय. पण याअगोदर त्यांची विजयाची पाटी कोरीच होती. यापूर्वी झालेल्या ७ वन डे मालिकेत त्यांना हार खावी लागली होती. पण २०२६च्या नव्या वर्षात न्युझीलंडने ती कोरी पाटी पुसून टाकली. मार्च २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत २-० असे पिछाडीवर पडूनदेखील नंतर ३-२ अशी मालिकेत बाजी मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर भारतात झालेल्या सर्व वनडे मालिका भारताने जिंकल्या होत्या. पण अखेर ही भारतीय संघाची विजयी दौड न्युझीलंड संघाने रोखण्यात यश मिळवले. या मालिकेबद्दल एका वाक्यात सांगायचे तर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाला आता निरोप देण्याची वेळ आली आहे.

नवख्या न्युझीलंड संघाला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघाच्या अंगाशी आली. त्यातच या वनडे मालिकेसाठी भारताने काय तयारी केली होती हादेखील प्रश्न चर्चेत आहे. पहिला सामना गमावूनदेखील न्युझीलंड संघाने पुढचे दोन सामने जिंकून मालिकेत केलेले “कमबॅक” कौतुकास्पद आहे. फलंदाजी, गोलंदाजी या खेळातील दोन प्रमुख अंगात भारत कमी पडलाच. पण खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका भारताला या मालिकेत बसला. धावचीतच्या संधी आणि सोडलेले झेल न्युझीलंड संघाच्या विजयाला मोठा हातभार लावून गेले. तसेच तीनही सामन्यात भारताची सलामी चांगली झाली नाही. त्यामुळे नंतर आलेल्या फलंदाजांवर दडपण आले. मग हे फलंदाज खराब फटक्यांचे बळी ठरले. मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. चांगली सुरूवात करुन त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल मोठी खेळी करु शकले नाहीत. माजी कप्तान विराटने दोन सामन्यात सुरेख फटकेबाजी करुन आपण अजून संपलो नसल्याचे दाखवून दिले. शेवटच्या सामन्यात विराटला कोणाची तरी साथ मिळाली असती तर कदाचित मालिकेचा निकाल वेगळा लागला असता.

भारतीय तेज गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. पण फिरकी गोलंदाजांची साथ त्यांना मिळाली नाही. सामन्यातील मधल्या षटकांत न्युझीलंड फलंदाजांना बाद करण्यात भारतीय फिरकी गोलंदाज यशस्वी होऊ शकले नाहीत. कुलदीप यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो अपेक्षांची पूर्तता करु शकला नाही. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीतील पहिली जादू आता संपलीय. फलंदाजीतपण तो चमक दाखवू शकला नाही. गेल्या ५ वनडे सामन्यात जडेजाला अवघा १ बळी घेता आलाय. आता त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. याचा निवड समितीने विचार करावा. टी-२० संघाचा उपकप्तान अक्षर पटेल जडेजाची जागा घेऊ शकतो. तीच बाब माजी कर्णधार रोहित शर्माला लागू पडू शकते. रोहितला ३ सामन्यात अवघ्या ६१ धावा करता आल्या. २०२७च्या वनडे विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो कितपत “फिट” राहिल याबाबत प्रश्नचिन्ह आहेच. मिचेल, फिलीप्स, यंग न्युझीलंडच्या विजयाचे शिल्पकार होते. मिचेलने आपल्या जबरदस्त फलंदाजीची छाप मालिकेवर पाडली. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन भारतीय फलंदाजांना जेरीस आणले. युवा तेज गोलंदाज क्लार्क आणि फिरकी गोलंदाज लेनॉक्सने शानदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा विजय त्यांच्या संघाला नवी ऊर्जा देणारा ठरेल. हळुहळू त्यांची दुसरी फळीदेखील तयार होतेय. हे चित्र न्युझीलंडसाठी आशादायक असेल. आता विराट, रोहितची फलंदाजी त्यांच्या चाहत्यांना थेट आयपीएलमध्ये बघायला मिळेल. कारण आता एवढ्यात भारताचे वन डे सामने नाहीत. आता भारताची वनडे मालिका जून महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला आता आत्मपरिक्षणाची गरज आहे. भारतीय संघाच्या मर्यादा उघड्या पडल्या. सद्यस्थिती चिंताजनक आहे. भारतीय संघाची रणनीती, नियोजन यात बऱ्याच त्रुटी आहेत. संघनिवडदेखील चुकीची होतेय. या मालिकेच्या पराभवातून भारतीय संघ काहीतरी बोध घेईल, अशी आशा करुया. नाहीतर आता न्युझीलंडविरुद्ध होत असलेल्या टी-२० मालिकेतदेखील पराभवाची नामुष्कीची पाळी त्यांच्यावर येऊ शकते.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

